नको रे मना...

    17-Feb-2022
Total Views | 228
 

aradhya 
 
 
वासनेप्रमाणे विकृत मनोवृत्ती दर्शवणारेही बरेच विकार आहेत. त्यांनाही मनाने दूर सारले पाहिजे. तथापि मनाच्या काही सहजप्रवृत्ती असतात. विवेकाने त्यांचा वापर केला, तर त्या त्रासदायक नाहीत. पण, अविवेकाने त्यांच्या वापराचा अतिरेक झाला, तर त्यांचे विकृत स्वरूप तयार होते, ते म्हणजे विकार. असे हे विकार हानिकारक असतात.
 
 
प्रपंचात, समाजात वावरत असताना आपल्या आचरणात चारित्र्यसंपन्नता व नीतिमानता सांभाळणार्‍या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आकर्षक आणि प्रभावशाली असते, हे आपण मागील लेखात पाहिले. असे शुद्ध व पवित्र आचरण असणार्‍या व्यक्ती समाजात किती आहेत, यावर त्या समाजाचे भवितव्य अवंलबून असते. कारण, समाजातील या आदर्श पुरूषांचे विचार समोर ठेवून पुढील पिढ्या वाटचाल करीत असतात. आदर्श पुरुषांच्या अंगी असलेले गुण मिळवायचे, तर त्यासाठी अभ्यास करावा लागतो, साधना करावी लागते. नि:स्वार्थपणे अनेक समाजहिताची कामे करावी लागतात आणि दुष्कृत्ये टाकून द्यावी लागतात. हे ध्यानात घेऊन स्वामींनी पुढील पाच-सहा श्लोकांतून कोणत्या प्रकारची कृत्ये टाळावीत आणि कोणती कृत्ये स्वीकारावीत, यांचा ऊहापोह केला आहे.
 
अशा या पुढील श्लोकांतील आशयाचे वर्णन प्रा. के. वि. बेलसरे यांनी ‘अध्यात्माला अनुकूल नैतिक जीवन’ असे केले आहे, यात शंका नाही. एकंदर समाजहिताचा विचार करता शुद्ध-नैतिक जीवन प्रापंचिक जीवनासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. व्यवहारात वागताना प्रामाणिकपणे, सचोटीने वागावे लागते. दांभिकता, ढोंग, फसवणूक या गोष्टी प्रपंचात म्हणजे व्यवहारात फार काळ टिकत नाहीत. अशा माणसांना समाजात किंमत उरत नाही. नैतिकता मात्र टिकून राहते. सामाजिक स्वास्थ्य मजबूत करते. तसे पाहिले तर ‘अध्यात्मजीवन पद्धती’ ही आदर्श जीवनपद्धती आहे, असा विचार करून प्रा. बेलसरे यांनी मनाच्या श्लोकांतील श्लोक क्र. ४ ते १० यांना म्हणजे त्यांतील आशयाला ‘अध्यात्मानुकूल नैतिक जीवन’ असे संबोधले असावे. आपल्या सारख्या सामान्य प्रापंचिकांनाही या श्लोकांत सांगितलेले विचार तितकेच महत्त्वाचे आहेत, हे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल.
 
मना पापसंकल्प सोडोनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥
 
जे टिकणारे नाही ते धरून ठेवण्यात शहाणपण नाही. ते सोडून देणे हिताचे असते. स्वामींचे मनासंबंधीचे निरीक्षण चांगले आहे. अमूक कृत्य करू नको, अमूक गोष्ट सोडून दे, असे जर मनाला सारखे सांगितले गेले, तर काय करायचे नाही, हेच मनाला आठवत राहते. मनातून काही केल्या ते जात नाही. अशावेळी मनाला ‘काय करू नको’ हे सांगत असतानाच काय शाश्वत आहे किंवा काय करायला हवे, असे सांगून त्याची दिशा बदलावी लागते. वरील श्लोकात ‘पापसंकल्प करणे सोडून दे’ असे मनाला कितीही वेळा सांगून झाले, तरी ते पापसंकल्प आठवत राहाणार, यावर उपाय म्हणून मनाने सत्यसंकल्प जीवाच्या आत धरून ठेवला, तर मग त्या भावाचे चिंतन करू लागते.
 
त्यामुळे मनातील पापसंकल्पाची छाया हळूहळू अस्पष्ट होऊन नाहीशी होण्याच्या मार्गाला लागते. असा हेतू मनात ठेवून स्वामींनी वरील श्लोकातील पहिल्या दोन ओळींची रचना केली असावी. आपल्या संतांचे हे वैशिष्ट्य आहे की, जनसामान्यांची मानसिकता त्यांना ठाऊक असते. त्यामुळे संतांचा उपदेश लोकांच्या अंतःकरणातपोहोचून त्यांना अचूक मार्गदर्शन करतो. आता ज्ञानेश्वरांचेच पाहा, पसायदानात ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे सांगत असताना ज्ञानेश्वरांना माहीत असते की, खल, दुर्जन, दुष्ट यांच्या मनातील कपटभाव नुसते असे सांगून जाणारा नाही. म्हणून ज्ञानेश्वर पुढे सांगतात की, ‘तया सत्कर्मी रती वाढो’ म्हणजे खल, दुर्जनाच्या मनात सत्कर्माची आवड निर्माण कर. दृष्टांच्या मनात अशी सत्कर्मांची आवड निर्माण झाली, तर त्याच्या मनातील ‘व्यंकटी’ अर्थात कपटभाव हळूहळू अस्पष्ट होत जाऊन नाहीसा होईल.
 
‘संकल्प करणे’ हा मनाचा धर्म आहे, तसा कल्पना करणे हा मनाचा स्वभाव आहे. मनाला सांगितल्याप्रमाणे मन सत्यसंकल्प करून पापसंकल्पापासून सुटण्याचा प्रयत्न करील. परंतु, कल्पना करण्याच्या सवयीमुळे ते विषयाभोवती, वासनेभोवती घोटाळत राहील. विषयवासना ही मोठी शक्ती आहे. मनाला सहजपणे आपल्या मागे खेचून नेऊ शकते. विषयवासना एकदा मनात उत्पन्न झाली की, मन त्याच कल्पकतेत गुंतून जाते. वासना माणसाला अविवेकी बनवते. वासना तृप्त होत नाही, पण ती मनाची अस्वस्थता वाढवत नेते. वासनेच्या आहारी जाणार्‍या माणसाला समाजात किंमत राहत नाही. त्याची सगळीकडे निंदानालस्ती होते. लोकांमध्ये त्याची च्छीथू होते.
 
यासाठी विकाराने, वासनेने मन अविवेकी होण्याअगोदरच त्याला परिणामांची जाणीव करून देऊन हे विकार व विषयवासना यासंबंधीची कल्पना करू नको, असे सांगणे सर्वथा हितकारक असते. हा वास्तववादी बोध ‘त्रिकालबाधित’ आहे. वासनेप्रमाणे विकृत मनोवृत्ती दर्शवणारेही बरेच विकार आहेत. त्यांनाही मनाने दूर सारले पाहिजे. तथापि मनाच्या काही सहजप्रवृत्ती असतात. विवेकाने त्यांचा वापर केला, तर त्या त्रासदायक नाहीत. पण, अविवेकाने त्यांच्या वापराचा अतिरेक झाला, तर त्यांचे विकृत स्वरूप तयार होते, ते म्हणजे विकार. असे हे विकार हानिकारक असतात. समर्थ त्याच विकारांवर पुढील श्लोकांत बोलत आहेत-
 
 
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी।
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥
 
 
सर्वसाधारणपणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांना आपण ‘षड्रिपू’ म्हणून ओळखतो. पण, वरील श्लोकात समर्थांनी क्रोध, काम, मद, मत्सर यांचा उल्लेख करून दंभ त्याच्या साथीला जोडला आहे. भगवद्गीता काम, क्रोध व लोभ यांचा निर्देश करते. ही तीन नरकवाटेकडे नेणारी द्वारे आहेत आणि ती जीवाचा नाश करतात, म्हणून त्यांचा त्याग करावा, असे गीता सांगते.
 
 
विविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:।
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्ययं त्याजेत्॥ (गी. १६.२१)
 
 
विकारांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन समर्थ ते सोडायला सांगतात. तथापि अविकृत क्रोध, काम, मद, मत्सर प्राथमिक अवस्थेत सहजपणे प्रापंचिकांच्या उपयोगी पडतात. व्यवहारात काही वेळा रागाचे सोंग आणून अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणता येतात. विवाहितांचा विचार करता काम कटाक्षाने टाळता येत नाही. भगवद्गीतेच्या ७.११च्या श्लोकात ‘धर्मानुकूल काम मी आहे’ असे भगवंत सांगतात. व्यवहारात स्वाभिमान बाळगावा लागतो. पण, मर्यादा सोडून अविवेकाने वागल्याने त्यात स्वार्थाने प्रवेश केल्यावर त्यांचे दंभात परिवर्तन होते. एकंदरीतच पाहता मर्यादा सोडून उत्पन्न झालेले हे विकार सामाजिक स्थैर्यावर परिणाम करतात, म्हणून हे विकार दूर ठेवले पाहिजेत.
 
सामाजिक स्वास्थ्याचा विकार करून स्वामींनी या विकारांच्या यादीत दंभाचाही समावेश केला आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. दांभिक, ढोंगी, लबाड माणसे आपल्या अवगुणांनी सर्व समाजाची घडी बिघडवून टाकतात. तेव्हा हा दंभ, खोटेपणा नको, असे मनाला सांगावे लागते. षड्रिपू दंभाचे नाव नसले, तरी समर्थांच्या मते, दंभ हा प्रपंच, परामार्थ, भक्तिमार्ग, सामाजिकता, राष्ट्रहित, कौटुंबिक संबंध अशा सर्व क्षेत्रांत नुकसान करतो. वृधाभिमानापासून सावध राहून या दंभाला रोखले पाहिजे. अनेक क्षेत्रात या दंभाने दबदबा निर्माण करून ठेवला आहे. या दंभभारापासून मनाला वाचवले पाहिजे. पण, त्यासाठी ‘श्रेष्ठ धारिष्ट्य’ असावे लागते. तोच पुढच्या श्लोकाचा विषय आहे.
 
- सुरेश जाखडी  
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121