दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथें कर माझे जुळती

    15-Aug-2025
Total Views |

३० जुलै २०२५ ची सकाळ आम्हा सर्व सेविकासाठी मातृछाया हरपल्याचे जाणीव करून देणारी ठरली. राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे (वय ९७) यांचे नागपूर येथील समितीच्या धंतोली परिसरातील देवी अहिल्या मंदिर कार्यालयात सकाळी ९:०५ वाजता निधन झाले आणि एक ध्येयासाठी सतत तेवणारा तेजोमय दीप शांत झाला.

समितीच्या संस्थापिका, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर (मावशी), यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. वंदनीय मावशींसोबत काम करणाऱ्या काही सेविकारूपी मोत्याच्या अखंड प्रयत्नांमुळेच समितीचा वटवृक्ष आज सर्वदूर विखुरलेला दिसतो. त्या मोत्यिक माळेतील एक मोती निखळला.

मूळ नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे बालपण व्यतीत केलेल्या प्रमिल मावशी शिक्षण पूर्ण करून नोकरी निमित्ताने नागपूर येथे आल्या आणि कायमच्या नागपूरच्या झाल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नागपूरमध्ये शिक्षिका म्हणून आणि नंतर सरकारी नोकरीत वरिष्ठ अंकेक्षक (Senior Auditor) म्हणूनही काम केले. मात्र, समितीच्या कार्यासाठी त्यांनी १२ वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि स्वतःला पूर्णपणे संघटनेच्या कार्यासाठी वाहून घेतले. १९५० ते १९६४ पर्यंत त्या विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका होत्या.

काही वर्षे डी ए जी पी टी तील नोकरी सांभाळत त्या वं. मावशींच्या सोबत समितीचे काम करीत होत्या. सन १९६५ ला त्या नागपुरातील अहिल्या मंदिर या समितिच्या कार्यालयात वास्तव्यास आल्या त्या शेवटच्या श्वासापर्यंत.. म्हणजे तब्बल 6 दशके त्या अहिल्या मंदिरात होत्या. देवी अहिल्या यांचे नावाने असलेली ही वास्तु पुण्यवान होतीच त्यात प्रमिला मावशीच्या कार्य समिधातून ही वस्तु अधीक पुनीत झाली. स्वेच्छा निवृत्ती घेऊन समिति कार्यासाठी वाहून घेतलेल्या प्रमिल मावशीचा जीवन पट डोळ्यासमोर येताना बा. भ. बोरकर याची कविता आठवते –

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे ते मोल नाही फारसे

उंच , सडपातळ बांधा असलेल्या प्रमील मावशी शिस्तीच्या अतिशय कडक, वक्तशीर असल्यातरी मनाने अतिशय निर्मळ , प्रेमळ होत्या. जळगावच्या जेष्ठ सेविका हेमाताई लिमये यांनी सन १९६७ सालापासूनचे आठवणी उजागर करताना त्यांचे कडक शिस्तीचे अनेक किस्से सांगितले. त्या सांगत होत्या एकदा संख्या अग्रेसरिका म्हणून संख्या सांगायला जातांना कमरेला खोचलेला पदर चुकून निसटला तेव्हा काही न बोलता नुसत्या नजरेतून प्रमिल मावशीनी चूक लक्षात आणून शिस्तीत compromise नाही ही शिकवण दिली. कितीही मोठा प्रवास करून , थकून आलेल्या असल्या तरी पहाटे पाच वाजता उठून सर्व आवरणेची त्यांची शिस्त कधीही मोडली नाही. अगदी शेवटच्या काही दिवसापर्यंत त्यांची वक्तशीर दिनचर्या सुरू होती. स्वत:चे नऊवारी साडी त्या स्वत: धुवत असत ती नऊवारी कोणत्याही सुरकुत्या न पडता वाळत घालण्यातील व्यवस्थितपणा ही आम्हा सेविकाना नकळत खूप काही शिकवून जात असे.

कडक शिस्तीच्या मावशी मनाने मात्र नारळासारख्या होत्या. त्यांचे मधुर , निर्मळ वाणीतील संवाद अनेकांना आधार देत असे. योगिनीताई टिळक सांगते, मातृत्वाची अनुभूती घेत असताना आलेल्या कटू अनुभवात, स्वत: सांसारिक जीवन अनुभवले नसतानाही एका आईचे मन ओळखून केलेल्या मावशीच्या प्रेमळ , प्रांजल संवादानेच तिला सावरले.

तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळिती दुःखे जनांच्या सांडीती नेत्रप्रभा

सेविकांच्या मनातील भावना जाणून घेऊन मायेचा हात फिरवत सेविकांचे मनोबल वाढविणाऱ्या मावशी अनेकांनी पाहिल्या. संघटनेच्या कामासाठी त्यांनी पायाला जणू भिंगरीच लावली होती. सतत प्रवास करत असतांना सोबत कायम समितीचे साहित्य भरलेल्या पिशव्या असत. प्रवासात येता जाता शक्य त्या रेल्वे स्थानकावर काही मिनिटे का असो ना त्या सेविकाना भेटत असत. लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेकदा जळगाव, भुसावळ मध्यवर्ती असल्याने रेल्वे स्थानकात डबे द्यायला आम्ही जात असू. जळगाव स्थानकात तर केवळ दोन मिनिटे गाडीला थांबा होता परंतु त्या वेळात ही वयाच्या 75 रीत रेल्वेच्या दारात उभे राहून त्या सेविकांशी संवाद करीत, न विसरता हातावर काही ना काही देत असत. त्या थोड्या अवधीत मावशीशी झालेला संवाद प्रेरणा देणाराचा ठरत असे. प्रत्येक भेटीतून पुन्हा पुन्हा भेटीची ओढ ही वाढत असे.

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

२००३ मध्ये समितीच्या कार्यवाहिका पदाची जबाबदारी असताना वंदनीय मावशी जन्मशताब्दी वर्षात त्यांनी २६६ दिवसांची भारत परिक्रमा केली ; ज्यात त्यांनी सुमारे २८ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्त्रीशक्तीचे संघटन मजबूत केले. या प्रवासात अनेक सेविकाना त्या सोबत घेत असत. सेविकाना जपत कार्यकर्ता घडविण्याची, निर्माणची त्यांची धडपड यातून दिसत असे. त्यांचे प्रेरणेतून आज अनेक सेविका आपल्या कार्य समिधा समिति कार्यात अर्पण करीत आहेत.

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती

भारताला परमवैभवाला नेण्यासाठी आवश्यक ते ते सर्व केले पाहिजे असा विचार मांडताना त्या देश विदेशात काय घडत आहे या बाबत कायम सजग असत. इंग्रजी, मराठी वृत्तपत्र वाचणे हा त्यांचे दैनंदिन दिनचर्याचा एक भाग होता. मा प्रमील मावशींचे मराठी बरोबरच संस्कृत व इंग्रजी भाषेवर ही प्रभुत्व होते. त्यांचे विचार, त्यांचे वक्तृत्व , अनेकांना प्रभावित करीत असे. केवळ भारतातच नाही तर विदेशात ही नऊवारी साडीतील त्यांची सडपातळ मूर्ती, त्यांचे ज्ञान, बोलण्याची पद्धत, त्यांचे वक्तृत्व यामुळे सर्वांना आकर्षित करीत असे. यामुळेच की काय त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिकेतील न्यू जर्सी शहराच्या महापौरांनी त्यांना 'मानद नागरिकत्व' बहाल केले होते. जानेवारी २०२० मध्ये त्यांना 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा'ने त्यांच्या जीवनकार्याच्या गौरवार्थ डी.लिट. ही मानद पदवी देऊन ही सन्मानित केले होते.

समितीच्या वंदनीय चतुर्थ प्रमुख संचालिका असताना त्यांनी विविध विषयावर केलेले उद्बोधन हे जणू देवी सरस्वतीचे मुखातून प्रकट होणारे ज्ञान. अनेक विषयावर त्याचा अभ्यास, चिंतन त्यांचे प्रत्येक वक्तव्यातून प्रकट होत असे. त्यांनी कायम स्वत:ला सर्व बाजूने (अपडेट) अद्ययावत ठेवले. मोबाइल , इंटरनेट या सह whatsapp सारखे नवीन app ही त्यांनी शिकून घेतले होते. आता आता काही महिन्या पूर्वी पर्यन्त त्या whatsapp वरील स्टेटस पाहून आशीर्वादपर संदेश पाठवित असत.

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे

आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास संघटनेच्या वृद्धीसाठी देणाऱ्या मावशी प्रमुख संचालिका दायित्वतून मुक्त झाले नंतर ही कायम कार्यरत होत्या. सेविकाशी त्यांनी संपर्क कधीही कमी होऊ दिला नाही. मातृत्वाने भरलेले त्यांचे काळीज कायम आपल्या सेविकांचा विचार करत असे. आमचे लग्नात मावशीनी आठवणीने पत्र पाठविले होते ज्यात त्यांनी लिहिले होते , “गृहस्थाश्रम अर्थात कर्तव्यपूर्ण जीवन” त्यांनी पाठविलेले ते पत्र आम्ही दोघेही अधून मधून जाणीव पूर्वक पुनः पुनः वाचीत असतो. गृहस्थ जीवन कसे जगावे यांचा परिपाठ त्यांनी आपल्या पत्ररूपी आशीर्वादातून आम्हाला दिला.

शांत, संयत, निस्वार्थी, राष्ट्र कार्यार्थ जीवन जगलेल्या प्रमिल मावशीनी आपल्या शेवटच्या पत्रातून “माझे कुठेही फोटो लावू नका” असे सांगताना “ राष्ट्राय स्वाहा इदं न मम” चाच संदेश दिला आहे. राष्ट्रासाठी झिजले कणकण तेच खरोखर विजयी जीवन या काव्य पंक्ति नुसार त्यांचे जीवन कार्य प्रत्येक सेविकेला कायम प्रेरणा देत राहील यात शंका नाहीच.

पुन्हा बा. भ. बोरकर यांचीच कविता आठवते :-
“नाहिं चिरा नाहीं पणती, तेथें कर माझे जुळती
दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथें कर माझे जुळती”


अपर्णा महाशब्दे - पाटील
9823766644