मुंबई : विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध केल्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बहुमत चाचणीदरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानले. मात्र, फडणविसांच्या वक्तव्याने, बहुमत चाचणी मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहणारे आमदार हेच शिंदे-फडणवीस सरकारला मदत करणारे अदृश्य हात होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
३ जून व ४ जून २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधनसभा अध्यक्ष निवड आणि विश्वासदर्शक ठराव सादर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते. ३ जून रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव करून राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली.
बहुमत चाचणी दरम्यान मतदान प्रक्रियेला उशिरा दाखल झाल्याने, काही आमदारांना मतदान करता आले नाही. कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे, संग्राम जगताप हे सदनाचे दरवाजे बंद झाल्याने मतदान प्रक्रियेतून बाहेर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते हे मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी लघुशंकेला गेल्याने त्यांनीसुधा महाविकास आघाडीला मतदान केले नाही.
विश्वास दर्शक ठराव सादर होत असताना आमदार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील फुट पुन्हा एकदा चर्चिली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते गेले काही महिने वेगवेगळ्या माध्यमातून पक्ष आणि सरकार विषयीची नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानताना त्यांचा रोख हा उनुपास्थित राहणाऱ्या आमदारांकडे होता का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.