प्रत्येक क्षण समाजहितासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2022   
Total Views |

pankaj
 
जेव्हा पंकज पाठकांसारखी व्यक्ती ‘सब समाज को साथ लिए’ म्हणत समाजासाठी अखंड कार्याचा वसा उचलते, त्यावेळी प्रत्येक कार्य, प्रत्येक विचार हे जनहितासाठीच असतात, हे नक्की. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
 
 
पंकज पाठक हे ‘वनांचल समृद्धी अभियान’ या संस्थेचे संस्थापक. तसेच, ‘अनुलोम’ संस्थेचे मुख्य कृती अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. इतकेच काय तर ‘लोढा फाऊंडेशन’चे ते ‘सीएसआर हेड’ म्हणूनही कार्यरत होते. या सगळ्या संस्थांमध्ये काम करताना त्यांनी आदर्श ठेवला तो केवळ आणि केवळ प्रत्येक क्षण समाजहितासाठी देण्याचा. ‘वनांचल समृद्धी अभियान’च्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील ४०० गावे जोडली गेली आहेत. या गावातील जवळ जवळ ५० हजार कुटुंबांना सरकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम केले गेले आहे. संस्थेचे ६०० बचतगट आहेत. ‘रोजगार हमी योजना’, ‘प्रधानमंत्री वनधन योजना’, ‘सामूहिक वनहक्क कायदा’आणि ‘वन व्यवस्थापन’ यासाठी संस्थेच्या माध्यमातून पंकज यांनी ग्रामविकास हे ध्येय अधोरेखित केले आहे. आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो की, काही सामाजिक संस्था, व्यक्ती म्हणतात, वनवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते कार्य करतात. पण, पंकज पाठक यांचे विचार आणि कार्य याबाबत वेगळे आहे. ते म्हणतात ”त्यांची जीवनशैली ही त्या त्या स्तरावर मुख्यच आहे. त्यांना दुय्यम लेखून त्यांच्या विकासासाठी काम करतो हे म्हणणे चुकीचे आहे. त्यांची जीवनशैली वेगळी असू शकते पण दुय्यम नव्हे.” तर असे हे पाठक, स्वतःच्या मतांवर नेहमीच ठाम असतात. अर्थात, ते मतही पूर्ण विचाराअंती आणि समाजहितासाठीचेच असते, हे वेगळे सांगायला नको.
 
पंकज पाठक यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला तर जाणवते की, त्यांचे जगणे जगावेगळे आहे. कारण, त्यांनी आपल्या ध्येयांशी, विचारांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची कार्यक्षेत्रे बदलत गेली. पण, त्या कार्यक्षेत्रातला समाजभान आणि समाजकार्याचा हा आत्मा काही बदलला नाही. विज्ञान शाखेतून पदवीधर असलेले आणि पुढे ‘एमएम योगा’, ‘एमबीए - एचआर’ अशी विविध शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेले पंकज पाठक हे खरेच मुलखावेगळ्या माणसामध्ये नोंद करावी, असे व्यक्तिमत्त्व. पाठक कुटुंब मुळचे धुळ्यातील खंडलाय गावचे. पुरूषोत्तम पाठक आणि सुरेखा पाठक या दाम्पत्याला दोन मुलं. त्यापैकी एक पंकज. कामानिमित्त पाठक दाम्पत्य मुंबईला राहायचे. दोघेही नोकरी करायचे. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून पंकज यांना आईच्या आईकडे भुसावळ येथे ठेवण्यात आले. पंकज यांच्या आईचे वडील विश्वनाथ कुलकर्णी आणि आजी शंकुतला कुलकर्णी. विश्वनाथ हे स्वातंत्र्य सैनिक. देशहिताच्या आणि स्वातंत्र्यपूर्व लढ्याच्या गोष्टी ते पंकज यांना सांगत.
 
 
त्याकाळी पंकज यांच्या शेजारी रा.स्व.संघाचे नाना पळनिटकर आणि रामानंद काळे राहत. या दोघांमुळे पंकज यांचा रा.स्व.संघाशी संपर्क आला. त्यावेळी देशहित, समाजकार्य यावर संवाद नित्यनियमाने घडे. तेव्हाच पंकज यांनी ठरवले की, आपण देशहितासाठी काम करायचे.पुढे दहावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आईबाबांकडे आले. शिक्षण सुरू झाले आणि काही महिन्यांतच मुंबईत १९९३ साली बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांवर कठेार कारवाई व्हावी म्हणून अभाविपने आंदोलन सुरू केले. पंकज यांच्या महाविद्यालयातही या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या अभियानानंतर पंकज अभाविपशी जोडले गेले. या काळात अभाविपचे प्रा. नरेंद्र पाठक, मिलिंद मराठे आणि रत्नाकर पाटील यांचे मार्गदर्शन पंकज यांना लाभले. अभाविपच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू झाले. मात्र, याच काळात पंकज यांच्या आईचे निधन झाले. हा धक्का मोठा होता. पण, पंकज यांनी स्वतःला सावरले. त्यांना आईच्या जागेवर सरकारी नोकरी लागली. त्यांच्या कार्यालयात तलासरी आणि अनेक वनवासी भागातून लोक येत असत. राहत्या जागेहून ठाण्याला येणे त्या लोकांसाठी जिकिरीचे आणि खर्चिक असे. अशिक्षित, आपल्याला काहीच समजणार नाही हा न्यूनगंड, सरकारी योजना आणि कार्यवाहीबद्दल शून्य ज्ञान, यामुळे त्याचे सहज होणारे कामही लांबणीवर जाई. हे पाहून पंकज अस्वस्थ होत. आपण जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी काम करायला हवे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले.
 
त्यासाठी वेळ देणे गरजेचे होते. मग, सुस्थापित सरकारी नोकरीचा पंकज यांनी राजीनामा दिला का? तर समाजासाठी काम करायचे होते म्हणून. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे अभाविपचे प्रचारक म्हणून कार्य केले. पुढे गोवंडी येथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ‘लोढा फाऊंडेशन’मध्ये जबाबदारी सांभाळली. ‘लोढा फाऊंडेशन’ आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा यांच्यासोबतचे काम करतानाचा पंकज यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणखीन पैलू पडले. फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवताना पंकज यांना नव्याने अनेक समाजसत्य अनुभवता येऊ लागले. वनवासी भागातील किंवा दुर्गम भागातील समाजबांधव अराष्ट्रीय तत्त्वांचा बळी ठरू नये, यासाठी प्रत्येक पातळीवर काम करण्याची तयारी असलेले पंकज पाठक. पंकज म्हणतात, ”स्वामी विवेकानंद म्हणाले होते उठा जागृत व्हा आणि ध्येयप्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका. मीसुद्धा समाजहिताचे ध्येय साधल्याशिवाय थांबणार नाही.” सामूहिकतेतून समृद्धीचा मार्ग समाजमनावर कोरणार्‍या पंकज पाठक यांचे व्यक्तिमत्त्व खरेच लक्षणीय आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@