वर्धा- बल्हारशाह चौथ्या रेल्वे मार्गिकेला केंद्र सरकराची मंजुरी

प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद होणार

    29-May-2025
Total Views |

fourth line



नवी दिल्ली, दि.२९ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि महाराष्ट्रातील वर्धा-बल्लारशाह चौथ्या मार्गिकेचाही समावेश आहे.

या प्रकल्पांचा अंदाजे एकूण खर्च ३,३९९ कोटी रुपये इतका असून हे प्रकल्प २०२९-३०पर्यंत पूर्ण होतील. हे प्रकल्प मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठीच्या पीएम-गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान चा भाग असून,एकात्मिक नियोजनाद्वारे हे शक्य झाले आहे, आणि ते नागरिक, वस्तू आणि सेवांच्या अखंड वाहतुकीसाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या चार जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यामध्ये सुमारे १७६ किलोमीटर भर पडेल. प्रस्तावित मल्टीट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे १९.७४ लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे ७८४ गावांची कनेक्टिव्हिटी (दळणवळण) सुधारेल.

कोळसा, सिमेंट, कोळसा, जिप्सम, फ्लाय अॅश, कंटेनर, शेतीमाल आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमता वाढवण्यासाठी होत असलेल्या या प्रकल्पांमुळे 18.40 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल. प्रकल्प बांधकामा दरम्यान हे प्रकल्प सुमारे ७४ लाख मानवी दिवसांचा थेट रोजगार देखील निर्माण करतील. या उपक्रमांमुळे प्रवासाच्या सोयीत सुधारणा होईल, लॉजिस्टिक खर्च कमी होईल, तेलाची आयात कमी प्रमाणात करावी लागेल तसेच कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यात देखील हातभार लागेल आणि शाश्वत तसेच कार्यक्षम रेल्वे वाहतुकीला पाठबळ मिळेल.

वाढीव क्षमतेच्या रेल्वे लाईन्समुळे गतिशीलतेत लक्षणीय भर पडेल आणि त्यातून भारतीय रेल्वेची परिचालनात्मक क्षमता आणि सेवेची विश्वासार्हता सुधारेल. रेल्वेचे हे बहु-पदरीकरण प्रस्ताव रेल्वेचे परिचालन सुरळीत करतील आणि गाड्यांचा खोळंबा कमी करतील.हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून एखाद्या भागाचा सर्वसमावेशक विकास साधण्यातून त्या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” करतील आणि त्यामुळे त्या भागातील लोकांच्या रोजगार/स्वयंरोजगार संधींमध्ये वाढ होईल.
 
 
विदर्भाच्या विकासाला गती मिळणार ! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पसरलेल्या रतलाम- नागदा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग आणि वर्धा ते बल्हारशाह दरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग मंजूर केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे आभार. पीएम गती शक्ती योजनेअंतर्गत, या नवीन रेल्वे मार्गांमुळे कोळसा, सिमेंट, जिप्सम, फ्लाय अॅश, कंटेनर, कृषी वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादनांची जलद वाहतूक शक्य होईल. १७६ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे मूल्य ₹३३९९ कोटी आहे. यामुळे प्रवासाची सोय सुधारेल, लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल, कच्च्या तेलाची आयात कमी होईल आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल. या उपक्रमामुळे या प्रदेशात शाश्वत आणि कार्यक्षम रेल्वे वाहतुकीला लक्षणीयरीत्या चालना मिळेल.