मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि ब्रिटन दौरा रद्द झाला. आणि राजकीय वर्तुळात त्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली. मग गप्प बसतील ते विरोध कसले? या न्यायाने उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायला सुरूवात केली. इतकंच काय तर दावोस दौऱ्यावर झालेल्या खर्चावर ही आदित्य ठाकरेंनी टीका केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि ब्रिटन दौरा का रद्द झाला? त्यांनी दावोसला जाऊन काय आणलं? आदित्य ठाकरेंनी परदेश दौरे केले त्या दौऱ्यांच फलित काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्याआधी आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर पोस्ट करत आज दुपारी १ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आणि दौरा रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळांनी मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलनामुळे आणि नागपुरातील ढगफुटीमुळे रद्द झाला, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यामांना दिली.
पण आदित्य ठाकरेंनी मात्र हा दौरा त्यांच्या टीकेमुळे रद्द झाल्याचा गवगवा केला. तर दुसरीकडे आपला दावोस दौरा यशस्वी झाला असे मुख्यमंत्री शिंदे सांगत असताना आदित्य ठाकरे यांनी मात्र या दौऱ्यावर ही संशय व्यक्त केला. पण आधी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जर्मनी आणि ब्रिटन दौरा रद्द होण्याचं कारण हे राज्यात सुरू असलेली आंदोलन आणि नागपुरातील ढगफुटी आहे.
तसेच हा दौरा रद्द झाल्यावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, उद्योजक महाराष्ट्रात येतील, त्यासाठी महाराष्ट्रात उद्योगपूरक वातावरण असावे, अशी आज स्थिती आहे. मात्र, विरोधकांकडून कुठेतरी सरकारची बदनामी केली जात आहे. मात्र, त्यांनी सांगावे की, दावोसला जाऊन आपण किती उद्योग आणले? किती पैसा खर्च केला? याचा हिशोब द्या,” असे सवाल उद्योगमंत्री उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्याचबरोबर दावोसमध्ये झालेल्या खर्चावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत उदय सामंत म्हणाले की, दावोस दौऱ्यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप खोटा आहे.
या दौऱ्यात ३२ कोटी रुपये खर्च आला आहे. ही परिषद चार दिवसांची होती. येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला १६ कोटी खर्च आला. तसेच या दौऱ्यात २०२१ मध्ये १ कोटी ३७ लाखाचे करार झाले. त्यानंतर २०२२ मध्ये ८७ हजार कोटींचे, तर चालू वर्षी एक लाख ३७ हजार कोटींचे १९ सामंजस्य करार झाले. त्यातील ७७ टक्के उद्योजकांना देयकरार पत्र देण्यात आलेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.तसेच गेल्या २५ वर्षांत कोणी कुणाच्या पैशांवर दौरे केले?तसेच ठाकरे सरकारच्या काळात १४ महिने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक न झाल्याने किती रोजगार बुडाले? यांची माहिती काढावी लागेल. अशी टीका ही सामंतांनी ठाकरेंवर केली.
दरम्यान याआधी भाजप नेते निलेश राणे यांनी ही दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला होता. ‘तू परदेशात काय-काय करतोस.. संध्याकाळी काय करतोस. याबाबत नको बोलूस... मुख्यमंत्री उशिरा की लवकर पोहचले हे तुला कसं कळणार? तुझी कोण आहे का तिकडे दावोसला?’ असं म्हणत राणेंनी आदित्य ठाकरेंबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच आदित्य ठाकरे दावोस दौऱ्यानंतर 15 दिवस लंडनला काय करत होते? त्यामुळे जनतेच्या पैश्यांवर कोण वैयक्तिक ट्रिप करत हे आदित्य ठाकरेंनी आधी स्पष्ट करावं, असे निलेश राणे म्हणाले.
यावेळी राहुल शेवाळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी आदित्य ठाकरे स्वित्झर्लंडला गेले होते. तिथे ते काय करत होते? पबमध्ये मज्जा तर मारत नव्हते ना? असा सवाल राहुल शेवाळेंनी केला होता.तसेच ‘वेदांता’‘फॉक्सकॉन’, ‘एअरबस’,सीनारमन, सॅफ्रॅन या प्रकल्पाबाबत खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी येत्या महिन्यात श्वेतपत्रिका जाहीर करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे येत्या काळात आदित्य ठाकरेंच्या दावोस दौऱ्यामुळे महाराष्ट्राला काय मिळालं हे लवकरच कळेल.