
ऐंशीच्या दशकात अरुणाचल प्रदेशात ख्रिश्चन मिशनर्यांवर पूर्णपणे बंदी होती. कोणी लोकं किंवा संस्था धर्मांतरणाचे काम करताना आढळली, तर परिणाम वाईट होत असे. याचं काळाच प्रेमभाई गायकवाड नावाचे एक मराठी गृहस्थ अरुणाचल-आसामच्या सीमेवर एका खोपटात राहत असत. उंची जेमतेम पाच फूट, काळा रंग, चेहर्यावर देवीचे व्रण... म्हणजे व्यक्तिमत्त्वात प्रथमदर्शनी आकर्षक असे काहीही नाही. पण, एकदा बोलायला लागले की, लोक भुलून जातील अशी मिठ्ठास वाणी! हा माणूस भगवे कपडे, गळ्यात माळा असा वेश परिधान करीत असे आणि या कपड्यांच्या आत ‘क्रॉस’ घालत असे. अरुणाचलात सगळ्या पोलिसी तपासणीस चकवून नियमितपणे तेथील वाड्यावस्त्यांवर फिरत असे. तेथील होतकरू मुले हेरून त्यांना शिलाँगच्या मिशनरी शाळेत पाठवत असे. हे उद्योग करत असताना त्यांना एक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा मुलगा भेटला. त्यांनी त्याच्यावर विशेष मेहनत घेतली. त्याला तयार केले. ‘फंडिंग’ उभे करून त्याच्या भागातला लोकपप्रतिनिधी बनवले. हे झाल्यावर सहा महिन्यांच्या आत मिशनरींच्या कार्यक्रमांवरची अरुणाचलातली बंदी उठवली गेली. माशांचं मोहोळ उठावं, असे हे लोक धडाधड आपला अजेंडा राबवू लागले. तेव्हापासून अरुणाचल प्रदेशात मतांतरणाला मोठा वेग आला.
त्याकाळात ही सगळी सामाजिक स्थित्यंतरे उघड्या डोळ्यांनी आणि सजग मनाने पाहणारे लोक कामाला लागले. त्यांनी स्वधर्मी लोकांना स्वधर्माची नवीन ओळख करून द्यायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. अनेक लोक परधर्मात प्रवेश करण्यास नकार देऊ लागली. आपल्या वडिलोपार्जित धर्माची तळी उचलून धरू लागले. एकमेकांना हिंमत देऊ लागले. अनेक लोक कार्यकर्ते म्हणून या कामाला हातभार लावू लागले. अनेक धर्मांतरित परत स्वधर्मात येऊ लागले. द्योनी पोलो धर्माला नवे आयाम मिळू लागले. त्यांच्या मूळ तत्त्वज्ञानाला चांगली बैठक मिळू लागली. अनावश्यक, अतिरंजित, अंधश्रद्धेचा भाग म्हणून सर्वानुमते मान्य झालेल्या धर्मातील बाबी टाकून देऊन त्यांची जागा विवेकी, प्रगत, विचारप्रवण प्रथा, विचार, संकल्पनांनी घेतली. आजही हा प्रवास चालूच आहेत. या सगळ्या कामाची सुरुवात तालोम रुकबो यांनी केली, हे तर आपण जाणतोच.
या सगळ्या कष्टांचे, अविरत नि:स्वार्थ समाजाभिमुख कार्याचे सुपरिणाम अरुणाचल प्रदेशात आता ठळकपणे दिसू लागले आहेत. हे प्रमाण वाढतच जाणार आहे, याची खात्रीही वाटू लागली आहे. अरुणाचलात विविध प्रकारच्या पूजापद्धती आहेत. पण, प्रामुख्याने सर्वच लोक सूर्य-चंद्र, निसर्ग यांना पूज्य मानतात. त्यांच्या भाषा, पेहराव, चालीरीती वेगवेगळ्या असल्या तरी धर्माच्या मूळ संकल्पना, तत्त्वज्ञान, जीवनपद्धती एकमेकांशी मिळतीजुळतीच आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत इथे जनजातीचे धार्मिक स्थळ असा काही प्रकारच नव्हता. अवतीभवतीचा विराट, अद्भुत निसर्ग हाच जर देव असेल, तर त्याला मंदिरात कसे बरे माववता येणार? नाही का?
पण, धर्माला वाचवायचे तर धर्माला नवी दिशा दिली पाहिजे, नव्या पद्धतीने, अधिक सुनिश्चित आणि सुस्पष्ट स्वरूपात आपला धर्म लोकांसमोर नेला पाहिजे, इथे नव्याने रुजवला पाहिजे, याची पुरेपूर जाणीव इथल्या समाजबांधवांना होती. आज गेल्या २५ वर्षांत अरुणाचलमध्ये विविध स्वधर्मीयांची स्वतःची अशी ५५० प्रार्थनास्थळे निर्माण झाली आहेत. केवळ १८ लाख लोकसंख्या असणार्या या राज्यात ही संख्या प्रचंड नसली, तरी परिणामकारक नक्कीच आहे. ही संख्या वाढतच जाणार आहे. आता लोकांना तिथे नियमितपणे जाण्याची सवयही लागते आहे. अनेक उत्तमोत्तम उपक्रम या संस्थांच्या अंतर्गत इथे होऊ लागले आहेत.
दुसर्या कोणत्याही धर्माच्या आक्रमणामुळे स्वधर्माची नैसर्गिकता आहत होऊ नये, येथील सामाजिकता दूषित होऊ नये, यासाठी स्वधर्म, स्वराष्ट्रावर प्रखर निष्ठा असणारे, नव्या युगाची, बदलत्या परिस्थितीची सुस्पष्ट जाणीव असणारे लोक ईशान्य भारतीय समाजांत वाढू लागले आहेत, याचेच वारंवार प्रत्यंतर विविध गोष्टींमधून आपल्याला येत असते. स्वधर्मातच राहणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, इतक्यावरच आता हे लोक थांबलेले नाहीत. आपल्या समाजाची संपूर्ण सुरक्षा, आपल्या हक्कांची स्पष्ट जाणीव, त्यांच्यावर होणारे आघात याबाबतही अरुणाचली जनता जागरूक होत आहे.
दि. १२ फेब्रुवारी या दिवशी पासीघाटमध्ये जी बैठक झाली, तीही याचेच द्योतक म्हणावे लागेल. ’अनुसूचित जमातींमधून धर्मांतरित व्यक्तींना वगळणे का आवश्यक आहे’ या विषयावर जनजाती सुरक्षा मंच पूर्व सियांग जिल्हा युनिटने ही सार्वजनिक बैठक आयोजित केली होती. पूर्व सियांग जिल्ह्यातील गाव बुराह (प्रमुख), ‘पीआरआय’ नेते, स्थानिक धार्मिक नेते आणि आदी बाने केबांगसारख्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी अश्या ३०० लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ईशान्येतील धर्मांतरित लोक अल्पसंख्याक असण्याचा फायदा मिळवू लागतात. जन्माने ते अनुसूचित जमातींतही मोडतात. याचा फायदा घेऊन अल्पसंख्याक व अनुसूचित जमातींसाठी असणारे असे दोन्ही फायदे ते मिळवू लागतात. आपोआपच स्वधर्माचे पालन करणार्या लोकांना अनुसूचित जमातीसाठी असणार्या सुविधा अपुर्या पडू लागतात. कारण, रिक्त स्थानांची संख्या सीमित असते. म्हणूनच अशा प्रकारे दुहेरी दर्जा मिळवण्याच्या विरोधातला आवाज या प्रदेशात जोर धरू लागला आहे. आज जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये मोठ्या संख्येने ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारे लोक अल्पसंख्याक आणि एसटी दर्जाचे असे दुहेरी लाभ घेत आहेत.
या सभेत वक्त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.त्याचा सारांश असा-
‘‘आम्ही कोणताही धर्म, त्याचे आचरण किंवा संस्कृतीचे विरोधक नाही. आम्ही केवळ आमच्या समाजाचे हित चिंततो. दुहेरी फायदा घेणारे लोक स्वधर्मी आणि धर्मांतरित अशा दोन्ही समाजांसाठी घातक आहेत. अनुसूचित जाती अंतर्गत मिळणार्या सुविधांवर ते जो हक्क सांगतात, तो अनैतिक आहे, म्हणूनच आम्ही याचा निषेध करतो. आम्ही अनुसूचित जनजातीय समाजाच्या न्याय्य हक्काची मागणी करत आहोत. त्यासाठीच आम्ही भारतीय संविधानाच्या ‘कलम ३४२’मध्ये दुरुस्तीची मागणी करत आहोत. कारण, काही धार्मिक अनुयायी अल्पसंख्याक आणि एसटी आयोगाचा लाभ घेत आहेत. आमची मागणी ही आहे की, आमच्या लोकांच्या काही धार्मिक वर्गाने घेतलेल्या दुहेरी फायद्याच्या प्रथा बंद करा. अल्पसंख्याक हे ‘अल्पसंख्याक’ म्हणूनच राहिले पाहिजे आणि अनुसूचित जमातीने अनुसूचित जमातीच्या तरतुदींचा लाभ घेतला पाहिजे.”
पूर्वाश्रमीची अनुसूचित जमातीतील व्यक्ती धर्मांतरणानंतर अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती होत. मग त्यांना अनुसूचित जमातीला मिळणार्या सुविधा मिळवण्याचा कोणता अधिकार आहे, असा रास्त सवाल इथे उपस्थित केला गेला. शिष्टमंडळाने १. स्वदेशी धर्म न पाळता धर्मांतर केलेल्या कोणत्याही व्यक्तीला एसटी यादीतून वगळण्यात यावे. २. ‘अरुणाचल प्रदेश धार्मिक कायदा १९७८’ अरुणाचल प्रदेश सरकारने लागू केला पाहिजे आणि ३. एसटी प्रमाणपत्र अर्जामध्ये धर्मासाठी स्वतंत्र स्तंभ समाविष्ट करावा, अशा मागण्या सरकारकडे करावयाचा ठराव केला आहे. केवळ ३०० लोकांच्या बैठकीला इतके काय महत्त्व द्यायचे, असा प्रश्न वाचकांना पडू शकेल. पण, या मागण्या सरकार दरबारी रुजू झाल्या आणि त्यावर विचारविनिमय सुरू झाला की, केवळ अरुणाचल प्रदेशच नव्हे, तर सगळ्या भारतात त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटणार आहेत, त्या दृष्टिकोनातून या लेखाचे निमित्त...
- अमिता आपटे