महाविकास आघाडीची अवस्था मुघल सैन्यासारखी!

पराभवाची चाहुल लागल्यानेच पवार बाजूला झाले आमदार गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

    21-Jun-2022   
Total Views |

GP 2
 
 
 
 
 
 
मुंबई : “महाराष्ट्रात २०१९ साली स्थापन झालेले सरकार अविश्वासातून सत्तेवर आलेले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिलेला असतानाही जनमताच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापन झाली. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आपल्याकडे १७० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करते. मात्र, प्रत्यक्षात किती आमदार त्यांना मतदान करतात, हे आपण पाहिले आहे. जसे मुघल सैन्यातील सैनिकांची एकूण संख्या आणि प्रत्यक्षात लढाईत उतरणारे सैनिक यात मोठा फरक होता. राज्यातील सद्य:स्थिती पाहता महाविकास आघाडीकडे असणारे पाठबळ आणि त्यांना मिळणारे एकूण मतदान यावरून महाविकास आघाडीची अवस्था मुघलांच्या सैन्यासारखी झाली आहे हे सिद्ध होते,” अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. सोमवार, दि. २० जून रोजी पडळकर यांनी राज्यसभा निवडणूक निकाल, विधान परिषद निवडणूक, चौंडी येथे रंगलेला पवार विरुद्ध पडळकर संघर्ष आणि यासह विविध मुद्द्यांवर दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षात चलबिचल दिसून आली, तर विरोधी पक्ष असलेला भाजप अत्यंत शांतपणे या निवडणुकीत उतरलेला दिसला. सत्ताधारी अस्वस्थ आणि विरोधक आश्वस्त या विरोधाभासाचे कारण काय?
 
अविश्वासाने स्थापन झालेल्या सरकारला दोन ते अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी आमदार आणि अनेक घटक नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेल्या विकासकामांना खीळ बसविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आणि त्यामुळे सर्वसामान्यांसह आमदारांमध्येदेखील त्यामुळे मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. बहुमत असलेल्या सरकारची झोप भाजप आणि मित्रपक्षांशी लढाई करताना उडाली, हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. हे नाराज घटक आपली नाराजी दाखवण्याची संधी शोधत होते आणि त्यांना ती संधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मिळाली असून त्यांनी सरकारला योग्य तो संदेश मतदानातून दिला आहे. राज्यसभेत आघाडीच्या उमेदवाराचा झालेला पराभव हे त्या नाराजीचेच फलित होते आणि त्याचीच पुनरावृत्ती काही प्रमाणात विधान परिषदेच्या मतदानातूनही झाली आहे. स्वपक्षीयांसह महाविकास आघाडीतील आमदारांच्या सरकारवरील रोषामुळे सत्ताधारी पक्षात चलबिचल दिसून आली आणि शांतपणे केलेल्या व्यूहरचनेमुळे भाजप संयमीपणे या निवडणुकीला सामोरे गेला हेच याचे कारण आहे.
 
 
 
मतांची फाटाफूट आणि आमदारांची नाराजी हा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. आमदारांची नाराजी नेमकी कशामुळे आहे?
 
कुठलीही अनैसर्गिक युती दीर्घकाळ टिकत नाही, याची प्रचिती आज राज्याला मिळते आहे. भाजपची विचारधारा हिंदुत्वाला धरून चालणारी आणि संविधानाचा आदर करणारी होती आणि ती कायम राहील. भाजपची साथ सोडून लोकशाही न मानणार्‍या, जातीयवादाला खतपाणी घालणार्‍या आणि घराणेशाहीला प्राधान्य देणार्‍या घटकांसोबत शिवसेनेने आता आघाडी केली आहे. सरकार अस्तित्वात येऊन अडीच वर्षे उलटली, तरी या सरकारचा किमान समान कार्यक्रम नक्की काय, हे अद्याप कुणालाही समजलेले नाही. राज्यातील कष्टकरी, महिला, विद्यार्थी, तरुण यांच्यासह अनेक घटकांकडे दुर्लक्ष करण्याचे काम सरकारने केले. विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न, अतिवृष्टीने झालेले नुकसान, चक्रीवादळ, महापूर किंवा कोरोनाकाळातील व्यवस्थापन यापैकी कुठल्याही विषयावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. केंद्र सरकारने केलेली मदत सोडता राज्य सरकार विशेष काहीही करू शकले नाही. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेलादेखील या काळात काही सकारात्मक काम करता आले नाही आणि त्यामुळे जनतेत निर्माण झालेला रोष आमदारांच्या लक्षात आला आहे. जनतेच्या रोषाचा सामना पुढील विधानसभा निवडणुकीत करावा लागू नये यासाठीच आमदारांनी सरकारवरील आपली नाराजी उघडपणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि त्याचा मोठा फटका सरकारला बसणार, हे निश्चित.
 
 
 
‘जय भीम जय मल्हार’ ही घोषणा खड्या आवाजात देण्याचा उद्देश काय?
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू असलेल्या केळुसकर गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय सुंदर असे शिवचरित्र लिहिले होते. ते डोक्यावर या शिवचरित्रांच्या प्रती घेऊन अनेक संस्थानांकडे जाऊन आर्थिक साहाय्यासाठी विनंती करत होते. त्यावेळी अन्य कुणीही मदत केली नाही. होळकरांनी मात्र केळुसकरांची स्थिती लक्षात घेता त्यांना मदत करत शिवचरित्राच्या सर्व प्रती विकत घेतल्या होत्या. त्यावेळी होळकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केळुसकर गुरुजी यांच्या डोक्यावरील ओझे उतरविल्यानंतर काही वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशभरातील जनतेच्या डोक्यावर असलेले गुलामगिरीचे ओझे उतरवण्यासाठी मदत केली, या घटना परस्परांशी नैसर्गिकरित्या जोडल्या जातात. एका मागासवर्गीय महिलेवर हात टाकणार्‍या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी बापू वीरू वाटेगावकर यांनी हाती शस्त्र घेतले होते, हा इतिहास आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, अशी आमची भावना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘चवदार तळे’ आंदोलन केले होते आणि त्याची प्रेरणा घेऊन आम्ही सांगली जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन केले. थोडक्यात काय तर समाजातील विविध विचारधारांनी एकत्रित येऊन पुढे जावे, अशी भावना या घोषणेच्या मागे आहे. ‘जय भीम जय मल्हार’ हे आमचे घोषवाक्य असून समाजातील तरुणांनी एकत्र यावे, यासाठी केला जाणारा तो एक प्रयत्न आहे.
 
 
 
पवार विरुद्ध पडळकर संघर्ष दिवसेंदिवस तीव्र बनत जातोय, हे चौंडी येथील कार्यक्रमातून जास्तच स्पष्ट झालंय. पवारांनी चौंडीत येऊ नये, यासाठी तुमचा विरोध आणि अहिल्यादेवींची जयंती हा वाद नक्की काय?
 
अहिल्यादेवी शस्त्र आणि शास्त्र घेऊन कार्य करत होत्या. चौंडी हे आमच्यासाठी प्रेरणास्थान स्फूर्तिस्थान आहे. राज्यासह देशभरातील लाखो लोक त्या ठिकाणी जयंतीनिमित्त येतात आणि प्रेरणा घेऊन जातात. अहिल्यादेवींच्या दर्शनाला येण्यासाठी आमचा कुणालाही विरोध नव्हता आणि नसेलही. मात्र, जयंतीच्या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या विरोधात आम्ही होतो. शरद पवार चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री होते. अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये ते मंत्री होते. तेव्हा मात्र त्यांना चौंडी येथे होणार्‍या अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा झाली नाही. नेमकी याच वर्षी ती भावना निर्माण झाली. कारण, चौंडी हे धनगर समाजाला जागृत करणारे ठिकाण आहे आणि ते आपल्या हाती असावे, ही पवारांची इच्छा होती. धनगर समाजाला गुलाम बनविण्याचे पवारांचे प्रयत्न आहेत. समाजाने पवारांना त्या दिवशी त्यांची जागा दाखवून दिली होती. चौंडीवर कब्जा करण्याचा पवारांचा प्रयत्न सर्व अहिल्याभक्तांनी हाणून पाडला हे उघड आहे. रोहित पवारांच्या कार्यात अहिल्यादेवींच्या दृष्टिकोनाचा स्पर्श दिसतो, या पवारांच्या वक्तव्याचाही आम्ही निषेध करतो आहोत. अहिल्यादेवींचे नावदेखील पवारांनी घेऊ नये. आयुष्यभर कायम स्वतःला नास्तिक म्हणून दाखवणार्‍या पवारांना आता उतारवयात अहिल्यादेवींचे नाव का घ्यावे लागते? मुख्यमंत्री असताना पवारांनी प्रत्येक कार्यालयात अहिल्यादेवींच्या तसबिरी का लावल्या नाहीत? त्यांच्यावर एखादे पुस्तक किंवा ग्रंथ बनविण्याचे काम पवारांनी का केले नाही? या प्रश्नांची उत्तरे पवारांनी द्यावीत. त्यामुळे पवारांनी केलेल्या विधानाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून पवार चौंडीत आले होते, हेच यातील तथ्य आहे.
 
 
 
धनगर समाजाच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे ‘व्हिजन’ काय?
 
धनगर समाज शैक्षणिकदृष्ट्या म्हणावा तसा पुढे आलेला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राजकीय प्रतिनिधित्वदेखील मिळालेले नाही. अनेक बाबतीत मागास असलेल्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत अनुकूलता दाखवत अनेक महत्त्वाच्या योजना तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अंमलात आणल्या होत्या. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, वसतिगृहाला प्रवेश न मिळणार्‍या मुलांना राहण्याची सोय करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देणे, मुलांना प्रशिक्षण देणे, स्पर्धा परीक्षा देणार्‍यांना शिष्यवृत्तीचा विषय, पावसाळ्याचे चार महिने मेंढपाळांना देण्यात आलेला चराई भत्ता असे अनेक लोकहितकारक निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतले होते. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार मी सभागृहात आवाज उठवलेला आहे आणि निश्चितपणे एक दिवस आम्ही धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा मला विश्वास आहे.
 
 
 
सदाभाऊ खोत-गोपीचंद पडळकर, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे, हर्षवर्धन पाटील, खासदार धनंजय महाडिक या नव्या चेहर्‍यांमुळे भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आपला गड मजबूत करण्यासाठी मदत होईल का?
 
भाजपची पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती भक्कम आहे. सोलापूर, माढा, सांगली हे तिन्ही खासदार भाजपचे आहेत आणि हातकणंगलेसारखा मतदारसंघही भाजपमुळेच शिवसेनेच्या ताब्यात आहे. पुणे ग्रामीण वगळता पुणे शहर लोकसभेवर भाजपचा झेंडा आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि भाजपचा गड मजबूत करण्यासाठी आम्ही संघटितपणे आणखीन जोरदार प्रयत्न करू आणि भाजपला तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पूर्णपणे निभावू.
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.