धर्मकार्याची प्रेरणा...

    29-Aug-2022   
Total Views |
 
lta
 
 
 
स्वत:सोबतच परिसराचा कायापालट करणार्‍या लता कांबळे. अल्पशिक्षित, भंगार वेचण्याचे काम करणार्‍या लतांचे धर्मकार्य थक्क करणारे आहे. त्या कार्यविचारांचा घेतलेला मागोवा...
 
जगन्नाथ अडसूळ आणि मुक्ता हे दाम्पत्य मूळचे सोलापूरचे. कामानिमित्त ते पुण्यात आले. जगन्नाथ मोलमजुरी करत, तर मुक्ता या भंगाराचा व्यवसाय करत. मातंग समाजातील हे दाम्पत्य, अत्यंत रूढीपरंपरेने अंधित. त्यांच्या कन्या लता. लता सहावी इयत्तेत शिकत असताना त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातच त्यांनाही स्थळ आले. मग दोघा बहिणींचे लग्न एकाच मांडवात उरकण्यात आले. लता यांना शिकायचे होते. पण, त्यांचे कोण ऐकणार? त्यांच्या शिक्षिकांनी घरी येऊन मुक्ताबाईंना खूप विनवणी केली की, “मुलगी लहान आहे. शिकू द्या तिला.” मात्र, लग्न ठरल्यानंतर ते ठरल्या वेळेत झाले नाही तर लोक काय बोलतील? तसेच गरिबीच्या परिस्थितीत लेक तिच्या हक्काच्या घरात गेलेलीच बरी, असा सूर अडसूळ दाम्पत्याचा होता. वयाच्या बाराव्या वर्षी लतांचा विवाह भागवत कांबळे यांच्याशी झाला. पुण्यातून त्या बार्शी येथील खेडेगावात आल्या. छोटीशी पोर पदर खोचून दुसर्‍या दिवसापासूनच घर सांभाळू लागली. घरात २५ ते ३०माणसांचा राबता. त्यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होई. दिवस असेच जात होते.
 
वयाच्या १३व्या वर्षीच त्या आई झाल्या. मुलगी झाली. मुलगा जन्माला यायला हवा असा सगळ्यांचा सूर होता. दुसर्‍या वेळीही त्यांना मुलगी झाली. तिसर्‍या बाळंतपणावेळी मुलगा झाला. संयुक्त कुटुंब होते. अन्नधान्य दहीदुभत्याची कमी नव्हती. पण, तीन मुलांचे औषधपाणी, त्यांच्या इतर गरजा, यासाठी पैसा लागणारच होता. शेवटी त्या आणि त्यांचा पती पुण्याला आले. मात्र, पुण्याला आल्यानंतरही एका मुलाच्या जोडीला दुसरा मुलगा हवाच, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे मुलाच्या पाठीवर तीन मुली झाल्या. पाच मुली एक मुलगा आणि घरात अठराविश्वे दारिद्य्र. कसे होणार या मुलांचे? आपल्यासारखेच या मुलींना शिक्षण सोडून लग्नात अडकवायचे का? लतांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत. तसे पुण्याच्या त्या ‘ओटा स्किम झोपडपट्टी’ भागात मुलींनी काय, मुलांनीही शिकावे, असे काही प्रेरणादायी नव्हतेच. तरीही लता यांनी ठरवले मुलींना शिकवायचे. पुण्यातल्या त्या झोपडपट्टीत त्या कचरा वेचून त्यातून भंगार विकायचे काम करू लागल्या. त्यांची मोठी लेक त्यावेळी दहावीला होती. ती बाकीच्या पाच भावंडांकडे लक्ष देई. सगळ्यात छोट्या बहिणीला तर स्वत:सोबत शाळेतही घेऊन जाई. घरात मोठे कुणी नाही, म्हणून शिक्षिकाही तिला छोट्या बहिणीसोबत शाळेत बसू देत.
 
या सगळ्या परिस्थितीमध्ये लता यांचा जीव कसानुसा होई. आपल्या लेकीला आपल्या सारखेच लहान वयात घर सांभाळावे लागते, या विचाराने त्या हतबल होई. अशातच एका ओळखीच्या महिलेने लतांना सांगितले की, “चर्चमध्ये चल. तुझी सगळी दु:खे दूर होतील.” लता एक वर्ष चर्चमध्ये जाऊ लागल्या. परिस्थितीत सुधारणा झाली नाही. याच काळात लता यांचे नातेवाईक कांबळे मामा तिला भेटले. ते ‘धर्म जागरण’चे काम करतात. ते म्हणाले, ”देवाचे नावच घ्यायचे तर आपले देव कमी आहेत का? ‘धर्म जागरण मंचा’ची एक सामुदायिक पूजा आयोजित केली आहे. तू तुझ्या पतीसोबत त्या पूजेला बस.” ब्राह्मणांनी आपल्यासाठी मंत्र म्हणणे आणि आपल्या हाताने देवाची पूजा होणे, हे लता यांच्यासाठी खूप भारी होते. त्यानंतर काही दिवसांतच लतांच्या घरी मंचाच्या माध्यमातून एक मोठे संत आले. त्यांनी घरातल्या सगळ्यांना रूद्राक्ष दिले. ”देव सत्कर्माच्या आणि धर्मशील व्यक्तींच्या कायमच सोबत राहतो, आशा कधी सोडू नये, दिवस बदलतील,” असे त्यांनी लतांना सांगितले. तो काळ असा होता की, लता यांना मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. समस्या आल्या, तरी त्याला सामोरे जाण्यासाठी बळ देणारे कुणीच नव्हते. आपल्या पाच मुलींचे कसे होणार? या चिंतेने ग्रासलेल्या लता यांना संतवचनाने हुरूप आला. आपण आपल्या मुलींना शिकवायचे ठरवले, तसे परिसरातील कुटुंबांनीही मुलींना शिकवावे, आपला स्वधर्म सोडू नये, यासाठी लता प्रयत्न करू लागल्या. त्यांनी त्यांच्या मुलींना सांगितले, परिसरातील तुमच्या मैत्रिणींना दर रविवारी बाजूच्या दत्त मंदिरात बोलवा. या मुलींची लता यांनी समिती बनवली. त्या परिसराचे नाव ‘ओटा स्किम’ आहे. त्यामुळे ’ओटा स्किम समिती’ असे नाव ठेवण्यात आले.
 
दर रविवारी मुली एकत्र येऊ लागल्या. मुली काय करतात, हे पाहण्यासाठी मुलींचे पालकही एकत्र येऊ लागले. दत्त मंदिरात भजन-कीर्तनात रंगू लागले. मातंग समाजाच्या महापुरुषांच्या कथा ऐकण्यात मग्न होऊ लागले. काही दिवसांनी या परिसरात आमूलाग्र बदल झाला. आपल्याला चांगले दिवस यावे, आपले मन रमावे, यासाठी चर्चमध्ये जाणारी कुटुंबे या मंदिरात येऊ लागली. आपला धर्म सोडून काय मिळणार, याचा संवाद घडू लागला. बघता बघता परिसरातील दीडशेपेक्षा जास्त कुटुंबांनी चर्चमध्ये जाणे सोडले. लता म्हणतात, “या सगळ्या घटनाक्रमात ‘धर्म जागरण’च्या सर्व सहकार्‍यांचे कष्ट होते. ‘धर्म जागरण मंचा’चे हेमंत हरहरे काका यांनी मला खूप प्रेरणा दिली.” लता यांनी कोरोना काळात या संपूर्ण परिसरात सेवाकार्याचा धडाका लावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अन्नवितरण, औषधवितरण आरोग्य शिबीर आयोजन असे विविध उपक्रम त्यांनी राबविले. या सगळ्यांमध्ये लतांच्या मुली त्यांच्या सोबत होत्या. आपण स्वावलंबी होऊन समाजाची आणि धर्माची सेवा करावी, असे आता या मायलेकींनी ठरवले आहे. मुलींचे विवाह झाले की, पोटापुरते अर्थार्जन करायचे आणि पूर्ण वेळ धर्म जागरणासाठी काम करायचे, असा लता यांचा निश्चय आहे. गरिबाच्या झोपडीतही धर्माचे संस्कार उजळवण्यासाठी आयुष्य वेचू इच्छिणार्‍या लता कांबळे यांच्यासारख्या मातृशक्तीमुळेच धर्माचे तेज कायम आहे, हे नक्की!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.