मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत म्हंटले की, 'शरद पवार साहेब हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येतो आहे.' असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर, त्यांचे बंधू नितेश राणे यांनीदेखील शरद पवार यांच्यावर टीका करताना 'महाविकासआघाडीवर नागासारखे बसलेले शरद पवार यांच्यापर्यंत आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे. तुम्ही आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.' असे म्हंटले होते.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान आमदार नितेश राणे यांनी म्हंटले होते की, "भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज तुम्हाला याठिकाणी फक्त गर्दी करायला बोलावलेले नाही. आजच्या या मोर्चातून विधानसभेत बसलेले महाविकासआघाडीचे मंत्री, घरातून बाहेर न पडलेले मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडीवर नागासारखे बसलेले शरद पवार यांच्यापर्यंत आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे. तुम्ही आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही."
भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांवर टीका करताना म्हंटले की, "ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिक यांना पाठीशी घालतात आणि अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेता, मग नवाब मलिक यांच्याशी तुमचे संबंध काय? कोण लागतो नवाब मलिक शरद पवारांचा? नवाब मलिक पवार कुटुंबीयांसाठी काही खास आहेत का? की नवाब मलिक खरे बोलले तर, पवार यांच्याबद्दल माहिती उघड होईल, अशी त्यांना भीती आहे? असा मला संशय वाटतो." दोघांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीने गुन्हा दाखल केला आहे.
निलेश आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल
भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर चव्हाण यांनी म्हंटले की, "शरद पवार यांचे आतंरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य करत आहेत. राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य केली जात आहेत. शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला आहे."