पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणार्या पुणे शहरात 3.7 लाख रुपये किंमतीचा शस्त्रसाठा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील दिघी परिसरात ‘कुरिअर फर्म’च्या कार्यालयात हा शस्त्रसाठा सापडला असून या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान, पुण्यातील एका कुरिअर कंपनीचे दिघी येथे मध्यवर्ती गोडाऊन आहे. त्या ठिकाणी आरोपी उमेश सुद याने अनिल हेन याच्या नावे 2 लाकडी बॉक्स पाठवले होते. 1 एप्रिल रोजी ‘एक्सरे स्कॅनिंग’द्वारे तपासत असताना तलवार सदृश वस्तू आढळून आली. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून एकूण 3.7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणायात आला आहे. शिवाय आरोपी उमेश सुुद, अनिल होन यांच्यासह मनिंदर आणि आकाश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील ‘कुरिअर फर्म’च्या कार्यालयातून तलवारी जप्त केल्या आहेत. 3.7 लाख रुपये किमतीच्या 92 तलवारी, दोन कुकरी आणि नऊ खंजीर जप्त केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या माहितीनुसार हा शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी सापळा रचत चौघांना अटक केली आहे.
औरंगाबादमध्ये ‘कुरिअर कंपनी’कडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाईन तलवारी मागविणार्यांसह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी अटक करून आणखी तीन तलवारी जप्त केल्या आहेत. यातील एक तलवार त्याच्या घरात, तर दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले होते. यापूर्वीदेखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर ‘कुरिअर’ कंपनीकडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात, हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आठवड्यात ‘क्राईमब्रँच’ने तलवार मागवणारे दोन जण ताब्यात घेतले होते.