मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या प्रभाग पुनर्रचनेला भाजपनेही कडाडून विरोध केला आहे. एखादा प्रभाग दोन प्रशासकीय प्रभाग, तीन ते चार विधानसभा क्षेत्रांत विभागला जाणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राखता येणार नसून, फक्त अडचणीच उद्भवणार आहेत. शिवाय नागरिक, मतदार यांना सोईसुविधा देता येणार नाहीत. ही पुनर्रचना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नाही, अशी तक्रार महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी केली आहे. त्यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल व उपनिवडणूक अधिकारी, मुंबई महापालिका यांच्याकडे हरकत नोंदवली.
पालिकेतील २२७ प्रभागांमध्ये नऊ प्रभागांची वाढ झाली आहे. महापालिकेचे याआधी २२७ प्रभाग होते, त्यात वाढ होऊन २३६ प्रभाग झाले. यासंबंधी पालिकेकडे सूचना व हरकती दाखल झाल्या. ही प्रभाग रचना योग्य नसल्याचे भाजपचे स्पष्ट मत आहे. प्रभाग क्र. २२७ आणि १४८ च्या सीमारेषांचा चेहरामोहरा ६७ टक्क्यांहून अधिक बदलण्यात आला आणि प्रभाग क्र. ६९ मध्ये चुकीच्या पद्धतीने बदल झाले आहेत, असा भाजप नगरसेवकांचा आक्षेप आहे. बदललेल्या या प्रभागांमधील लोकसंख्या व मतदारसंख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे या प्रभागांमधील लोकसंख्येच्या नियम डावलण्यात आला आहे, अशीही तक्रार भाजपने केली आहे. नवीन प्रभाग रचनेचा ‘ड्राफ्ट’ चुकीच्या पद्धतीने बनवला आहे. मोठे पूल व मोठे रस्ते, रेल्वे, नाला आदी सीमारेषा ठरवल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ३१ मध्ये नाल्याऐवजी एक छोटी गल्ली सीमारेषा ठरवण्यात आली. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो, अशी भीती भाजपाने व्यक्त केली आहे. प्रभाग क्र. १०९मध्ये रेल्वेची हद्द ओलांडून प्रभाग बनवण्यात आला आहे. यामुळे हा प्रभाग पाच किलोमीटर लांबीचा झाला आहे. यामुळे नागरिकांना पालिकेच्या सेवा मिळवण्यासाठी रेल्वेची हद्द ओलांडून यावे लागेल. तसेच भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे अशा प्रकारे प्रभागांचे विभाजन करण्यात आले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. एका इमारतीला दोन प्रभागांमध्ये विभागण्याचा प्रकार घडला आहे. प्रभागही विभागले आणि सोसायट्याही विभागल्या गेल्या.
प्रभाग क्र. ३० हा ‘पी-नॉर्थ’ आणि ‘पी-साऊथ’ या दोन प्रभागांमध्ये विभागला गेला. नव्याने बनवण्यात आलेल्या प्रभागांमुळे स्थानिक नागरिकांना नागरी सुविधा मिळवताना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. हीच गत प्रभाग क्र. १६४ ची झाली आहे. हा प्रभाग चक्क चार विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागला गेला. परिणामी निवडून आलेले नगरसेवक तसेच आमदार यांना येथे सोयीसुविधा द्याव्य्यात कशा, हा प्रश्न सतावतो आहे. प्रभाग क्र. ४४ मधील एका सोसायटीत चार बुथ प्रभाग क्र. ३८ मध्ये आणि बूथ प्रभाग क्र. ४३ मध्ये विभागला गेला, अशी भाजपच्या नगरसेवकांची तक्रार आहे.