फटाकेबंदीआडून हिंदू ‘टार्गेट’?

    08-Sep-2022   
Total Views |
arvind
 
 
स्वतःला ‘सामान्यांचे मुख्यमंत्री’ म्हणवून घेणार्‍या केजरीवालांनी दिल्ली आणि पंजाबनंतर देश जिंकण्यासाठी ‘रेवडी कल्चर’च्या वल्गना करण्यास आतापासूनच सुरुवात केली. “मी सरकारी घरात राहणार नाही,” अशी शपथ घेणार्‍या केजरीवालांनी इतकी सफाईदारपणे पलटी मारली की त्यांनी पलट्या मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले नितीश कुमार यांनाही मागे टाकले. असो. आता मोफतवाटप योजनेसाठी प्रसिद्ध केजरीवाल हिंदूंच्या सणांच्या मुळावर उठले आहेत. आता दिल्ली सरकारने पुन्हा एकदा दिवाळी आणि छठपूजेच्या दिवशी फटाक्यांवर बंदी घातली आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी ही घोषणा केली.
 
मागील वर्षी हिंदूंच्या तीव्र विरोधानंतरही केजरीवाल सरकारने दिवाळी आणि छठच्या दिवशी फटाक्यांवर बंदी घातली होती. दिल्लीतील जनतेला प्रदूषणाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यावेळी तसेच, फटाक्यांची ऑनलाईन विक्री व वितरणावरही बंदी असणार आहे. हे निर्बंध दि. 1 जानेवारी, 2023 पर्यंत लागू राहणार असून बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी दिल्ली पोलीस, ‘डीपीसीसी’ आणि महसूल विभागासोबत कृती आराखडा तयार केला जाईल, असे गोपाल राय यांनी सांगितले आहे. केजरीवाल सरकार हिंदू सणांनाच ‘टार्गेट’ करते आहे की काय असा सवाल या निर्णयामुळे उपस्थित झाला आहे.
 
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. फटाके प्रदूषणाचे स्रोत नाहीत हे न्यायालयात सिद्ध झाले असून ते वैज्ञानिक अहवालातही स्पष्ट झाले आहे. परंतु, केजरीवाल दिल्ली प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरले असल्याने आता फटाक्यांवर बंदी घालून दिखावा करतात का, असा सवाल मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे हा निर्णय मुस्लीम तुष्टीकरणाचा प्रयत्न तर नाही ना अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. फटाक्यांना बंदी परंतु, बकरी-ईदला दिल्लीत जनावरांच्या कत्तलीवर किंवा अवैध कत्तलखान्याला हातही लावायचा नाही. म्हणूनच प्रदूषणाच्या नावाखाली हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्नच या निर्णयाच्या माध्यमातून दिल्ली सरकारने केल्याचे यातून दिसून येते.
  
 
हिंदू एकतेचे ‘ब्रह्मास्त्र’
 
उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घ्यायला गेलेला अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट यांना दर्शन न घेताच माघारी फिरावे लागले. मंदिराबाहेर हिंदू संघटनांच्या जोरदार विरोधामुळे आणि निदर्शनामुळे दोघांनाही महाकालेश्वराचे दर्शन घेता आले नाही. हिंदू संघटनांनी काळे झेंडे दाखवून त्याला जोरदार विरोध केला. काही दिवसांपूर्वीच ‘व्हायरल’ झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीरने स्वतःला ‘बीफ लवर’ अर्थात गोमांसप्रेमी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रणबीरवर देशभरातून टिकेची झोड उठली. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट दि. ९  सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
 
या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. यासोबतच खान शाहरुख खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. मात्र, रणबीरच्या गोमांस प्रेमामुळे त्याच्याविरोधात हिंदू समाज भडकला असून ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाविरोधातही ‘बॉयकॉट’ मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे आता रणबीरलाही आपल्या चित्रपटाची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे आता हिंदूंचा रोष कमी होईल यासाठी त्याने मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्याने महाकालेश्वराचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या गोमांसप्रेमामुळे भडकलेल्या हिंदूंनी त्याचा हा प्रयत्न हाणू पाडत त्याला आल्या पावली माघारी जाण्यास भाग पाडले.
 
रणबीरला विरोध करण्यासाठी आंदोलक ‘व्हीव्हीआयपी’ गेटवर थांबून ‘जय श्री राम’च्या घोषणा देत होते. एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक पाहताच रणबीर आणि आलिया आल्या पावली परत गेले. विशेष म्हणजे, चित्रपटासंबंधित अन्य लोकांनी दर्शन घेऊन पूजाही केली. परंतु, गोमांसप्रेमी रणबीरला लोकांनी दर्शन घेऊ दिले नाही. कुणी का खावं हा वेगळा विषय असला तरीही हिंदूंना दुखावणं ही आजकाल अगदी साधारण गोष्ट बनली आहे. परंतु, ‘द काश्मीर फाईल्स’नंतर हिंदूंनी एक होत बॉलीवूडला आपल्या भावनांची दखल घ्यायला भाग पाडले. तसेच, ‘बॉयकॉट’ मोहिमेतून धडाही शिकवला. गोमांस आवडत असल्याची जाहीर कबुली देणार्‍या रणवीरने मग महाकालचे दर्शन घेण्याची नौटंकी का करावी असाही प्रश्न उभा राहतो. हिंदू एकतेचं ‘ब्रह्मास्त्र’ गोमांसाचे गोडवे गाणार्‍या रणबीरला धडा शिकवेल का, हे येत्या काही दिवसांत समजेलच!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.