एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी सक्षम पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा, कार्यक्षम प्रशासन, उद्योग व व्यापाराला चालना तसेच, पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याशिवाय, स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग आणि शाश्वत साधनसंपत्तीचा वापर हेदेखील प्रगतीला गती देतात. हे मी मागील चार वर्षांपासून जम्मू-काश्मीरसंबंधित भेटीदरम्यान येथील २० जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी अनुभवले आणि पाहिले. दुर्गम गावे व सीमावर्ती भागदेखील हळूहळू पण ठामपणे हीच बदलाची आणि विकासाची छटा दर्शवू लागले आहेत. काही अपवाद असतील. परंतु, यामुळे हे निर्विवाद सत्य बदलत नाही की, जम्मू आणि काश्मीर आज बदलाच्या आणि विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत. त्याचाच या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा..जम्मू आणि काश्मीरच्या विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही वर्षांत वाहतूकव्यवस्थेत झालेल्या बदलांनी विकासाचा वेगच बदलून टाकला आहे. नवीन डांबरी रस्ते, चौपदरीकरण व डोंगराळ भागातही सुलभ पोहोच देणारे जोडरस्ते यामुळे गावागावांतली कनेटिव्हिटी सुधारली आहे. अखनूर पुल प्रकल्प, जम्मू रिंग रोड, रेल्वे प्रकल्पांमुळे कनेटिव्हिटीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पर्यटन क्षेत्रात पटनीटॉप, भद्रवाह, सुरिनसर-मानसर ही ठिकाणे नव्याने विकसित झाली आहेत.
ई-ऑटोरिक्षा आणि इलेट्रिक बससेवांच्या सुरुवातीमुळे नागरिकांना स्वच्छ, किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे महिलांना व विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास मिळत असून, रोजच्या प्रवासाचा खर्चही कमी झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा सुरू झाल्याने त्यांना आर्थिक दिलासा तर मिळालाच आहे. पण, त्याचबरोबर रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवांकडे जाण्यासाठी अधिक स्वातंत्र्यही मिळाले आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी ही योजना सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक उपलब्ध करून देत असून, त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण अधिक वेगाने घडवून आणत आहे.
रेल्वे क्षेत्रात जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या प्रगतीने प्रदेशाच्या वाहतूक आणि अर्थव्यवस्थेला नवा आयाम दिला आहे. जम्मू रेल्वे विभागाची स्थापना हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला असून, यामुळे स्थानिक पातळीवर रेल्वे सेवा सुधारणा आणि नव्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. वंदे भारत एसप्रेससारख्या आधुनिक, वेगवान आणि आरामदायी गाड्यांच्या सुरुवातीमुळे जम्मू ते काश्मीर प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला आहे. याशिवाय, उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक प्रकल्पामुळे डोंगराळ भागांमध्ये रेल्वे पोहोचत असून, पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना नवी चालना मिळत आहे. या रेल्वे सुविधांमुळे प्रदेशातील लोकांना प्रवासाची सुलभता, व्यापाराची वाढ आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
कृषी क्षेत्रातली क्रांती - शेती ते उद्योग व उद्योजकताएकात्मिक शेती पद्धती आणि कृषी-तंत्रज्ञान (असीळ-ढशलह) यांचा संगम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरत आहे. एकात्मिक शेतीत पीक उत्पादनाबरोबरच पशुपालन, मत्स्यपालन, फळबागा, भाजीपाला शेती आणि इतर पूरक उपक्रमांचा समावेश करून शेतकर्यांचे उत्पन्न वाढवले जाते. त्यासोबतच ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर-आधारित सिंचन, माती विश्लेषण, हवामान अंदाज, मोबाईल अॅपद्वारे सल्ला आदी. असीळ-ढशलह उपाययोजनांमुळे शेती अधिक वैज्ञानिक, कार्यक्षम आणि शाश्वत बनत आहे. या दोन्हींच्या एकत्रित वापरामुळे शेतीत उत्पादनक्षमता वाढून शेतकर्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत.
लाव्हेंडरच्या क्रांतीची साक्ष मी स्वतः घेतली आहे. एकेकाळी पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या डोडा जिल्ह्यातील अनेक खेड्यांमध्ये आता लाव्हेंडर शेतीचे जाळे विस्तारले आहे. जम्मू विभागातील डोडा तर काश्मीर विभागातील पुलवामा आणि गांदरबल जिल्ह्यांत लाव्हेंडरचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. केवळ शेती नव्हे, तर तेल, साबण, अत्तर, अगरबत्ती, जेल यांसारख्या लाव्हेंडर आधारित मूल्यवर्धित उत्पादनांची एक संपूर्ण साखळी उभी राहत आहे.
आज राजौरी, पूंछ आणि कठुआ यांसारख्या जिल्ह्यांमध्येही लाव्हेंडरची शयता चाचपली जात आहे. अशा दुर्गम भागात कृषी आधारित उद्योग उभे राहत असताना, शेतकरी आणि युवक उद्योजकतेकडे वळत आहेत. आज शेतकरी, युवक, महिला यांनी लाव्हेंडरच्या माध्यमातून केवळ शेती नव्हे, तर उद्योग आणि निर्यातक्षम ब्रॅण्डिंगमध्ये यश मिळवले आहे.
केवळ लाव्हेंडर नव्हे, तर काश्मीरच्या केसरातही नावीन्याचा सुगंध आहे. केसरचे चहा, फेस वॉश, स्किन जेल, केशतेल यांसारखे नवीन प्रॉडक्ट्स आता बाजारात उपलब्ध होत आहेत. यांसारख्या नवकल्पनांमुळे कृषी उद्योजकता नव्या वळणावर जात आहे. जम्मू विभागामध्ये आजवर केवळ किश्तवाडमध्ये केशराची शेती केली जात होती. आता राजौरी जिल्ह्यातदेखील प्रायोगिकतत्त्वावर केशराची शेती होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
लसीपोरा येथील अॅपल ग्रेडिंग आणि पॅकिंग युनिट्सला भेट देताना उत्पादनातून मूल्यवर्धन कसे होते, हे मी अनुभवले. याच साखळीतून अलुबुखारा, नाशपाती, चेरी आणि प्लम यांसारख्या अन्य फळांनाही स्थानिक प्रक्रिया सुविधा लाभू लागल्या आहेत. यातून शीतगृहे, कोल्ड चेन, ड्रायिंग आणि एस्पोर्ट पॅकिंग यांसारख्या संधी तयार झाल्या.
उद्योजकतेची क्रांती : शिक्षण संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका
या सर्व विकासाचा बांधेबांध झाला. विकासाची बांधेबंद झाली आहे, जम्मू आणि काश्मीरच्या नव्या स्टार्टअप धोरणाने. जेके स्टार्टअप पॉलिसी आणि विविध योजनांच्या माध्यमातून आज ४०० हून अधिक स्टार्टअप्स हे इंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेन्ट इन्स्टिट्यूट मध्ये नोंदणीकृत आहेत. याशिवाय, अनेक स्टार्टअप्स ङ्गएसकेयु-एसटीफ, आययुएसटी, युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू, काश्मीर युनिव्हर्सिटी, एनआयटी श्रीनगर, क्लास्टर युनिव्हर्सिटी इत्यादी संस्थांमध्ये झाले आहेत. आयआयटी जम्मू, आयआयएम जम्मू तसेच, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी श्रीनगर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी जम्मू अॅण्ड काश्मीर अशा अनेक शैक्षणिक संस्थांनी सरकारी विभागांसोबत सहयोग करून कृषी संशोधन, स्टार्टअप्स इनयुबेशन, कौशल्य विकास आणि लोकाभिमुख धोरणे आखली आहेत. यामुळे शाश्वत विकासाची व्याप्ती वाढली आहे. या संस्थांनी संशोधन, नवकल्पना, व्यवसाय सल्ला व बिझनेस इन्युबेशन हब स्थापन केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक समस्या ओळखून त्यावर आधारित स्टार्टअप्स सुरू करता आले आहेत.
तरुणांची आणि महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल
महिला आणि युवक नेतृत्वाचे स्टार्टअप्स विविध क्षेत्रांत उभे राहत आहेत. अरोमा उत्पादन, फळप्रक्रिया, हस्तकला ब्रॅण्डिंग, टुरिझम आधारित प्लॅटफॉर्म्स, फूड डिलिव्हरी सोल्युशन्स, हेल्थ आणि वेलनेस प्रॉडट्स यांमध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग आहे. महिला स्वयं-साहाय्यता गटांपासून ते विद्यापीठातील संशोधक युवतींपर्यंत या सर्वांनी सामाजिक आणि आर्थिक विकासात आपला हातभार लावला आहे. उदाहरणार्थ, कुपवाडा, उधमपूर, कठुआमधील महिला गटांनी अरोमा प्रक्रिया युनिट्स सुरू केली आहेत, तर राजौरी व किश्तवाडमधील युवकांनी वन्य फळांवर आधारित हेल्थ सप्लिमेंट्सचे स्टार्टअप्स उभारले आहेत. या सगळ्याचा सारांश म्हणजे, जम्मू आणि काश्मीरची कृषी आज शेतीपुरती राहिलेली नाही. ती एक संपूर्ण ग्रामीण उद्योग व्यवस्था बनू लागली आहे, जी नव्या भारताच्या ग्रामीण भागातली आत्मनिर्भरतेची खूण ठरते. उद्योजकतेचा झपाट्याने होणार्या प्रसारामुळे जम्मू आणि काश्मीरचा नवा चेहरा पुढे येत आहे.
सांस्कृतिक आणि साहित्यिक नवचैतन्य
जम्मू आणि काश्मीरमध्ये आता केवळ सुरक्षा आणि संघर्ष यांची वार्ता नसून, संस्कृती, साहित्य, आणि कला यांनादेखील एक उन्नत स्थान मिळत आहे. काश्मीर आणि जम्मू या दोन्ही विभागांत सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला महोत्सव, संगीत जलसे आणि साहित्य संमेलनांचे आयोजन वाढले आहे. तिरंगा यात्रा, युवा साहित्य उत्सव आणि कला कुंभ यांसारख्या उपक्रमांतून युवकांचा सहभाग वाढतो आहे. हस्तकला आणि हॅण्डलूम क्षेत्रात थेाशप डकॠी चा सहभाग वाढला आहे, जे विकासाच्या प्रक्रियेत संस्कृती आणि परंपरेची संजीवनी ठरत आहेत.
जम्मू विभागात डोगरा लिटरेचर फेस्टिव्हल, अखनूर सांस्कृतिक समारोह, चिनाब व्हॅली म्युझिक फेस्टिव्हल यांसारख्या कार्यक्रमांनी तरुणांना स्थानिक भाषांचा गौरव करायला भाग पाडले आहे. काश्मीरमध्ये काश्मीर लिटफेस्ट, श्रीनगर हेरिटेज वॉस, शहर-ए-खास आर्ट एझिबिशन्स, सुफी नाईट्स या उपक्रमांनी स्थानिक संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. तसेच, नऊ दिवस चाललेल्या चिनार बुक फेस्टिव्हलमुळे साहित्य, संस्कृती आणि ज्ञानाची देवाणघेवाण घडून आली. युवक कलाकार, लेखक, चित्रकार आणि कथाकथनकार आता आपली कलाकृती वास्तववादी, परिवर्तनशील आणि जागतिक संदर्भात सादर करत आहेत. या उपक्रमांना प्रशासन, एनआयएफटी, कला मंडळे, विद्यापीठं आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था सहकार्य देत आहेत. जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये जम्मू आणि काश्मीरने अलीकडच्या काळात आपली ठळक छाप सोडली आहे. श्रीनगरमध्ये आयोजित जी २० परिषदेने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदेशाची ओळख उंचावली, तर मिस वर्ल्ड कार्यक्रमामुळे जागतिक फॅशन आणि पर्यटन क्षेत्रातही लक्ष वेधले. युनेस्कोने श्रीनगरला क्राफ्ट सिटी घोषित केल्याने येथील हस्तकला, परंपरा आणि कारागिरांचा सन्मान झाला. या सर्व उपक्रमांनी जम्मू आणि काश्मीरला प्रगत, समृद्ध आणि सकारात्मक दिशेने नेणारे जागतिक मंच प्रदान केले आहे.
बडगाम, बारामुला येथे वृद्धांसाठी विविध प्रकारचे खेळ हल्ली आयोजित केले जातात. ही खरंच काश्मीरमध्ये घडलेली आगळीवेगळी आणि स्तुत्य गोष्ट आहे. बडगाम जिल्ह्यात ङ्गसीनियर सिटिझन्स स्पोर्ट्स वीकफ दरम्यान बीरवाह येथे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, कबड्डी, कारम, टग ऑफ वॉर, स्कीपिंग-रोप या खेळांमध्ये शेकडो वृद्ध नागरिकांनी (पुरुष व महिला) उत्साहाने भाग घेतला. स्थानिक कला माध्यमातून त्यांनी व्यसनी वृत्ती आणि समाजातील गैरसमजांवर प्रकाश टाकणारे नाट्य सादर केले. तसेच, बारामुलामध्ये जी. डी. महाविद्यालयामध्ये आयोजित स्पोर्ट्स फॉर सिनियर्स कार्यक्रमात सुमारे ४५ वृद्ध नागरिकांनी फुटबॉल व ङ्गटग ऑफ वॉरफमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमातून प्रशासनाने वृद्धांना मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी क्रीडा किती महत्त्वाची हे अधोरेखित केले आहे. वय हा केवळ एक आकडा आहे, मी या वयात फुटबॉल खेळू शकेन, असा कधी विचार केला नव्हता. मला तरुण असल्याचे वाटले, जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया कळल्या तेव्हा भारावून गेले. कारण, क्रीडा विभागासोबत जेव्हा आम्ही जम्मू काश्मीरचे खेळ व क्रीडा धोरण तयार केले, तेव्हा त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी खेळ असावेत असे मांडले होते. या गोष्टीची पूर्ती होत असल्याचे समाधान वाटले.
सीमांवरची ऊर्जा : जीवनाचा नवा सूर
सुचेतगढ, अर्णिया, बिश्नाह, अखनूर, गुरेझ, मच्छिल, कंगन व अशा अनेक सीमावर्ती भागांचे जीवन प्रत्यक्ष पाहत असताना असे लक्षात आले की, तेथील लोक केवळ नागरिक नसून परिवर्तनाचे वाहक आहेत. विशेषतः त्रेवा गावात महिला सरपंच बलवीर काहलोन यांनी शेतीसाठी यंत्रणा, पायाभूत सुविधा व स्टार्टअप्सची प्रेरणा दिली; महिलांना आर्थिक सशक्तीकरण व तरुणांना उद्योजकतेकडे धाडले. सीमावर्ती भागदेखील डिजिटल शेती, महिला स्वयं-साहाय्यता गट, शिक्षण आणि प्रशासनाच्या सहकार्याच्या मातीतून बहरलेली आत्मनिर्भरता उभी करत आहेत.
गुज्जर-बकरवाल समाजाची समावेशी वाटचाल
कलम ३७० आणि ३५ रद्द झाल्यानंतर, गुज्जर-बकरवाल समाजाला आरक्षण, जमीन हक्क, शिक्षण व आरोग्य सेवा अधिक सुलभ झाल्या. स्थायी निवास प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा अधिक लाभ मिळतो आहे. जनजातीय हाट्स, वन अधिकार, आरडीडी स्कीम्स, आणि वनाधिकार कायद्यांतर्गत त्यांना भक्कम पाठबळ मिळाले आहे. महिला आणि मुली शिक्षण आणि उद्योजकतेकडे वळू लागल्या आहेत.
आवाम की आवाज - नागरिक व प्रशासन यांच्यातील नवा संवाद
आवाम की आवाज ही मा. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या पुढाकाराने सुरू केलेली रेडिओवरची योजना म्हणजे नागरिकांशी थेट संवादाचा एक अभिनव उपक्रम आहे, जी सरकार आणि सामान्य जनतेतील दरी मिटवते. दर महिन्याला होणारा हा संवाद आता केवळ रेडिओ कार्यक्रम न राहता, जनतेच्या हक्कांचा, शंका-समस्या आणि कल्पना थेट पोहोचवणारा मंच बनला आहे. या कार्यक्रमातून शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, स्टार्टअप्स, व्यापारी, महिलांचे प्रतिनिधी थेट प्रशासनाशी संवाद साधतात. त्यातून निर्माण होणार्या उपक्रमांना प्रशासनाकडून पाठबळ मिळते आणि अनेक कल्पना प्रत्यक्ष अंमलातही आणल्या गेल्या आहेत. कचरामुक्त गाव, महिला आरोग्य मोहिमा, स्थानिक हस्तकलेला चालना, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यांसारख्या या संवादातून प्रशासन अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख झाले आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांत काश्मीर आणि जम्मू विभागांमध्ये विकसित झालेल्या सर्व क्षेत्रांमुळे लोकांचा आत्मविश्वास नव्या पातळीवर पोहोचला आहे. पहिला फक्त सुरक्षा आणि संघर्ष होते; आता आमच्या गावात उद्योग, शिक्षण, संस्कृती आणि आत्मनिर्भरतेचा सूर आहे,फफ ही सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया आहे. काही अशादेखील प्रतिक्रिया आहेत, ङ्गङ्घलाव्हेंडर आणि केसरने आमचे उत्पन्न दुप्पट केले. आता आम्ही उद्योजक व्हायचा विचार करतो. माझ्या हातून उत्पादित साबण आता देशभर विकतो. माझा आत्मसन्मान वाढला. आयआयटी आणि ईडीआयमध्ये मिळालेल्या मार्गदर्शनाने मला व्यवसायाची दिशा मिळाली.फफ
मागील पाच ते सहा वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बदलांविषयी नागरिकांच्या भावना मिश्र स्वरूपाच्या असल्या, तरी बहुतेक ठिकाणी सकारात्मकता जाणवते. सुधारलेली पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यटन आणि गुंतवणूक यांमुळे अनेकांना विकासाची नवी संधी दिसत आहे. राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झाल्याने थेट केंद्रीय योजनांचा लाभ, जलद निर्णयप्रक्रिया आणि सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट झाली, असे अनेकांचे मत आहे, तर काहींना स्थानिक स्वायत्ततेबद्दल प्रश्नही पडतात. सध्याच्या घडीला जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या अपेक्षा स्पष्ट आहेत. स्थिर रोजगाराच्या संधी, युवकांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाश्वत पर्यटन, कृषी व उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक तसेच, दीर्घकालीन शांतता व सुरक्षितता. या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हेच पुढील विकासाचे आधारस्तंभ ठरणार आहेत.
जम्मू-काश्मीरची बदलती ओळख ही माझ्यासारख्या अभ्यासकांसाठी प्रेरणादायक ठरणारी आहे. सीमावर्ती भागांतून सुरू झालेली ही विकासयात्रा, आज प्रत्येक जिल्ह्यात नवे पर्व लिहीत आहे. कृषी ते उद्योग, शिक्षण ते संस्कृती, प्रशासन ते नागरिक प्रत्येक पातळीवर हा बदल सर्वसमावेशक आणि आश्वासक आहे. हा बदल फक्त आकडे नव्हे, तो भाव आहे, स्वतःच्या जगण्याचा, समाजाचा आणि भावी पिढीचा आत्मविश्वासाचा. हा बदल शब्दांत नाही, तर दृष्टिकोनात आहे. एकेकाळी संघर्षाच्या छायेत असलेले राज्य आज संवेदनशील, सृजनशील आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे केंद्रबिंदू बनत आहे.
- रुचिता राणे
(लेखिका पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर येथे जम्मू-काश्मीर विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)
९८६९१७०७१७/ ८८२८२०५१५८