‘द काश्मीर फाईल्स’ निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2022   
Total Views |
 
 
daitva
 
 
‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’ने भांडुपमध्ये तर विश्व हिंदू परिषद आणि महाराज अग्रसेन सेवा संस्थेने घाटकोपरमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे विनामूल्य प्रक्षेपण नुकतेच केले होते. त्यानिमित्ताने ‘द काश्मीर फाईल्स’ आणि प्रेक्षक यांच्यातले नेमके भावनिक बंध टिपण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात काही...
 
‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान, भांडुप’ या संस्थेने भांडुपमध्ये तर विश्व हिंदू परिषद आणि महाराज अग्रसेन सेवा संस्थेने घाटकोपरमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे विनामूल्य प्रक्षेपण केले होते. समाजातील सज्जनशक्ती, विचारवंत, कार्यकर्ते यांनी हा चित्रपट पाहावा, हा त्यामागचा उद्देश. ‘भारतमाता प्रतिष्ठान’चे अभय जगताप आणि विश्व हिंदू परिषद, घाटकोपरचे सुशील साहनी या दोघांनीही चित्रपट पाहण्यासाठी समाजातील विविध मान्यवरांना आमंत्रित केलेले. साधुसंत, उच्चशिक्षित आणि विचारवंत लोक हा चित्रपट पाहताना काय प्रतिक्रिया देतील, हे पाहण्याची मला उत्सुकता होती. त्यासाठी सकाळी १०.३० वाजता सामाजिक कार्यकर्त्या मैत्रिणींसोबत ‘नीलयोग स्केअर मॉल’ला गेले.
दृश्य अगदी देशप्रेम आणि समाजस्नेहाने भारवलेले. ‘जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा हैं...’ ‘देश के गद्दारों को गोली मारो सालों को...’ ‘आझादी आझादी हमे चाहिए आझादी...’ ‘आतंकवाद से आझादी, देशद्रोहिंयोंसे आझादी, जातपातसे आझादी, हिंसा से आझादी, भ्रष्टचार से आझादी...’ अशा घोषणा देत तो युवकांचा जत्था समोरून येत होता. बाजूलाच महिलांनीही मोठे वर्तुळ करून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ असा जयघोष सुरू केला. दुसर्‍या बाजूने भगवे वस्त्रधारी साधुसंतही समांंतर रांगेत चालले होते. ज्येष्ठ नागरिकांचा घोळका ‘नीलयोग स्क्वेअर मॉल’च्या खाली उभा होता. या सगळ्यांचे वैशिष्ट्य हेच की, यांच्यातील बहुतेकांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहत होता. हे शेकडो लोक ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहण्यासाठी एकत्र जमले होते.
‘इस्कॉन’ मंदिरातूनही साधुजन आले होते. त्यांना विचारले, “तुम्हाला हा चित्रपट पाहावासा का वाटला?” तर त्यांचे उत्तर होते, “या चित्रपटाबद्दल खूप काही ऐकले होते. सहसा मुद्दाम आम्ही चित्रपट पाहत नाही. पण आपल्या भावंडांसोबत काय घडले, हे सत्य पाहायचे होते. समाजात ब्राह्मण म्हणजे सर्व सज्जनशक्ती एकवटली असती, तर हा नरसंहार झाला नसता. आम्ही धर्माशी बांधील आहोत. समाज आणि राष्ट्राचे संरक्षण करणे, हे धर्माचे काम आहे. धर्मसमाजजागृतीसाठी विशेष लक्ष आणि कार्य करण्याची गरज आहे. आम्हाला वाटते, या चित्रपटातून हे स्पष्ट होत आहे.”
सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या गटाला विचारले, तर त्यांचे म्हणणे की, “समाजाचे प्रश्न हे एकाएकी निर्माण होत नाहीत. त्याची सुरुवात कुठून ना कुठून होते. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये काश्मिरी हिंदूंची व्यथा मांडली आहे. याचे बीज कसे रूजले, त्याला खतपाणी कुणी घातले, याचे सगळे बारकावे या चित्रपटातून पाहायला मिळाले. समाजात काम करताना आता एक नजर आली की, जिथे कुठे अशी विषवल्लींचे बीज रूजत असेल, त्याला आळा घालायचा.” चित्रपट पाहताना टाचणी पडली तरी कळेल, इतकी शांतता होती. सर्वत्र एक नि:स्तब्धता. चित्रपट संपल्यावर चित्रपटगृहामध्येच सर्व प्रेक्षकांनी ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ प्रार्थना केली. बाहेर निघताना प्रत्येकाच्या डोळयात अश्रू आणि चेहर्‍यावर अतीव दु:ख आणि निर्धार होता. त्यातल्या काही युवकांशी बोलले, “तुम्हाला काय वाटले?” तर त्यांचे म्हणणे, “आम्ही डॉक्टर आहोत, वकील आहोत, पण आजपर्यंत हे सत्य आमच्यापासून लपवले गेले होते. अगदी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामधल्या नायकापासून त्याच्या आईबाबांची आणि भावाची हत्या लपवली गेली तसेच.
चित्रपटात प्राध्यापिका आहे. ती मुलांना देशविद्रोही बनवण्यासाठी बेमालूम खोटे बोलते, मुलांचे डोके भडकवते. आमचे डोके कुणी भडकवले नसले, तरी आम्हाला आजपर्यंत हे सत्य सांगणारे कुणीच शिक्षक का भेटले नाहीत? धर्माच्या नावावर हिंसा होत नाही. दहशतवादाला धर्म नसतो. श्रीराम मंदिरापेक्षा हॉस्पिटल बांधा, कसले हिंदूबिंदू काही नसते, असे सांगणारेच लोक स्वत:हून भेटले. ते आम्हाला आम्ही न बोलावता, न सांगता का भेटले असतील, याचे उत्तर या चित्रपटातून मिळाले. काय खोटे काय खरे? हे तपासण्याची गरज यापूर्वी वाटली नव्हती, पण ती आता वाटते.” देश,समाज आणि धर्म रक्षणातूनच आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे रक्षण होईल, असे मनोगत जो तो तिथे व्यक्त करत होता. एकंदर, या चित्रपटने भारतीय समाजमनात जागृतीची चेतना प्रफुल्लित केली आहे, हे नक्की!
 
@@AUTHORINFO_V1@@