लक्षद्वीपचे ‘भ्रष्टवादी’ काका-पुतणे

    14-Jul-2022   
Total Views |
mohammed
 
 
 
इकडे महाराष्ट्रातून अवघ्या चार खासदारांच्या जीवावर थेट मोदींना आव्हान देणार्‍या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेर भलतेच उद्योग सुरू आहेत. केंद्रशासित प्रदेश अर्थात लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आहेत मोहम्मद फैजल. पण, त्याच्या अनोख्या प्रतापांकडे पवार साहेबांचे लक्ष कधी जाणार, असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण, खा. मोहम्मद फैजल आणि त्यांचा पुतण्या अब्दुल रज्जाक या दोघांविरूद्ध टूना मासळी घोटाळ्याप्रकरणी ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे. काका-पुतण्यावर श्रीलंकन कंपनीशी संगनमत करून स्थानिक मथुरावासीयांची फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणात मंगळवार, दि. १२ जुलैला ‘सीबीआय’ने फैजलच्या लक्षद्वीप आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्याचप्रमाणे, अन्य आरोपींचा लक्षद्वीपसह दिल्ली आणि कोझिकोड केरळ याठिकाणी शोध घेतला जात आहे. गेल्या महिन्यात ‘सीबीआय’सह स्थानिक प्रशासनाने कारवाई सुरू केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ‘सीबीआय’ने ‘लक्षद्वीप को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ (एलसीएमएफ), मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभाग, खादी बोर्ड आणि सहकारी संस्था व पशुसंवर्धन यांसह विविध विभागांची अचानक तपासणी केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात टूना माशाची किंमत ४०० रुपये प्रतिकिलो असून ते ‘लक्षद्वीप कॉर्पोरेट मार्केटिंग फेडरेशन’ने (LCMF) स्थानिक मच्छीमारांकडून खरेदी केले होते. नंतर ते श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील ‘एसआरटी जनरल मर्चंट’नावाच्या कंपनीला विकण्यात आले. मात्र, त्याबदल्यात ‘एसआरटी’ कंपनीने ‘एलसीएमएफ’ला पैसे न दिल्याने स्थानिक मच्छीमारांचे प्रचंड हाल झाले. फैजलचा नातेवाईक अब्दुल रज्जाक हा श्रीलंकेतील त्याच कंपनीत प्रतिनिधी होता, ज्यावर माशांच्या बदल्यात ‘एलसीएमएफ’चे पैसे न दिल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार म्हणून मिरवणारे मोहम्मद फैजल काही धुतल्या तांदळाचे अजिबात नाही. फैजल यांनी गोमांस खाणे हा आमचा संविधानिक अधिकार असल्याची बाष्कळ बडबडही केली होती. तसेच मागील वर्षी लक्षद्वीपमधील प्रशासकीय सुधारणांनाही जोरदार विरोध केला. महाराष्ट्राप्रमाणेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून देव-धर्माला किती महत्त्व दिले जाते, हे सर्वश्रुतच. त्यामुळे फैजल तरी का मागे राहतील म्हणा?
 
 
 
तेजस्वी प्रतापांचा हास्यविनोद
 
बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याचा नुकताच समारोप झाला. यावेळी शताब्दी स्मृती स्तंभाच्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादवदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात तेजस्वी यांना भाषणासाठी चार मिनिटांचा वेळ दिला होता. चार मिनिटे देऊनही त्यांनी चक्क वाचून भाषण केले. परंतु, भाषण वाचत असतानाही ते सहाहून अधिक वेळा अडखळले. भाषण करताना अडखळणं काही मोठी गोष्ट नाही. पण, वाचून भाषण करतानाही अडखळणं आणि तेही बिहार विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याने ही मात्र लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. त्यांच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्ट दिसत होता. साध्या सोप्या ओळीही त्यांना वाचता आल्या नाही. ‘लोकतंत्र’, ‘समक्ष’ असे साधेसोपे शब्ददेखील उच्चारता आले नाही आणि हेच तेजस्वी मागील विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये सत्तांतराच्या गप्पा मारत होते. या घटनेवरून बरं झालं तेजस्वी सत्तेत नाही, म्हणून बिहारवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. तेजस्वी यांच्या अडखळण्यावर सोशल मीडियासह चहूबाजूंनी आता टीका होऊ लागली. दरम्यान, लालूंच्या राजदमध्येही सगळं काही आलबेल आहे, असं नाही. पक्षात तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांचे दोन गट आहेत. लालूंचे मोठे सुपुत्र तेजप्रताप तर जाहीरपणे पक्षातील काही नेत्यांवर आणि तेजस्वीवर आगपाखड करताना दिसून येतात. त्यात आता लालू प्रसाद आजारी आहेत. ३ जुलै रोजी ते जिना उतरताना घसरून पडले आणि त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर आता पक्षातील दुफळी समोर आली. बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्याला साधी कागदावर लिहिलेली हिंदीसुद्धा धडपणे वाचता आली नाही, तर मग सामान्य जनतेने राजदकडून आणि अशा नेत्यांकडून कोणती अपेक्षा करायची? चारा घोटाळ्यात जेलवारी झालेल्या लालूंचा काळाआणि जुलमी इतिहास पुन्हा आठवून देण्याची गरज नाही. ‘सगळं काही आपल्या घरात’ अशी वृत्ती रेटत पुढे जाणार्‍या लालू प्रसाद परिवाराला त्याची फळंही भोगायला लागली. वडील लोकसभेत हास्यजत्रा भरवायचे, मात्र आता त्यांचा मुलगा तेजस्वीच्या या प्रतापांवर जनता हसत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.