...मग इंग्रजी भाषासुद्धा रद्द करायची का? केशव उपाध्येंचा राज ठाकरेंना सवाल

    18-Jun-2025
Total Views | 64


मुंबई : काँग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली मग तीही रद्द करायची का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना केला आहे. तसेच भाषेचे राजकारण सोडा आणि वस्तुस्थिती पाहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज ठाकरेंनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली. यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अभ्यासू नेते मानले जातात. मात्र, हिंदी भाषेच्या अनिवार्यतेवरून ते राजकारण का करत आहेत? नव्या परिपत्रकानुसार हिंदी ही सक्तिची नसून तिसरी भाषा म्हणून शिकण्यास उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना अन्य कोणतीही भाषा शिकण्यास परवानगी असून अन्य भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. तिसरी भाषा ही हिंदी व्यतिरिक्त शिकण्याची इच्छा असणारे २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास ऑनलाइन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येईल. शाळेत शिक्षक व्यवस्थापन हा त्या शाळेचा निर्णय असतो आणि त्यामुळे त्या विषयाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक उपलब्ध होणार आहे," असे त्यांनी सांगितले.


गुजरातमध्येही तिसरी भाषा हिंदी!

ते पुढे म्हणाले की, "ज्या गुजरातचा उल्लेख राज ठाकरे करत आहेत त्या गुजरातमध्येही तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाते. त्या गुजरातमध्ये गुजराती ही प्रथम भाषा तर हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या तीन भाषा शिकवल्या जातात. गुजरातमध्ये गुजराती सोडून अन्य भाषिक शाळांमध्येही गुजराती आणि हिंदी शिकावी लागते. काँग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली मग तीही रद्द करायची का? तिसरी भाषा ही तोंडओळख स्वरुपात शिकवण्यात यावी अशी तरतूद आहे. ही वस्तूस्थिती आहे. पण ही वस्तूस्थिती नाकारून तुम्ही मराठीचे राजकारण जरूर करा. पण महाराष्ट्रात मराठी पहिलीपासून अनिवार्य आहे. तुम्ही हिंदीचा दुस्वास कशासाठी करता? हिंदी भाषा अनिवार्य नसताना ती अनिवार्य असल्याचे सांगून तुम्ही एकप्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल करत आहात. हे तुम्हाला शोभणारे नाही," असेही केशव उपाध्ये राज ठाकरेंना म्हणाले.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121