रशिया-युक्रेन युद्धाला पुन्हा एकदा तोंड फुटले असून राजधानी कीव्हवर रशियाच्या मिसाईल हल्ल्याचे वृत्त येऊन धडकले. अशा या जागतिक झळ बसलेल्या युद्धाची लवकरच वर्षपूर्ती होईल. अमेरिकेसह युरोपिय देशांची युक्रेनला मदत आणि युक्रेनच्या सैनिकांची चिवट झुंज यामुळे बलाढ्य रशियाला हवा तसा आतापर्यंत विजय मिळविता आला नाही. त्यातच आता जर्मनीने आपले ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला देण्याचे मान्य केले आहे. तेव्हा रशियाविरुद्धच्या युद्धात हे रणगाडे ‘गेमचेंजर’ ठरतील, अशी युक्रेनला आशा आहे.
दुसरीकडे रशियाचे म्हणणे आहे की, हे रणगाडेही इतरांप्रमाणेच जळून राख होतील. रशियाकडे तसे ‘टी १४ अर्माता’, ‘टी ९०’ यांसारखे अत्याधुनिक रणगाडे आहेत, तर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रेही आहेत. त्यामुळे ‘लेपर्ड’चा कितपत टिकाव लागतो, हे काळच ठरवेल.फेब्रुवारी २०२१ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया सोव्हिएतकालीन रणगाड्यांचाच वापर करत आहे. युक्रेनही आपल्या संरक्षणासाठी रणगाडे वापरत आहे. जर्मनीमध्ये बनवलेल्या ‘लेपर्ड-२’ रणगाड्यांच्या मदतीने युक्रेन आपली संरक्षण रेषा अधिक मजबूत करू शकेल, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
१९७० मध्ये निर्मिती केलेले ‘लेपर्ड-२’ रणगाडे जगातील सर्वांत शक्तिशाली मुख्य युद्ध रणगाड्यांपैकी एक मानले जातात. ते मिळवण्याच्या उत्सुकतेमागे ‘लेपर्ड-२’ रणगाडे हे युक्रेनच्या सीमेअंतर्गत बांधलेले रशियन बंकर्स दुरूनच सहज नष्ट करू शकणार असून, हे रणगाडे युक्रेनपर्यंत पोहोचवणे सोपे आहे. कारण, ते रणगाडे फक्त युरोपियन देशांमध्येच बनवले गेले असून, त्यांचे सुटे भाग मिळवणे आणि दुरूस्तीचे काम सहज केले जाऊ शकते. तसेच या रणगाड्यांचा वापर करण्यासाठी युक्रेनियन लोकांना प्रशिक्षण देणेही सोपे राहणार आहे.
जर्मनीच्या ‘लेपर्ड-१’ ने १९६५ मध्ये सेवेत प्रवेश केला. याने आतापर्यंत १२ पेक्षा जास्त युरोपियन देशांसाठी मुख्य लढाऊ रणगाडा म्हणून काम केलेले आहे. यातील बहुतांश रणगाडे जर्मनी, इटली आणि नेदरलँड्सने वापरले होते. ‘लेपर्ड-१’ रणगाडा अशा वेळी बांधण्यात आला होता,जेव्हा उच्च स्फोटक विरोधी रणगाड्यांच्या आगमनाने ‘हेवी वेपनरी’चे वर्चस्व संपुष्टात येणार होते. ‘लेपर्ड-१’ रणगाड्याच्या उत्कृष्ट रचनेमुळे ते रणगाडे जास्त बचावात्मक होते. जड असूनही ते वेगाने पुढे जाऊ शकत होते. त्यांच्या फायर क्षमतेवर वेगाचा विशेष प्रभाव पडत नव्हता. यामुळे हे रणगाडे प्रत्येक बाबतीत कोणत्याही मुख्य लढाऊ रणगाड्यांपेक्षा खूप पुढे होते.
‘लेपर्ड-१’मध्ये तयार करण्यात आलेले तंत्रज्ञान आणि डिझाईन जर्मन ‘लेपर्ड-२’ आणि अमेरिकेच्या ‘केएम १’ अब्राम रणगाड्यात वापरले गेले. म्हणूनच या रणगाड्यांची अग्निरोधक यंत्रणा, शस्त्रसामग्री आणि ट्रॅक जवळपाससारखाच आहे. त्यामुळे हे रणगाडे जगात सध्या सरस मानले जातात. या रणगाड्याची क्षमता तपासण्यासाठी जर्मनीने एक चाचणीही केली. एका सैनिकाने ‘लेपर्ड-२’ रणगाड्याच्या बॅरलवर एक ग्लास ठेवला. जेव्हा रणगाडा चालू लागला तेव्हा हा ग्लास पडलादेखील नाही आणि जागेवरून हललाही नाही. तसेच, रणगाड्याने आपले अचूक लक्षही साधले. त्यामुळे या रणगाड्याला ‘ऑलराऊंडर’ही म्हटले जाते. हा रणगाडा ७० किमीच्या वेगाने पुढे सरकू शकतो. तसेच या रणगाड्याचे संचालन करताना सैनिकाला चहूबाजूने सुरक्षा उपलब्ध करून भुसुरुंगाच्या धोक्यापासून स्वतःला वाचवितो.
अचूक मारक क्षमता, वेग ही या रणगाड्याची वैशिष्ट्ये. त्यामुळेच युरोपातील बहुतांश देशांकडे हा रणगाडा ताफ्यात दिसून येतो. त्यातच युक्रेनला हा रणगाडा देण्यासाठी पोलंड देश सर्वाधिक आघाडीवर असून, तो देण्यासाठी जर्मनीच्या परवानगीची वाट बघत आहे.जर्मनीचा ‘लेपर्ड-२’ हा रणगाडा युक्रेनच्या भूमिवर निर्णायकी लढत तर देईलच, मात्र रशियन अत्याधुनिक रणगाडे, रणगाडाविरोधी असलेली ‘कॉर्नेट’ क्षेपणास्त्रे ही ‘लेपर्ड-२’ला सहज लक्ष्य बनवतील,अशी प्रतिक्रिया रशियाच्या सरकारकडून आली आहे. त्यामुळे येणारा काळच ‘लेपर्ड’चे भविष्य ठरविणार आहे. कारण, याआधी ‘लेपर्ड-२’चा जगातील शस्त्रास्त्राने बलाढ्य असलेल्या देशाशी सामना झालेला नाही!