मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच मरिन लाईन्स मुंबई येथील ‘एचव्हीबी ग्लोबल ॲकॅडमी` या शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते यावेळी `राईट रोडमॅप टू सक्सेस` या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘एचव्हीबी ग्लोबल ॲकॅडमी`चे अध्यक्ष सुरेंद्र सोमाणी, उपाध्यक्ष अर्जुन जटीया, लेखक प्रो. आनंद रंगनाथन, विजय कलंत्री, राज पुरोहित व मुख्याधिकारी तथा प्राचार्या डॉ. चंद्रकांता पाठक यावेळी उपस्थित होते.
शिक्षणाचा हेतू चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण करणे आहे, असे सांगून “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नीतिमूल्ये, भारतीय परंपरा व संस्कारांना महत्व देण्यात आले आहे,” असे राज्यपालांनी सांगितले. “भारतीय चिंतनात विश्वबंधुत्वाची व्यापक जाणीव दिली आहे असे सांगून उत्तम शिक्षण प्राप्त केलेल्या व्यक्तीने माता, मातृभाषा व मातृभूमीला विसरता कामा नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मुख्यतः परदेशी संस्थांशी सहकार्य, क्रेडिट्स ट्रान्स्फर आदी गोष्टींवर भर दिला गेला असला, तरीही मुख्य उद्देश्य आनंदी नागरिक निर्माण करणे हा आहे, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.