नवी दिल्ली: “ ‘अभियांत्रिकीचा चमत्कार’ म्हणून ओळखला जाणारा देशातील पहिला उन्नत शहरी द्रुतगती महामार्ग अर्थात ‘द्वारका एक्सप्रेस-वे’चे बांधकाम अंतिम टप्प्यात असून २०२३ पर्यंत हा महामार्ग कार्यान्वित होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे.
‘द्वारका एक्सप्रेस-वे’मुळे दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्ग (दिल्ली-जयपूर-अहमदाबाद-मुंबई महामार्गाचा सुवर्ण चतुर्भुज प्रकल्पातील काही भाग) आणि आर्टिरिअल रोडवरील दबाव कमी होईल. सध्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. यातील बहुतांशी वाहने ही पश्चिम दिल्लीकडून येतात. मात्र, ‘द्वारका एक्सप्रेस-वे’ कार्यान्वित झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग-८ वरील ५०ते ६० टक्के वाहतूक या नव्या द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे सोहना रोड, गोल्फ कोर्सच्या दिशेने वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
दिल्ली ते हरियाणाच्या गुरुग्रामला जोडणारा हा ‘एक्सप्रेस-वे’ नऊ हजार कोटी रुपये खर्चून विकसित केला जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “एक्सप्रेस-वेमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान तीन लेन सर्व्हिस रोड असून ते १६ मार्गिका असलेल्या ‘एक्सप्रेस-वे’ला जोडलेल्या आहेत. ‘एक्सप्रेस-वे’ची लांबी एकूण २९ किमी असून त्यापैकी १९ किमी हरियाणामध्ये, तर दहा किमी दिल्लीमध्ये आहे. ‘द्वारका एक्सप्रेस-वे’वर चार बहुस्तरीय ‘इंटरचेंज’ असतील. भारतातील सर्वात लांब (३.६ किमी) आणि सर्वात रुंद (आठ मार्गिका) शहरी रस्ता-बोगद्यासह प्रमुख जंक्शन्सवर बोगदे/अंडरपास, रस्ते आणि उड्डाणपूल बांधले जातील.
अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन, टोल व्यवस्थापन, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आदी आंतरराष्ट्रीय स्तराच्या सोयींनी युक्त हा महामार्ग असेल,” असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले आहे.
अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना
‘एक्सप्रेस-वे’च्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात १२ हजार झाडे लावण्यात आली आहेत. हा प्रकल्प अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बांधकामात ३४ मीटर रुंद आठ पदरी एकेरी पक्का रस्ता आहे. या प्रकल्पात दोन लाख मेट्रिक टन (आयफेल टॉवरमध्ये वापरल्या जाणार्या स्टीलपेक्षा ३० पट जास्त) स्टीलचा वापर होईल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे बांधकामात दोन दशलक्ष घनमीटर काँक्रिटचा वापर केला जाईल. जो बुर्ज खलिफामध्ये वापरल्या जाणार्या काँक्रिटपेक्षा सहापट जास्त आहे.