मोडेल पण वाकणार नाही...

    11-Mar-2022
Total Views | 21
 
             
chatrapati sambhaji  
    
 
 
‘मोडेल पण वाकणार नाही’ हे जीवनतत्त्व अखेरच्या श्वासापर्यंत पाळणारे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपतीराजे संभाजी महाराज यांना बलिदान दिनी भावपूर्ण अभिवादन अन् त्रिवार मानाचा मुजरा.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांना रणभूमीवर पराजित करण्याचं धाडस कोणा मोगल बादशाहात नव्हतं. कारण, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे अन् मरतात सिंहासारखेच! याला शिवकालीन इतिहास साक्षीदार आहे. महापराक्रमी आणि शत्रूंचा कर्दनकाळ महाराजा संभाजीराजे भोसले यांचा जन्म महाराणी सईबाई यांच्या उदरी १४ मे, १६५७ रोजी पुरंदर गडकिल्ल्याच्या गिरीशिखरावर झाला अन् जणू मराठा साम्राज्याचा सूर्यच उदयास आला. खरं तर, संभाजीराजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे ‘छत्रपती’ म्हणून नावरूपाला आले. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षीच त्यांनी ‘बुधभूषण’ नामक ग्रंथ लिहून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर प्रकाश टाकला. याशिवाय ‘नायिकाभेद’, ‘नवशिख’, ‘सात सतक’ या ग्रंथांचीदेखील त्यांनी निर्मिती केली. अशाप्रकारे जगाच्या पाठीवर शिवकालीन कालखंडात पहिला बाल साहित्यिक होण्याचा नावलौकिक त्यांनी मिळविला.
संभाजीराजे हे मराठा साम्राज्याचे राजपुत्र असल्याने त्यांना रणांगणावरील मोहिमा अन् राजनीतीतले डावपेच यांचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. तथापि, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संभाजीराजे लहान असतानाच त्यांच्या शिरावरील मातेचं छत्र हरपलं. संभाजीराजे यांचा सांभाळ आजी जिजाबाई यांनी केला. पुण्यातील कापूरहोळ येथील धाराऊ पाटील या महिला त्यांच्या दूधआई बनल्या. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांचीही संभाजीराजांवर खूप माया होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबच्या आग्रा भेटीच्या वेळी बाल संभाजींना आपल्याबरोबर नेलं. त्यावेळी राजे अवघे नऊ वर्षांचे होते. त्याप्रसंगी औरंगजेब हे बाल संभाजी यांना म्हणाले, “हमसे डर नही लगता क्या?” संभाजी चटकन उत्तरादाखल म्हणाले, “हम किसीसे डरते नही, बल्की हमे देखकर सामनेवाले डरते हैं।” हे उद्गार ऐकून औरंगजेबाची बोलतीच बंद झाली. धाडसीवृत्तीचे हे त्यांचे एक ठळक उदाहरण शिवचरित्रात सुवर्णाक्षरात नोंदले गेले. प्रभू रामचंद्रांनी रावणावर आक्रमण करण्यासाठी वानरसेनेच्या मदतीने सागरावर सेतू बांधला होता. असाच सेतू संभाजीराजांनी सिद्दी जोहरवर आक्रमण करण्याकरिता मुरुड-जंजिरा किल्ल्यावर चढाई करण्यासाठी बांधला होता. अशा महापराक्रमी संभाजीराजांना मानाचा मुजरा!
संभाजीराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान देताना इतिहासकार प्रसाददादा वडके म्हणतात, “धर्मवीर संभाजीराजांनी देवधर्माचे रक्षण करण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावले. त्यांचे राजकीय व आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता, धर्मरक्षा, कुशल प्रशासक या सर्व राज्यकारभाराच्या बाबी पिताश्री छत्रपती शिवाजी महाराजांसमानच होत्या.” धर्म अन् देवस्थानं रक्षणसंदर्भात त्यांनी सरदारांसाठी एक कडक फर्मान काढले होते ते म्हणजे, धर्म कार्यात खलेल न करणे अन् धर्म समारंभात अंतर पडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घ्यावी. संभाजीराजे आणि इंग्रज हेनंद्री ग्यारी यांच्यात गुलामगिरी व धर्मांतर बंदीसंदर्भात झालेल्या तहान्वये, “That the English shall buy none of my people belonging to my dominion to make them slaves or Christians.'' अशा प्रकारे राजांनी सक्तीने धर्मांतर करणार्‍या इंग्रज, पोर्तुगीज, मुस्लीम सत्ताधीशांना कडाडून विरोध केला. संभाजीराजांना साधूसंतांबद्दल नितांत आदरभाव होता. ते त्यांना मोठ्या दिलानं दानधर्म करत असत.
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी, १६८१ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. त्यांना संस्कृतसहित १६ भाषा अवगत होत्या. संभाजीराजे यांचा विवाह येसूबाईंशी झाला. पुढे त्या प्रधान मंडळात सदस्या होत्या. संभाजीराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्यकारभार सांभाळत असत. संभाजीराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा शुभारंभ गोमंतक प्रांतातून सुरू झाला. हळकोळण गावी आढळलेल्या एका शिलालेखावर मराठी अमलासंबंधी उद्देशून कोरले होते की, ‘आता हे हिंदुराज्य जाहले पासोन... पुढे याप्रमाणेच सकळाही चालवावे, सहसा धर्मकृत्यांना बाधा पोहोचवू नये. जर का करतील, त्यांसी महापातक आहे. जो धामधूम करील, त्याला स्वामी जीवेच मारीन. राजश्री आबासाहेबांना जे संकल्पित आहे, ते चालवावे, हे आम्हास अगत्य,’ अशा स्पष्ट शब्दांत वेगवेगळ्या प्रसंगी फर्मान काढले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या मराठी स्वराज्याला तसूभरही धक्का पोहोचू नये, हा शंभूराजांचा सर्वस्वी प्रयत्न असे. शंभूराजांची शिस्त अतिशय करडी होती.
अष्टमंडळातील आण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशव्यांनी महाराजांविरुद्ध कटकारस्थान केल्याबद्दल राज्यद्रोहाखाली महाराजांनी या दोन्ही जणांना अन् संबंधित सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन मृत्युदंड दिला. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजीराजांनी निरंतर २३ वर्षे सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात शत्रूंशी समर्थपणे लढा दिला. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंगावर आपला अंगठा कापून रक्ताचा अभिषेक केला होता. पण, संभाजीराजांनी एक पाऊल पुढे टाकून याच स्वराज्यासाठी प्राणार्पण करून स्वतःच्या जीवाचा अभिषेक करून घेतला. शिवकालीन इतिहासाची सुवर्ण पानं उलटून पाहिली, तर शिवरायांचे कर्तृत्व अन् शंभूराजांचे मरणत्व, या दोन गोष्टींचे प्रकर्षाने स्मरण होते. केवळ मुघल बादशाहांनाच नव्हे, तर अंगावर धावून आलेल्या सिंहालादेखील शंभूराजांनी सळो की पळो करून सोडले होते. ‘मोडेल पण वाकणार नाही,’ हा क्षत्रियबाणा जपून औरंगजेबसारख्या जुलुमी बादशाहाकरवी देहाचे तुकडे-तुकडे झालेत, तरी त्या दुष्ट व क्रूर मुघल बादशाहासमोर राजांनी आपली मान तुकवली नाही अन् शरणागती पत्करली नाही. त्यांच्यासह कवी कलश यांचाही अतोनात छळ करून औरंगजेबाने जीव घेतला. शूरवीर, कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी, करारी बाणा असलेले, कुशल प्रशासक, विद्वान, शिस्तप्रिय, मातृभूमीचे पाईक, निस्सीम देशप्रेमी, जाज्वल्य राष्ट्राभिमानी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही नतमस्तक होतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात लेखकांनी ग्रंथ अन् नाटकं लिहिलीत. त्यात त्यांच्या जीवनातील विविध चांगल्या अन् दुर्दैवी घटना, पराक्रमाचा व विद्वत्तेचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यात छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ-डॉ. जयसिंगराव पवार; राजा शंभू छत्रपती-विजयराव देशमुख; शिवपुत्र संभाजी-डॉ. कमल गोखले; छत्रपती संभाजी महाराज प्रकाशन- वा. सी. बेंद्रे; इथे ओशाळला मृत्यू (नाटक)- वसंत कानेटकर; छावा-शिवाजी सावंत; रायगडाला जेव्हा जाग येते (नाटक)-वसंत कानेटकर; संभाजी- विश्वास पाटील; मृत्युंजय- शिवाजी सावंत; राज संन्यास- राम गणेश गडकरी; आम्ही यातनांचे स्वामी- वा. ना. देशपांडे; अर्ध्य- नयनतारा देसाई; अश्रू ढळले रायगडाचे (नाटक)- अर्जुनराव झेंडे आदी लेखकांचे ग्रंथ अन् नाटकं यांचा समावेश आहे. संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे भीमा, इंद्रायणी, भीमा, आंद्रा, सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर त्यांचे समाधी स्थळ उभारले आहे. ‘मोडेल पण वाकणार नाही’ हे जीवनतत्त्व अखेरच्या श्वासापर्यंत पाळणारे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपतीराजे संभाजी महाराज यांना भावपूर्ण अभिवादन अन् त्रिवार मानाचा मुजरा.
-रणवीर राजपूत
(लेखक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ठाणेचे सदस्य आहेत.)
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121