‘आप’चा असहकार...

    15-Sep-2022   
Total Views |
arvind kejriwal
 
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सैन्य भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल करत ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली. या योजनेला अपेक्षेप्रमाणे कट्टरतावाद्यांचा विरोध झाला. पण, नंतर या योजनेचे महत्त्व सामान्यांना समजावण्यात मोदी सरकारला यश आल्याने योजनेला होणारा विरोधही नंतर सौम्य होऊन मावळला. विविध राज्यांमध्ये आता या योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. नुकतीच पंजाबमध्येही ’अग्निवीरां’च्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. परंतु, आता ही भरती पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाच्या असहकार्यामुळे ही भरती लांबणीवर पडण्याची किंवा अन्य राज्यांत घेतली जाण्याची शक्यता आहे.
 
 
परिणामी, उच्छुक उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंजाबमधील जालंधरमध्ये ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. परंतु, जालंधरमधील लष्कराचे झोनल रिक्रूटिंग ऑफिसर मेजर जनरल शरद विक्रम सिंग यांनी स्थानिक प्रशासनाच्या असहकार्याचा हवाला देत पंजाब सरकारला पत्र लिहिले आहे. त्यात राज्यात ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत भरती मेळावा एकतर पुढे ढकलला जाऊ शकतो किंवा शेजारच्या राज्यांमध्ये हलवला जाऊ शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने लिहिलेल्या या पत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, सुरक्षेसाठी पोलिसांची मदत, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक बॅरिकेडिंग, उमेदवारांशी संबंधित अत्यावश्यक आवश्यकता यासारख्या गोष्टींसाठी स्थानिक प्रशासन जबाबदार मानले गेले आहे. पत्रानुसार पंजाबचे स्थानिक प्रशासन या जबाबदार्या घेण्यात अपयशी ठरले आहे. ‘अग्निपथ’ योजनेच्या भरती प्रक्रियेशी संबंधित या पत्रात १४ दिवसांसाठी तीन ते चार हजार उमेदवारांना पावसापासून वाचण्यासाठी निवारा, पाणी, फिरते शौचालय आणि भोजन या मूलभूत सुविधांची व्यवस्था करावी लागेल, असेही म्हटले आहे. दरम्यान, १७ ते ३० सप्टेंबर दरम्यान ही भरती प्रक्रिया नियोजित आहे. परंतु, पंजाबमधील ‘आप’ सरकारच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे तरुणांचे भविष्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे वेळीच या भरती प्रक्रियेला पंजाबमधील मान सरकारने सहकार्य करणे गरजेचे आहे, अन्यथा राजकारण आणि गुजरात जिंकण्याच्या नादात देशसेवेसाठी इच्छुक युवकांच्या आशेवर पाणी फिरायचे.
हा तर बहुश्रुत मुख्यमंत्री!
आधी दहीहंडी उत्सव आणि नंतर गणेशोत्सवातही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्षरश: पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे फिरत होते. त्यांनी दिवसरात्र, काळवेळ असा कशाचाही विचार न करता गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. एवढेच नाही, तर विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळी, कार्यकर्ते यांच्या घरीही गणेशदर्शनासाठी त्यांनी हजेरी लावली. अशाप्रकारे मुख्यमंत्री राज्याच्या कानाकोपर्यात फिरतोय म्हटल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गोटात मात्र चिंतेचा ढग जमा झाले. खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांसारख्या मंडळींनी ‘फिरता मुख्यमंत्री’ म्हणत एकनाथ शिंदे यांची अवहेलना करण्याचाच केविलवाणा प्रयत्न केला.
 
 
सुप्रियाताईंनी तर मुख्यमंत्र्यांनी इतके फिरण्यापेक्षा मंत्रालयात बसून जनतेची कामे करावी, असा नेहमीप्रमाणे ताईगिरीचा सल्लाही दिला. त्यामुळे आपल्यापेक्षा, आपल्या पक्षातील नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेच जास्त फिरताहेत म्हटल्यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटातही अस्वस्थता पसरली. जणू राज्याचे दौरे करण्याचा ठेका राष्ट्रवादीच्याच नेतेमंडळींनी घेतला आहे, या अविर्भावात वावरणार्या नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्या दौर्यांनी खरंतर पोलखोल केली.
 
 
पण, यानिमित्ताने का होईना विरोधकांचा दुटप्पीपणा उघड झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आधी कोरोनामुळे आणि नंतर आजारपणामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरीच बसून होते. मंत्रालयामध्ये तर ते हाताच्या बोटावर मोजण्याइतपत फिरकले असावेत. त्यावेळी मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम होम’ वगैरे करत असल्याची टीकाही झाली.
 
 
पण, तरीही ‘बेस्ट मुख्यमंत्री’ म्हणून मिरवण्यात महाविकास आघाडी सरकारने धन्यता मानली. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री इतर नेतेमंडळींनाही भेटत नव्हते, जनतेला, कार्यकर्त्यांना तर भेटणे दूरच. पण, आपल्या अशा या त्यांच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहण्याच्या सवयीनेच त्यांचा म्हणा घात केला आणि नाराज शिवसेनेचे आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली उठाव करून मोकळे झाले. तेव्हा, सुप्रियाताईंनी एकनाथ शिंदेंना हिणवण्यापेक्षा त्यांच्या अडीच वर्षांच्या काळातील मुख्यमंत्री किती फिरले अन् किती नाही, त्याचाही जरा हिशोब मांडावा. कारण, मुख्यमंत्र्याने केवळ मंत्रालयात बसून कारभार न हाकता, राज्यात फिरुन सत्यस्थितीही समजून घेणे क्रमप्राप्त आणि तेच शिंदेंच्या दौर्यांचे, दर्शनाचे फलित म्हणावे लागेल.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.