धोका ‘तिस्ता’पंथाचा

    01-Jul-2022   
Total Views |

tista
 
 
 
जिहादी कट्टरतावादास ‘गंगा-जमुनी तहजीब’ असे नाव देऊन हिंसाचाराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचे काम ‘तिस्ता’पंथ दीर्घकाळपासून करत आहे. या पंथास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे दणका बसला आहे. कारण, न्यायालयाने या पंथाची कार्यशैलीच उघडकीस आणली आहे. मात्र, ‘तिस्ता’पंथ आता नव्या कार्यशैलीद्वारे आणि नव्या चेहर्‍यानिशी सक्रिय होण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. त्यामुळे आगामी काळात अशा ‘तिस्ता’पंथाचा धोका ओळखणे हे भारतीय समाजासाठी गरजेचे आहे.
 
 
 
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात विविध पंथ नांदतात. त्यापैकी काही पंथ धार्मिक आहेत, काही राजकीय आहेत आणि काही सामाजिक आहेत. या सर्व पंथांचे आपापले अनुयायीदेखील आहेत. जोपर्यंत हे पंथ भारतीय समाजात गुण्यागोविंदाने नांदतात, तोपर्यंत सामाजिक स्वास्थ्याला त्यांचा धोका नसतो. मात्र, ज्यावेळी हे पंथ बेलगामपणे आपला समाजविघातक अजेंडा पुढे रेटतात, विखारी व्यक्तिद्वेष परसविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात; तेव्हा त्या पंथांचा मोठा धोका निर्माण होतो. तो धोका केवळ समाजालाच नव्हे, तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेलादेखील असतो. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी असावी, हे वाक्य वाचायला जरी छान वाटत असले तरीदेखील समाज आणि देशाला धोका निर्माण करणारी मते कितपत ऐकून घ्यायची, हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात, भारतीय समाजात लोकशाही अगदी खोलवर मुरलेली असल्याने अशा अनेक पंथांना भारतीय समाज आपली भूमिका मांडण्याची संधी देत असतो. मात्र, या चांगुलपणाचा फायदा घेऊन काही विशिष्ट पंथ आणि त्यांचे म्होरके भारतीय अथवा हिंदू समाजाच्याच मुळावर उठण्याचा प्रयत्न करतात. तर असे हिंदू समाजाच्या मुळावर उठण्याचा प्रयत्न करणारे ‘तिस्ता’पंथ आणि त्याचे अनुयायी हे दीर्घकाळच्या लढाईसाठी नेहमी सज्ज असतात. अतिशय शांतपणे हिंदू समाजाला वेठीस धरण्याची त्यांची रणनीती असते. त्यासाठी त्यांना प्रथम दोन गोष्टी लागतात, पहिली म्हणजे हिंदूविरोधी अजेंडा पुढे नेण्यास सक्षम असा चेहरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्वाचे राजकारण आणि समाजकारण करणारा चेहरा. हे दोन्ही चेहरे एकदा सापडले की, ‘तिस्ता’पंथ सक्रिय होतो. त्यासाठी हिंदू समाजाने न घडविलेली गोष्ट त्यानेच घडविली असल्याचे ठासून सांगितले जाते आणि त्यावर मग पुढे हिंदूविरोधाचा कट पद्धतशीरपणे रचला जातो. त्यामध्ये काही राजकीय पक्ष, काही प्रसारमाध्यमे आणि ‘इकोसिस्टीम’मधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील गट यांचा सक्रिय पाठिंबा ‘तिस्ता’पंथींयांना लाभतो आणि मग सुरू होतो तो ‘पुरोगामित्व’ आणि ‘लोकशाहीचे रक्षण’ या गोंडस नावाखाली हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा खेळ.
 
 
 
असाच खेळ गुजरात दंगलीच्या नावे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू समाजाच्या विरोधात तब्बल १९ वर्षे खेळला गेला. मात्र, त्या खेळाचा बुरखा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच फाडला. त्याचे निमित्त होते ते गुजरात दंगलप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाने नरेंद्र मोदी यांना दिलेल्या ‘क्लीनचीट’ला सर्वोच्चन्यायालयात देण्यात आलेले आव्हान. जाकिया जाफरी यांनी मोदींना दिलेल्या ‘क्लीनचीट’विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुजरात दंगल ही नरेंद्र मोदी यांनीच घडविली, या काल्पनिक गृहितकावर जाकिया जाफरी यांची याचिका आधारित होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सविस्तर सुनावणी घेतली, जाकिया जाफरी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी न्यायालयाने दिली होती. अखेरीस न्यायालयाने २४ जून रोजी जाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली आणि नरेंद्र मोदी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. केवळ तेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ४५२ पानांच्या निकालपत्रामध्ये कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्यावर कशाप्रकारे आरोप केले, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
तिस्ता सेटलवाड, संजीव भट्ट आणि आर. बी. श्रीकुमार यांना हाताशी धरून हिंदूविरोधाचा कट तब्बल 19 वर्षे राबविण्यात येत होता. यामध्ये तिस्ता सेटलवाड यांनी खोटे आरोप करणे, खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करणे, खोटे दंगलग्रस्त पुढे आणणे, मोदींविरोधात देशभरात कार्यक्रम घेणे, विद्यापीठांमध्ये व्याख्याने देणे, भारतीय आणि परदेशी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून बदनामी कार्यक्रम राबविण्यात पुढाकार घेतला होता. त्याचप्रमाणे भट्ट आणि श्रीकुमार यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून गुजरात दंगल ही मोदींनीच घडविली, हे खोटे सिद्ध करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. या मंडळींनी नेमके काय काय केले, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आणि देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये स्पष्ट झालेच आहे.
 
 
 
‘तिस्ता’पंथाचा धोका केवळ गुजरात दंगल आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी यांना गोवणे एवढ्यापुरताच मर्यादित नाही. कारण, तिस्ता सेटलवाड आणि मंडळी ही एक प्रवृत्ती आहे. त्यामुळे व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे शक्य आहे. मात्र, प्रवृत्तीवर नेमकी काय आणि कशी कारवाई करणार, हा मोठा प्रश्न आहे. या पंथाचे लागेबांधे समाजातील अनेक स्तरांमध्ये अगदी घट्ट आहेत. त्यामुळे भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी कथितरित्या ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यावरून देशभरात एकाचवेळी हिंसाचार घडविण्यात आला. शर्मा यांच्यावर त्यांच्या पक्षाने कारवाई करूनदेखील ‘तिस्ता’पंथीयांचे समाधान झाले नाही, त्यामुळे हा मुद्दा अधिकाधिक कसा भडकविता येईल आणि देशात दंगली कशा घडविता येतील, यासाठी ‘तिस्ता’पंथीय कामाला लागले आहेत. एकीकडे नुपूर शर्मा यांनी कथितरित्या ईशनिंदा केल्याचा दावा करायचा, दुसरीकडे भाजपच्या कार्यकाळात देशात मुस्लीम सुरक्षित नसल्याचे भासवायचे, तिसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात अल्पसंख्याकांच्या हक्कांचे हनन होण्याचा दावा करायचा, चौथीकडे देशात हिंसाचार घडविण्याची परिस्थिती निर्माण करायची; या चतु:सूत्रीवर ‘तिस्ता’पंथाचे कामकाज चालते. हा पंथ हिंसाचाराला अतिशय साजुक भाषेमध्ये प्रोत्साहन देत असतो.
 
 
 
त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे नुपूर शर्मा प्रकरणामध्ये पत्रकार असल्याचा दावा करणार्‍या कथित फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेर. मोहम्मद झुबेर सध्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. या इसमाने ‘अल्ट न्यूज’ या आपल्या ‘फॅक्ट चेकर’ अर्थात सत्य जाणून घेणार्‍या आणि ते मांडणार्‍या उद्योगामार्फत नुपूर शर्मा यांच्याविरोधात मोहीमच उघडली होती. त्यामुळे कर्नाटकात नुपूर शर्मा यांच्या पुतळ्यास फासावर लटकविण्याचा प्रकार घडविण्यात आला. तो एक इशारा होता आणि त्या इशारावर पुढे राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल तेली नामक शिवणकाम करणार्‍या सर्वसामान्य हिंदू माणसाची रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद या दोन मुस्लिमांनी गळा चिरून हत्या केली. त्यानंतर या दोन मुस्लिमांनी एक व्हिडिओ प्रसारित करून हिंदू समाजाला अशाचप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या दोघा मुस्लीम मारेकर्‍यांना अटक करण्यात आली असून, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. मात्र, केवळ रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांना अटक करून या घटना थांबणार नाहीत. कारण, भारतात एकाचवेळी असंख्य ठिकाणी हिंसाचार घडविण्याचे दोन प्रयत्न झाले आहेत. त्यामध्ये ‘तिस्ता’पंथीयांचा मोठा वाटा आहे. कारण, ‘जिहादी’ कट्टरतावादास ‘गंगा-जमुनी तहजीब’ असे नाव देऊन हिंसाचाराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचे काम ‘तिस्ता’पंथ दीर्घकाळपासून करत आहे. काहीही करून हिंदू समाजाविरोधात हिंसाचार घडविणे, हिंदू समाजाचा मानभंग करणे, हिंदू समाजाला हिंसाचारी ठरविण्यासाठी हा पंथ कार्यरत आहे. या पंथास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे दणका बसला आहे. कारण, न्यायालयाने या पंथाची कार्यशैलीच उघडकीस आणली आहे. मात्र, ‘तिस्ता’पंथ आता नव्या कार्यशैलीद्वारे आणि नव्या चेहर्‍यानिशी सक्रिय होण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आगामी काळात अशा ‘तिस्ता’पंथाचा धोका ओळखणे हे भारतीय समाजासाठी गरजेचे आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.