बडगुजरांवर आरोप होत असतानाही भाजप प्रवेश का? पक्षश्रेष्ठींनी दिलं 'हे' उत्तर
18-Jun-2025
Total Views | 30
पुणे : उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाला काही स्थानिक नेत्यांकडून विरोध करण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. त्यामुळे बडगुजरांवर आरोप होत असतानाही भाजप प्रवेश का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आला होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
बुधवार, १८ जून रोजी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका करण्यात आली, नितेश राणेंनी त्यांचा व्हिडीओ समोर आणला होता, ही गोष्ट खरी आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्याची चौकशी झाली आणि चौकशीअंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. हे सगळे ते त्या पक्षात असताना विधानसभा निवडणूकीच्या आधीच घडलेले आहे. विधानसभेत ते आमच्या विरोधातील उमेदवार होते. निवडणूकीनंतर त्यांनी आमच्या पक्षात येण्याची इच्छा दाखवली. त्यांनीसुद्धा भरपूर मते घेतली आहेत. आपल्या पक्षात कुणी येत असल्यास आपण त्यांचे स्वागत करतो. त्यांचा जुना इतिहास बाजू ठेवून आता भाजपच्या नीती नियमांनी वागले पाहिजे, ही अपेक्षा असते," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "काल त्यांच्या पक्षप्रवेशाची जबाबदारी गिरीश महाजनांना दिली होती. चंद्रशेखर बावनकुळेंना त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे कदाचित त्यांच्यात संवाद झालेला नसावा. मात्र, पक्षप्रवेशाला कुणाचा विरोध नव्हता. आमच्या स्थानिक पातळीवर त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध झाला पण आपल्याला पक्ष वाढवायचा असल्याचे आम्ही त्यांना समजावून सांगितले," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.