मुंबई : उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान देणाऱ्या नवनीत राणा - रवी राणा यांना अखेर मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती पण ती पुढे बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. अखेरीस आज सुनावणी होऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राणा दाम्पत्यावर राजद्रोहासारखे महत्वाचे गुन्हे दाखल केले असल्याने त्यांना जामीन मंजूर करू नये अशी सरकारी वकिलांची मागणी होती पण अखेरीस न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसेना नेते, कार्यकर्त्यांनी मोठेच रान उठवले होते. याच पार्श्वभूमीवर त्या दोघांना अटक करण्यात आली होती. तब्बल १२ दिवसांनी या दोघांची तुरुंगातून सुटका झाली आहे.