निवृत्त सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनकडुन १२७ माजी सैनिकांचा गौरव
09-Aug-2022
Total Views | 77
4
ठाणे : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या वाटचालीचे खरे श्रेय निवृत्त सैनिकांनाच आहे.असे प्रतिपादन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ठाणे हाउसिंग फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले माजी सैनिकांच्या मालमत्ता करासंबधी तसेच लॅण्ड कन्व्हेयन्सबाबतच्या (भू अभिहस्तांतरण) अडचणी तातडीने सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
तर, सैनिकांसाठी कन्व्हेयन्स प्रक्रिया तीन महिन्यात राबवण्याचे प्रयोजन उपनिबंधक किरण सोनावणे यांनी जाहीर करून या क्लिष्ट प्रक्रियेसाठी हौसिंग फेडरेशनचे साहय घेण्याची सुचना उपस्थित सैनिकांना केली. केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्यावतीने १२७ निवृत्त सैनिकांचा गौरव ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी ठाण्याच्या सहयोग मंदिर सभागृहात पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी व उपनिबंधक बोलत होते.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधुन यंदा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारकडुन 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी ठाण्यातील १२७ निवृत्त सैनिकांचा गौरव ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याहस्ते करण्यात आला. या माजी सैनिकांना सन्मानचिन्ह व तिरंगा ध्वज भेट देण्यात आला.
ठाण्यातील सहयोग मंदिर हॉलमध्ये पार पडलेल्या या समारंभाला व्यासपीठावर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक किरण सोनावणे, महाराष्ट्र हौसिंग फेडरेशन तथा ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे,उपाध्यक्ष राम भोसले, निवृत्त सुभेदार मनोहर शिर्के, कमोडर बी.बी. मिस्त्री, लेफ्ट. कमांडट गिरीराज सोलंकी, ब्रिग्रेडीयर सुधीर सावंत उपस्थित होते. तर, लातुरचे शहीद जवान रोहित शिंगाडे यांचे कुटुंबियही कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मनोगतात सीताराम राणे यांनी हौसिंग फेडरेशनच्या वाटचालीबद्दल माहिती देऊन निवृत्त सैनिकांच्या सन्मानाचे औचित्य विषद केले. तसेच, फेडरेशनच्यावतीने ठाण्यातील सात हजार सोसायट्यांना नाममात्र किंमतीत ध्वज देण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.यावेळी कमोडर बी.बी. मिस्त्री यांनी निवृत्त सैनिकांना ठाणे मनपा प्रशासन तसेच अन्य प्राधिकरणाकडे कन्व्हेयन्ससाठी होणाऱ्या त्रासाबद्दल खंत व्यक्त केली. ब्रिग्रेडीयर सुधीर सावंत यांनी माजी सैनिकांना कधीच निवृत्त करू नका. त्यांच्या नोकरीसाठी तसेच अन्य समस्याकडे जिल्हा प्रशासन किंबहुना सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे आग्रही मत व्यक्त केले.
यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उपनिबंधक किरण सोनावणे यांनी, माजी सैनिकांच्या लॅण्ड कन्व्हेयन्सच्या समस्येसाठी येत्या तीन महिन्यात कार्यवाही केली जाईल. हे काम थोडे क्लिष्ट असते पण यासाठी हौसिंग फेडरेशनची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बोलताना,देशाच्या अमृतमहोत्सवी वाटचालीचे खरे श्रेय या निवृत्त सैनिकांना असल्याचे आवर्जुन नमुद केले. माजी सैनिकांनी उपस्थित केलेल्या, मालमत्ता करासंबधी आणि लॅण्ड कन्व्हेयन्ससंदर्भात बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी, हौसिंग फेडरेशनच्या माध्यमातुन येत्या तीन महिन्यात या समस्या उपनिबंधक व आम्ही एकत्रितरित्या सोडवणार. त्याचबरोबर सैनिकांच्या राज्य स्तरावरील प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासित केले.
निवृत्तीनंतर सैनिकांना सहसा मुंबईसारखी महानगरे परवडत नाहीत. त्यातच ठाण्यात परवडणारी घरे उपलब्ध असल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांचा ओढा ठाण्यात वाढत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात दरवर्षी २ हजारच्या आसपास पेंशनर्स वाढत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. न भूतो न भविष्यती असा झालेला हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मान्यवरांनी ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.
म्हणुन,...ठाण्यातुन सैन्यदलात ओढा कमी
ठाणे जिल्हा एमएमआर क्षेत्रात येतो. या भागात व्यवसायास संधी अधिक असुन तरुणांना औद्योगिक तसेच कार्पोरेट क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध असते. त्यामुळे ठाण्यातील युवावर्गाचा सैन्यदलात जाण्याचा ओढा कमी असावा. असेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.