मुंबई: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. सतत माध्यमांसमोर येऊन खळबळजनक विधानं करणारे राऊत आता ईडी कोठडीत असल्याने राजकीय वातावरण शांत आहे. राऊत कोठडीत गेल्यानंतर सर्वानाच एक प्रश्न आहे की, माध्यमांसमोर येऊन बरळणारे राऊत आता मात्र, ईडी कोठडीत काय करतात?
राऊतांना सामान्य बराकीत न ठेवता विशेष कैद्यांसाठी असलेल्या खोलीत ठेवण्यात आले आहे. या खोलीत ते एकटेच आहेत. मात्र, जेवण, नाष्टा घेण्याच्या वेळी लॉकअप उघडले जाते. यापूर्वीच या जेलमध्ये असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासाेबत राऊतांच्या भेटी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तिघांनाही विशेष कैदी म्हणून वागवले जात आहे. बहुचर्चित प्रकरणांतील आरोपी विशेष कैदी म्हणून गणले जातात. विशेष कैदी असल्यामुळे या तिघांनाही सामान्य बराकीऐवजी १० बाय १० आकाराच्या स्वतंत्र खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. या खोल्यांत पंखा, स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. या रूममध्ये अन्य कुणी कैदी नसल्याने एकांतातच दिवस काढावे लागतात. फक्त जेवणाच्या वेळी सर्व कच्च्या कोठडीतील कैद्यांना बराकीबाहेर येण्याची मुभा असते.
सकाळी ६ वाजता सर्व कैदी उठतात. साडेसात वाजेपर्यंत नाष्टा घेण्यासाठी तयार होतात. साडेसात वाजता सर्व बराकी उघडल्या जातात. कैदी आपापला नाष्टा घेऊन बराकीत जातात. ९ वाजता कारागृह अधीक्षकांची संचारफेरी होते. या फेरीदरम्यान सर्व कैद्यांना आपापले हिस्ट्री कार्ड समोर धरून उभे राहावे लागते. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांनाही हे कार्ड घेऊन उभे राहावे लागते. या कार्डवर गुन्ह्याचा तपशील लिहिलेला असतो.
सकाळी साडेदहा आणि सायंकाळी पाच वाजता कैद्यांना जेवण दिले जाते. जेवण घेण्यासाठी हे कैदी आपापल्या बराकीतून बाहेर येतात. तेवढ्या वेळेत आपापल्या ओळखीतील कैदी एकमेकांशी बोलतात. अगदी तसेच राऊत, देशमुख आणि मलिक हे तिघे जेवणाच्या वेळी बाहेर येण्याची मुभा असलेल्या वेळेतच एकमेकांना भेटतात आणि बोलतात, अशी माहिती आहे.
इतिहासातील पहिलीच वेळ...
ईडीने अटक केल्यानंतर ८ ऑगस्टला राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. याच जेलमध्ये माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हेदेखील न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात एकाच वेळी तीन बडे राजकीय नेते एकाच कारागृहात कोठडीमध्ये असण्याची ही बहुधा इतिहासातील पहिलीच वेळ असेल.