अंध बांधवांसाठीचा ‘अरुणोदय’

    30-Aug-2022
Total Views | 72

porje
 
 
स्वतः अंध असूनही इतर दृष्टिहीन बांधवांना सर्वांगीण मदत मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्नशील असणार्‍या नाशिकच्या अरुण भारस्कर यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
अरुण भारस्कर हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मालेगावचे रहिवासी.नोकरीनिमित्त मागील अनेक वर्षांपासून ते नाशिक शहरात वास्तव्यास आहेत. जन्मतः अंधत्व असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, सर्व संकटांवर नेटाने मात करून त्यांनी सक्षमपणे स्वतःचे अस्तित्व समाजात निर्माण केले. तसेच, समाजातील इतर अंध बांधवांना हक्काचे व्यासपीठ निर्माण होईल, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यासाठी ते अगदी दिवसरात्र एक करुन झटले-झगडले.
 
अखेरीस 2006 साली अरुण भारस्कर यांनी ‘द ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ या संस्थेची स्थापना केली. संस्था स्थापन करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश होता की, अंध नागरिकांना सहज साहाय्य मिळाले पाहिजे. या संस्थेअंतर्गत आजपर्यंत त्यांनी शेकडो अंध नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या पवित्र सेवाकार्यात अरुण यांना इतर नागरिकांनीदेखील मदत केली. अजूनही अंध व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांची सतत धडपड असते. प्रत्येक अंध व्यक्ती जर शिकला, तर त्याला फायदा होईल, नोकरी मिळेल आणि तो त्याचा उदरनिर्वाह स्वतः करून समाजात स्वावलंबी व्यक्ती म्हणून जगेल. हाच ध्यास घेऊन अरुण आजही त्याच उमेदीने कार्यरत आहेत.
 
कोरोना महामारीच्या कालावधीत सामान्यांसह अनेक अंध व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी अरुण भारस्कर यांनी विविध संस्थांची मदत घेऊन गरजू अंध व्यक्तींना वेळोवेळी किराणा वाटप तसेच दैनंदिन वस्तूदेखील उपलब्ध करून दिल्या. तसेच,विविध ‘शिष्यवृत्ती योजना’, अंध व्यक्तींसाठी असलेल्या स्वयंरोजगार योजना, शैक्षणिक साहित्याची निर्मिती, क्रीडा स्पर्धा, विवाह सोहळा, ‘अंधत्व निर्मूलन शिष्यवृत्ती योजना’ याबाबत अरुण यांनी सदैव अंध बांधवांना सहकार्य केले. आतापर्यंत साधारणतः1840 विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अंधत्व निर्मूलन शिष्यवृत्ती योजने’चा लाभ मिळवून दिला आहे. ‘स्वयंरोजगार योजना’अंतर्गत 129 अंध व्यक्तींचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासही त्यांनी साहाय्य केले आहे.
  
तसेच शैक्षणिक साहित्य उपक्रमाअंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम ब्रेल लिपीत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी छापली. यामुळे अंध विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अधिक सोपे झाल्याचे ते सांगतात. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढेल, तसेच अंध व्यक्तींना धार्मिक वाचन करण्यासाठी साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी चक्क ब्रेल लिपीत त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ची छपाई केली आहे. त्र्यंबकेश्वर येथील स्वामी जनार्दन मठात दृष्टिहीन बांधवांसाठी ‘दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ व महंत महामंडलेश्वर 1008 ह.भ.प. रघुनाथदास देवबाप्पा, माऊली धाम यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात 80 लोकांनी सहभाग नोंदविला होता. दृष्टिबाधितांनी पारायणासाठी त्यांना ब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘हरिपाठ’ संग्रह उपलब्ध करून देण्यात आले. या राबविलेल्या उपक्रमाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कौतुक केले होते.
 
 
2022 हे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष असून या अनुषंगाने अरुण भारस्कर यांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. सध्या त्या विषयावर त्यांची संस्था कार्यरत आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांच्या पुस्तिकेच्या ब्रेल लिपीतील एक हजार प्रती तयार करून दृष्टिबाधितांपर्यंतही वाजपेयी यांचे विचार आणि साहित्य पोहोचवण्याचे त्यांचे ध्येय आहे.
 
समाजातील दृष्टिहीन बांधवांवर छोट्या छोट्या गोष्टींसाठी परावलंबी जीवन जगण्याची वेळ येऊ नये, यासाठी अरुण भारस्कर प्रयत्नशील आहेत. स्वतः दृष्टिहीन असल्यामुळे त्यांना वैयक्तिक स्तरावर अनेकविध अडचणींचा सामना करावा लागला. बरेच हाल सोसावे लागले. शैक्षणिकदृष्ट्याही सगळे काही आव्हानात्मक होते. त्याविषयी अरुण म्हणतात की, “अंध व्यक्तींना खूप त्रासातून जावे लागते आणि ही सर्व परिस्थिती मी स्वत: भोगली आहे. त्यामुळे माझ्यासारख्या अंध बांधवांना हे दिव्य भोगावे लागू नये, याकरिता माझी धडपड आहे.”
 
म्हणूनच आपल्या संस्थेच्या माध्यमातून अरुण भारस्कर अंध बांधवांना लागेल ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. यासाठी वेळोवेळी त्यांना समाजातील इतर सक्रीय मंडळींचाही पाठिंबा लाभतो. त्यामुळे अंध बांधवांना वेळोवेळी सर्व गोष्टी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे अरुण भारस्कर सांगतात. त्यांच्या या कार्यास आगामी काळासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेछा...!
 
- गायत्री पोरजे
 
(अधिक माहितीसाठी संपर्क - अरुण भारस्कर - 9822900717)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121