उत्तम भाषण, पण अपूर्ण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2022   
Total Views |

raj thackarey
महाराष्ट्रातील हिंदुत्वाची ‘स्पेस’ म्हणजे जागा भाजपने व्यापलेली आहे. काही प्रमाणात शिवसेनेने व्यापलेली आहे. तिथे आता तिसर्‍याला वाव नाही. याचा अर्थ असा झाला की, राज ठाकरे यांना भाषण फार उत्तम करता येते. पण, पक्षाला विचार देण्यास ते कमी पडतात आणि कार्यक्रम देण्यास ते उणे पडतात. त्यामुळे ते आणि त्यांचा पक्ष हे महाराष्ट्राच्या सत्ता संतुलनातील महत्त्वाचे घटक ठरण्यास कमी पडतात.
 
होणार होणार’ म्हणून गाजत असलेले राज ठाकरे यांचे भाषण पाडव्याला शिवतीर्थावर झाले. या भाषणाची खूप प्रसिद्धी झाली. त्याची तीन कारणे आहेत, पहिले कारण राज यांच्या नावात ‘ठाकरे’ हा शब्द आहे आणि ठाकरे हे नाव राजकीय बातम्यांच्या विषयासाठी पुरेसे असते. दुसरे कारण राज ठाकरे यांची भाषणशैली बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासारखी आहे. त्यामुळे हे भाषण गाजले आणि तिसरे कारण म्हणजे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सणकून टीका केली. उद्धव ठाकरे यांचे गुरू शरदराव पवार यांच्यावर जबरदस्त तोफ डागली आणि आक्रमक शैलीत हिंदुत्वाचा विषय मांडला.
 
भाषण झाले आणि ज्यांना ज्यांना राज ठाकरे यांनी ठोकले, ते नंतर उठले आणि बोलते झाले. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. (जी कुणी फार गंभीरपणे घेत नाही) राजपुत्र आदित्य ठाकरे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली, (अनेकांना ती बालिश वाटली.) जितेंद्र आव्हाड कसे मागे राहतील, तेही बोलले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही बोलत्या झाल्या. या सर्वांची वक्तव्ये काय आहेत, ती येथे देण्याचे कारण नाही. कारण, प्रिंट आणि सोशल मीडियावर ती सहज उपलब्ध आहेत. आपल्याला दोन गोष्टींचा विचार करायचा आहे. यातील पहिली गोष्ट राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वासंबंधीची आहे आणि दुसरी गोष्ट मनसेच्या राजकीय भवितव्याची आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. लगेचच एक प्रश्न असा निर्माण झाला की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जाणार का? दुसरा अर्थ शिवसेनेचे अस्तित्त्व नगण्य होत जाणार का? पहिल्या काही वर्षात असे वातावरण महाराष्ट्रात जरुर होते, पण तसे झाले नाही.
 
 
राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना पर्याय देईल, असे नेतृत्व उभे करता आले नाही. त्यांच्या बाजूने दोन गोष्टी होत्या. ठाकरे हे नाव होते आणि सभा गाजविण्याची ठाकरेशैली होती. या दोन्हींचा पहिल्या निवडणुकीत थोडाबहुत उपयोग झाला आणि या दोन्ही भांडवलात स्वतःचे तिसरे भांडवल घालावे लागते. ते राज ठाकरे यांना जमले नाही. सक्षम राजकीय नेतृत्व देण्यासाठी केवळ घराण्याचे नाव पुरेसे होत नाही. तसेच, कुणाच्या भाषणाची शैली उचलून सक्षम नेतृत्व निर्माण होत नाही. राजकीय संस्कृतीचा हा सनातन आणि शाश्वत सिद्धांत आहे. नेतृत्वासाठी स्वतःचे स्वतंत्र भांडवल असावे लागते. हे भांडवल दोन प्रकारचे असावे लागते. भांडवलाचा पहिला भाग विचार देण्याचा आहे, आणि दुसरा भाग विचार कृतीत आणणारे कार्यक्रम देण्याचा आहे.
 
 
या दोन्हींच्या आधारे पक्षाची वाढ होते. मनसेचा विचार कोणता किंवा दुसर्‍या भाषेत राज ठाकरे यांचा विचार कोणता, या विचारात स्थिरता नाही. पक्ष स्थापन करताना मराठी माणसाच्या न्याय-हक्काचा विषय त्यांनी घेतला. काही काळ तो चालविला, नंतर सोडून दिला. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची त्यांनी स्तुती केली. मोदी तेव्हा केवळ गुजरातचे मुख्यमंत्री होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार केला. माझ्या स्मरणाप्रमाणे त्यांनी एकूण सात सभा घेतल्या. हे एक राजकीय आश्चर्य होते. विरोधी पक्षनेता निवडणुकांपूर्वी अन्य पक्षांशी युती करतो आणि तो संयुक्तपणे प्रचार करतो. तसे न करता मनसेने म्हणजे राज ठाकरे यांनी शरदराव पवार यांच्या सभांमध्ये भाषणे केली. आपला सगळा पक्ष अशा प्रकारे दुसर्‍या पक्षाला कुणी भाड्याने देत नाही. महाराष्ट्राच्याच काय, तर देशाच्या राजकीय मंचावरील हे एकमेव उदाहरण असावे.
 
 
प्रत्येक निवडणूक ही राजकीय पक्षाला आपले अस्तित्व सिद्ध करण्याची एक संधी असते. त्यासाठी स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागते. देशाचे राजकीय वातावरण जरी सतत बदलत असले तरी या काळात कोणता विषय राजकीय यश देणारा ठरू शकतो, हे यशस्वी राजनेत्याला समजून घ्यावे लागते. महागाई, भाववाढ, शेतकर्‍यांचे प्रश्न, अल्पसंख्याकांचे प्रश्न, मागासवर्गीयांचे प्रश्न असे काही विषय हे शाश्वत विषय असतात. ते काल होते, आज आहेत आणि उद्याही असणार आहेत. या विषयांच्या आधारे ठोस आणि परिणामकारक राजकारण करता येत नाही.
 
शिवतीर्थाच्या सभेत राज ठाकरे यांनी ‘मशिदीवरील भोंगे काढा नाही, तर मशिदीपुढे आम्ही हनुमान चालिसाचे पठण करू,’ असे म्हटले. याला ‘राजकीय हिंदुत्व’ म्हणतात. हिंदुत्वाचा विचार राजकीय फायद्याच्या संदर्भात मांडायचा असेल, तर तो मुसलमानांच्या विरोधात मांडावा लागतो. मुस्लीम विरोधाचे विषय शोधावे लागतात. ते अनेक आहेत. मशिदीवरील भोंगे हा त्यातील एक विषय आहे. ‘लव जिहाद’ हा दुसरा विषय आहे, ‘हिजाब’ तिसरा विषय आहे, असे विषय घेऊन हिंदुत्वाचे राजकारण करणे योग्य की, अयोग्य, याची चर्चा नंतर करता येईल. येथे फक्त एकाच मुद्द्याचा विचार केला पाहिजे की, असे राजकारण करून राज ठाकरे आणि मनसेला राजकीय यश मिळेल का? त्याचे उत्तर, अजिबात मिळणार नाही. याचे कारण असे की, हा विषय राज ठाकरे यांनी का आणला आहे, हे न समजण्याइतके लोक आता दुधखुळे राहिलेले नाहीत. मशिदीशेजारी ज्यांची घरे आहेत किंवा दुकाने आहेत, त्यांना या भोंग्यांचा अतिशय त्रास होतो आणि ज्यांना याचा काही त्रास होत नाही, अशी लोकसंख्या त्रास न होणार्‍या लोकांपेक्षा खूप मोठी आहे. त्रास होणार्‍या आणि न होणार्‍या कुणालाही मुस्लीम समाजाशी अनावश्यक धार्मिक संघर्ष नको आहे. मुस्लीम समाजालाही नको आहे आणि हिंदू समाजालाही नको आहे.
 
 
मनसेचे हिंदुत्वाचे राजकारण ही शिवसेनेच्या हिंदुत्वाची आणि भाजपच्या हिंदुत्वाची नक्कल आहे. नक्कल कधी अस्सल होत नाही. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून अनेक राजकीय नेत्यांना आपण हिंदू असल्याचा आणि धार्मिक हिंदू असल्याचा साक्षात्कार झालेला आहे. ममता बॅनर्जी म्हणतात की, ‘मी रोज दुर्गेची पूजा करते.’ केजरीवाल हनुमान चालिसा म्हणतात आणि हनुमान मंदिरात जातात. राहुल गांधी यांनी अनेक हिंदू मंदिरांना भेट देण्यास सुरुवात केली. ते ‘जानवेधारी हिंदू’ आहे असे त्यांचे चेले म्हणू लागले. नरेंद्र मोदी असे काही म्हणत नाहीत, ते हाडाचे आणि हृदयाचे हिंदू असल्यामुळे गंगेची आरती करणे आणि केदारनाथला जाऊन एका गुहेत ध्यानधारणा करणे ही त्यांची स्वाभाविक कृती असते. अन्य नेते त्यांची नक्कल करतात. ती कधीही अस्सल होत नाही.महाराष्ट्रातील हिंदुत्वाची ‘स्पेस’ म्हणजे जागा भाजपने व्यापलेली आहे. काही प्रमाणात शिवसेनेने व्यापलेली आहे. तिथे आता तिसर्‍याला वाव नाही. याचा अर्थ असा झाला की, राज ठाकरे यांना भाषण फार उत्तम करता येते. पण, पक्षाला विचार देण्यास ते कमी पडतात आणि कार्यक्रम देण्यास ते उणे पडतात. त्यामुळे ते आणि त्यांचा पक्ष हे महाराष्ट्राच्या सत्ता संतुलनातील महत्त्वाचे घटक ठरण्यास कमी पडतात.
 
 
राजकीय प्रश्नांचा विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न आहेत. आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत प्रश्न झालेला आहे. एसटी कामगारांचा संप हा एसटी कामगारांपुरता मर्यादित न राहता खेडोपाडीच्या जनतेचा अत्यंत गैरसोयीचा विषय झालेला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इत्यादी महानगरांचा विचार केला, तर वाहतुकीचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत प्रश्न बनत चालला आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचे भयंकर नुकसान झालेले आहे. येणार्‍या पिढीपुढे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा अंदाज घेऊन राजकीय चळवळीचा यातील कोणता विषय पुढे नेला असता पक्षाची स्वतंत्र प्रतिमा निर्माण होईल, याचा परिणामकारक विचार जो नेता करतो तो यशस्वी होतो.
शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण सुरु केले, हे सर्व महाराष्ट्राला माहीत असलेली गोष्ट सांगितली त्यात नवीन काही नाही. तसे उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात करून मुख्यमंत्रिपद मिळविले, त्यातही नवीन सांगण्यासारखे काही नाही. त्यांच्यावर टीका करून मतदारसंघात वाढ होत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून भाजपच्या गोटात आनंदाच्या लहरी निर्माण होतील. मनसेच्या मतदारसंघातून त्यात वाढ होणार नाही, असे इतरांच्या फायद्याचे विषय घेऊन पक्षाची वाढ कशी होणार आणि पक्षाचे बळ कसे वाढणार, याचा विचार राज ठाकरे यांनीच करायला पाहिजे.
 
 
 
सक्षम राजकीय पक्षांच्या आधारावरच लोकशाहीचा डोलारा उभा असतो. राजकीय पक्ष लोकांचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी झाला पाहिजे, याबाबतीत राजकीय पक्षाला जागरुक राहावे लागते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकारी ‘ईडी’च्या जाळ्यात सापडत चाललेले आहेत. ‘अबब’ असे उद्गार काढावेत, अशी एकेकाची संपत्ती आहे. आज महाराष्ट्राला सामान्य माणासाला धनवान करणारे सत्ताकारण हवे आहे. सत्तेत राहून आपण आणि आपले नातेवाईक यांना धनवान करणारे राजकारण नको आणि त्यासाठी एका समर्थ पर्यायाची आवश्यकता आहे. कोण देणार हा पर्याय? हा यक्षप्रश्न आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@