मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड हद्दीतील माळशेज घाटाच्या दुरुस्तीकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही सदर घाटरस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. घाटात सायंकाळी ७ ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणात धुके असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी अडचण होते. त्यात भर म्हणून की काय, सर्वत्र रस्त्याची झालेली चाळण, मोठमोठे खड्डे आणि खड्ड्यांत साचलेले पाणी यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातही या घाटातून रात्रीचा प्रवास करणे, म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखेच आहे.
कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरुन ६१ असे नामकरण केले असले तरीही उच्चशिक्षित अभियंत्यांच्या कामात उंची नसल्याने हा रस्ता अतिशय दर्जाहीन बनविण्यात आला आहे. घाटात दरवर्षी धोकादायक कड्यांवर जाळ्या बसविणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे व रस्त्यावरील खड्डे भरणे अशा दुरुस्तीच्या कामांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. संपूर्ण घाटात मे महिन्यातच खड्डे भरण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसामध्ये रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहे. खड्डे चुकवत वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान, रस्त्याच्या सुशोभीकरणावर भरमसाठ खर्च करूनही याठिकाणी समस्या जैसे-थे आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकदेखील मोडकळीस आले आहे, तर काही ठिकाणी फलकच लावण्यात आलेले नाही.
वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रणच...
या घाटातून रात्रीच्या सुमारास शेकडो मालवाहतूक करणार्या वाहनांची ये-जा असते. मात्र, रस्त्यावरील खड्डे, कधीही दरड कोसळण्याची भीती, दाट धुके यामुळे घाटात वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाला रस्त्याचा क्रमांक बदलण्याचे सुचले, पण रस्त्याची दुरुस्ती आणि सुधारणा करण्याचा विसर पडला, असा आरोप सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.