ट्युनीशियाचा इस्लामला अलविदा

    26-Jun-2022   
Total Views |
 tuni
 
 
 
उत्तर ऑफ्रिकास्थित ट्युनीशिया या देशाचा प्रवास आता इस्लामकडून एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राकडे सुरू झाला आहे. ट्युनीशियाचे राष्ट्रपती कैस सैयद यांनी नव्या संविधानाच्या मसुद्यामध्ये कोणत्याही धर्माला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इस्लामबहुल असूनही ट्युनीशियाची वाटचाल एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राकडे सुरू झाली असून यात कट्टरपंथाला कोणतेही स्थान असणार नाही. मागील सोमवारीच या संदर्भातील मसुदा राष्ट्रपती सैयद यांना सोपवण्यात आला असून त्यावर आता पुढील महिन्यात दि. 25 जुलै रोजी सार्वमत घेतले जाणार असून अंतिम फैसला होणार आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रपती सैयद यांनी सत्तारूढ पक्षाविरोधात सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याने संसददेखील भंग केली असून प्रधानमंत्री हिचेम मेचिची यांनाही बरखास्त केले आहे. कैस सैयद हे आता नव्या प्रधानमंत्र्यांच्या मदतीने कार्यकारी अधिकार स्वतःकडे ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे सैयद यांनी जो कोणी व्यक्ती हत्यार उचलेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा कठोर इशारा दिला आहे.
 
सप्टेंबर 2021 पासूनच हा राजकीय संघर्ष सुरू असून तेव्हाच राष्ट्रपती कैस सैयद यांनी संसद भंग करण्याबरोबरच प्रधानमंत्र्यांना बरखास्त करण्याचा इशारा दिला होता. जो त्यांनी सत्यात उतरवल्यानंतर ट्युनीशियात अनेक ठिकाणी आनंद साजरा केला जात आहे. दरम्यान, सैयद यांनी राजकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेकडे पाऊल टाकले असल्याचे सांगितले आहे. या निर्णयाचे हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत समर्थन केले आहे. कारण, कोरोना काळात परिस्थिती हाताळण्यात सरकारला मोठे अपयश आल्याने अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली होती. एकट्या ट्युनीशियात कोरोनामुळे तब्बल 18 हजारांहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणूनच आता येथील जनता राष्ट्रपतींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. या निर्णयामुळे 2014च्या संविधानातील पहिल्या कलमामध्ये संशोधन करण्यात यश मिळणार आहे. कारण, 2014च्या याच संविधानानुसार ट्युनीशियाचा राजधर्म म्हणून इस्लाम आणि अरबीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. याच 2014च्या संविधानाची जागा आता हे नवे संविधान घेणार आहे. जीन अल अबिदीन बेन अलीसारखा हुकूमशाह असताना ट्युनीशियाची परिस्थिती अतिशय भयानक अवस्थेत होती. जशी एर्दोगनच्या नेतृत्वात तुर्कीत पाहायला मिळत होती. मात्र, 2011 साली ट्युनीशियात मोठी क्रांती झाली. ही क्रांती इतकी मोठी होती की, हुकूमशहा बेन अलीला सत्ता तर सोडाच पण आपला देशसुद्धा सोडावा लागला होता. हा ट्युनीशियातील नागरिकांचा मोठा विजय होता. त्यांनी एका हुकूमशहाला आपल्या एकजुटीने सत्तेवरून खाली खेचून त्याच्यावर देश सोडण्याची नामुष्की आणली होती. त्यानंतर खर्‍या अर्थाने अरब क्रांतीला सुरुवात झाली. ज्यामुळे अनेक देशांमध्ये नंतर सत्तांतर घडून आले. परंतु, ट्युनीशिया असे पाऊल उचलणारा पहिलाच देश नाही. जवळपास 100 वर्षांपूर्वी तुर्कीचे ऑटोमन साम्राज्य पतनाच्या उंबरठ्यावर होते. त्यावेळी मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा उदय झाला. ज्यांना काहीजण केमाल पाशा म्हणूनही ओळखत. त्यांनी ठरवले होते की, तुर्कीमध्ये कट्टरपंथीयांना कुठलेही स्थान नाही. 1920 ते 1923 पर्यंत तुर्कीवर कब्जा करण्यासाठी भीषण संघर्ष झाला, ज्यात अतातुर्कचा विजय झाला आणि त्यानंतर तुर्कीत मोठा कायापालट झाला. जो तुर्की एकेकाळी कट्टरपंथी इस्लामचा अभेद्य गड मानला जात होता, तो धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल करू लागला होता. त्यामुळे आता ट्युनीशियादेखील तुर्कीच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
 
ट्युनीशियाचे राष्ट्रपती सैयद यांनी सध्या देशातील राजकारण हादरवून सोडले आहे. ट्युनीशियाला धर्मनिरपेक्षेतकडे घेऊन जाताना त्यामागे त्यांचा मोठा हेतू असल्याचे दिसून येते. विरोधी पक्ष कट्टर इस्लामवादी असल्याने त्यांना नामोहरम करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. तसेच, संविधानाच्या नव्या मसुद्यातही इस्लामविषयक सर्व संदर्भ हटविले जाणार आहेत. या संविधानातून इस्लामविषयी भाष्य करणार्‍या कोणत्याही तरतुदी व मुद्द्यांचा समावेश केला जाणार नाही. त्यामुळे राष्ट्रपती आपले मनसुबे यशस्वी करण्यासाठी भले काहीही चाल खेळत असले तरीही ट्युनीशियातून इस्लाम अलविदा होतोय हे मात्र नक्की.
 
7058589767
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.