पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती, पुणे महानगर यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चापेकर बंधूच्या पराक्रमाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १८ जून २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता स. प. महाविद्यालय मैदान येथे हे महानाट्य होईल, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समिती, पुणे महानगराचे अध्यक्ष रविंद्र वंजारवाडकर आणि इतिहासप्रेमी मंडळाचे मोहन शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वंजारवाडकर म्हणाले की, चापेकर बंधूंनी केलेल्या रॅंड वधाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 1997 मध्ये या महानाट्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र त्यावेळी चापेकर बंधूंच्या पराक्रमावर मुख्य भर देण्यात आला होता. आता 25 वर्षांनंतर हा प्रयोग नव्या स्वरूपात सादर होत असून त्यात चापेकर बंधूंबरोबरच त्यांच्या आधीच्या व नंतरच्या क्रांतिकारकांच्या कार्यावरही प्रकाश टाकण्यात येईल. त्यात लहुजी साळवे, बिरसा मुंडा, उमाजी नाईक आणि अगदी झाशीची राणी तसेच लोकमान्य टिळक व स्वामी विवेकानंद यांचेही दर्शन यावेळी रंगमंचावर होईल. भारतातील १८५७ पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांची माहिती नवीन पिढीला व्हावी, हा यामागचा हेतू आहे.
चितळे म्हणाले की, पुण्यातील तरुण पिढीपुढे हा इतिहास जावा हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण प्रसारक मंडळीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समितीच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. इतिहास प्रेमी मंडळ संस्थेच्या वतीने सादर होणाऱ्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मोहन शेटे यांनी केले आहे तर वैशाली इनामदार आणि अभिषेक शाळू हे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. सुमारे 125 कलावंत, भव्य रंगमंच, नृत्य व संगीत आणि प्रत्यक्ष घटनेची जिवंत मांडणी यात अनुभवायला मिळेल. दोन तासांच्या या महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य असेल तसेच येणाऱ्या प्रेक्षकांसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची प्रशस्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
नाटकातील कलावंतांची माहिती देताना शेटे म्हणाले की लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत ऍड अभिजीत देशमुख हे असतील तर दामोदर चापेकरांच्या भूमिकेत भूषण पाठक असतील. कुणाल कांबळे हे बाळकृष्ण चापेकरांची भूमिका करणार आहेत, जयंत डोंगरे हे वासुदेव फडके यांच्या, कोमल राजपाठक झाशीच्या राणीच्या, राहुल क्षीरसागर हे लहुजी वस्तादांच्या, आशुतोष तपसाळे हे उमाजी नाईकांच्या, शौनक कंकाळ हे स्वामी विवेकानंदांच्या भूमिकेत असतील. याशिवाय हेमंत मावळे यांचे पोवाडे गायन, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि राहुल सोलापूरकर यांचे निवेदनसुद्धा या महानाट्यात ऐकायला मिळणार आहे. या महानाट्याप्रसंगी महान,थोर क्रांती कारकांना अभिवादन करण्यासाठी या महा नाट्या ला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.