पुढील सुनावणी पर्यंत कारशेड क्षेत्रातील झाडे कापू नका – सर्वोच्च न्यायालय
24-Aug-2022
Total Views | 123
1
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) दि. ५ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन करू नये आणि मुंबईच्या आरे कारशेड क्षेत्रातील झाडे तोडू नयेत असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दि. २४ ऑगस्ट रोजी एमएमआरसीएलला दिला आहे.
मुंबईच्या आरे वनक्षेत्रात मेट्रो शेड बांधण्यासाठी एमएमआरसीने झाडे तोडण्यास आणि विकासात्मक कामांना विरोध करणाऱ्या एनजीओ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने एमएमआरसीएलने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आरे वनक्षेत्रामध्ये झाडे तोडण्यास मनाई केली आहे. तरीदेखील झाडे तोडल्यास न्यायालया त्यांची दखल घेईल आणि एमएमआरसीएलवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 'वनशक्ती' या एनजीओतर्फे ज्येष्ठ वकील अनिथा शेनॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाला मेट्रो प्रकल्पासंदर्भातील कोणत्याही प्रकारचे काम थांबवून यथास्थिती आदेश जारी करण्याची विनंती केली. परंतु, विकासाच्या आड न येता, सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो कारशेडसंदर्भात कोणताही आदेश दिलेला नाही. तसेच या आधी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एमएमआरसीएलने फक्त छोट्या झुडपांची आणि फांद्यांची छाटणी करण्यात आली असल्याचे म्हटले होते. याचा आधार घेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केवळ काही फांद्यांची छाटणी झाली असून आणि एकही झाड कापले गेले नसल्याचे स्पष्ट केले.