पुण्याचं पुढील ५० वर्षांचं आमच्याकडे व्हिजन : मुरलीधर मोहोळ

पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने केलेली बातचीत.

Total Views |

murlidhar mohol


रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ता, महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष, पुणे शहराचे महापौर अशा विविध जबाबदाऱ्या लिलया पेलणारे मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहर आणि परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. हेच पाहता मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने केलेली बातचीत.


प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात गेल्या १० वर्षात पुण्यातील आणि परिसरातील अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. विकसित भारतासाठी पुणे महानगर अत्यंत महत्वाचे शहर आहे, यासाठी आपले व्हिजन नेमके काय?

उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही पुण्याच्या पुढील ५० वर्षाच्या भविष्याचा आराखडा तयार केला आहे. आणि मोदीजींनी मागील १० वर्षात पुण्याला वेगवेगळ्या माध्यमातून खूप उपलब्धी प्राप्त करून दिली आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु झाली, पुणे विमातळाचा विस्तार झाला, नद्यांचे प्रकल्प सुरु झाले, पीएमपीएलच्या ताफ्यात नव्या बसेस आल्या, चांदणी चौकासारखा हजारो कोटींचा प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे पुढच्या ५० वर्षांचा विचार करताना विकसित भारताचे जे स्वप्न आहे त्यात पुणे सुद्धा कुठेही मागे नसेल. मोदीजींच्या नेतृत्वावर पुणेकरांचा विश्वास आहे. पुणे शहरासाठी ५० वर्षांचा विचार आम्ही केला आहे. त्याचा जाहीरनामा जनतेत आहे. आम्हाला विश्वास आहे पुणेकर कामाला मत देतात, विचारला मत देतात, विकासाला आणि भविष्याला मत देतात.
प्रश्न : भाजपचा कार्यकर्ता, महापौर म्हणून पक्ष संघटनेत काम करताना पक्षावर सर्वसामान्यांचा विश्वास बळकट व्हावा यासाठी काय सुचवाल?

उत्तर : पक्ष संघटना म्हणून सर्वसामन्यांत पोहोचण्यासाठी काम सुरूच आहे. मात्र महायुतीचा उमेदवार म्हणून मी मैदानात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या ज्या अपेक्षा असतील त्या निश्चितच या शहराचा खासदार म्हणून मी दिल्लीत मांडेल. या शहराचे एक वेगळे महत्व आहे. देशात पुण्याला एक वेगळे स्थान आहे. त्यामुळे दिल्लीत निवडून जाणाऱ्या व्यक्तीची एक वेगळी जबाबदारी वाढते. याचाच विचार मी करतोय. पुणेकरांच्या अपेक्षा निश्चितच मी पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी मी असेल.

प्रश्न : स्व. गिरीश बापट यांनी पुण्याचे प्रतिनिधित्त्व उत्तमरित्या सांभाळले. त्यामुळेच विरोधी उमेदवारालासुद्धा त्यांचा फोटो लावून प्रचारासाठी उतरावे लागत आहे. आज त्यांची कमतरता जाणवते का? त्यांनी पुण्याच्या विकासासाठी आखून दिलेला रोडमॅप तुम्हाला कशाप्रकारे फायदेशीर ठरत आहे?

उत्तर : आज गिरीशजी बापट यांची उणीव निश्चितच क्षणाक्षणाला जाणवते आहे. त्याचे कारण आहे गेले ५० वर्षे या शहरातील सामाजिक आणि राजकीय जीवनात बापट साहेबांचे मोठे योगदान आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहून मोठे झाले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही काम सुरु केले. त्यांचे मार्गदर्शन आणि खूप प्रेम मिळाले. त्यामुळेच आमचा हा प्रवास शक्य झाला. त्यांचे अस्तित्व आम्हाला जाणवत. म्हणून मला वाटतं की आज खूप गरज होती बापट साहेब आमच्यात असण्याची आणि ही उणीव निश्चितच जाणवते.


प्रश्न : काँग्रेसकडून धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. या आव्हानाकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर : प्रत्येक उमेदवार हा निवडणूक जिंकण्यासाठी लढवतो. मात्र आम्ही केलेल्या कामांच्या जीवावर निवडणूक लढवतो. १० वर्षात आम्ही केलेलं काम आमच्यासाठी महत्वाचे आहे. मी म्हणालो तसं की, पुणेकर कामाला, भविष्याला, विचारला आणि प्रगतीला मत देतात. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. त्यामुळे इथे मला फार काही लढत आहे असं वाटतं नाही. आम्ही ही निवडणूक सहज जिंकू.
प्रश्न : मागील लोकसभेत साडेतीन लाखांचा लीड होता, हा रेकॉर्ड यंदा मोडेल का?

उत्तर : निश्चितच पुणेकर मागचा रेकॉर्ड तोडतील. मोदीजींनी केलेलं काम समोर आहे. केवळ एका पुण्यात अडीच लाख विविध योजनांचे लाभार्थी आहेत. यात उज्वला गॅस, आयुष्यमान भारत, सुकन्या योजना अशा कितीतरी योजनांचा यात समावेश आहे. देशाचे जगभरात उंचावलेलं स्थान हे सगळं पाहता निश्चितच मागच्या वेळेचं मताधिक्य आम्ही आम्ही पार करू असा आम्हाला विश्वास आहे. पुणेकर आम्हाला भरभरून साथ देतील.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.