ना घर का ना घाट का

    13-Feb-2022   
Total Views |


sikhs for justice1
 
 
 
‘सीख्स फॉर जस्टीस’चा प्रमुख अतिरेकी गुरुपतवंत सिंग उर्फ पन्नू याने कर्नाटकमध्ये बुरखा घालून महाविद्यालयात जाण्याचा वादंग निर्माण करणार्‍या त्या बुरखाधारी मुलीचा संदर्भ देत मुस्लीम संघटनांना आवाहन केले की, “तुम्ही ‘हिजाब’साठी संघर्ष करा. मोदी या भारताला हिंदूराष्ट्र बनवणार. आता ‘हिजाब’नंतर अजान, नमाज आणि कुराणवरही बंदी केली जाईल. त्यामुळे तुम्ही भारताचे तुकडे करून ‘उर्दूईस्तान’ म्हणून नवीन देश बनवा. यासाठी संघर्ष करणार्‍यांना ‘सीख्स फॉर जस्टीस’ संघटना आर्थिक मदतपण करेल.” ‘उर्दूईस्तान’मध्ये राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश असेल, असे त्याचे म्हणणे. असो, पण कालपर्यंत ‘सीख्स फॉर जस्टीस’च्या नावाखाली ‘सीएए’ विरोधात किंवा दिल्लीच्या तथाकथित शेतकरी आंदोलनात भारत सरकारविरोधात कारवाया करणारा पन्नू. आता त्याला शीख नव्हे, तर मुस्लीम समुदायाची चिंता वाटू लागली आहे. त्यालाही कारण आहे, ते असे की, पन्नूने कितीही ‘शीख समाज... शीख समाज’ असे म्हटले तरी भारतातील शीख समाज त्याला कवडीचीही किंमत देत नाही. इतकेच काय? प्रमुख ब्रिटिश भारतीय नेता आणि ब्रिटनमधील स्थानिक टोरी पार्टीचे नेता लॉर्ड रामी रेंजर यांनी म्हटले की, ”गुरूपतवंत सिंग उर्फ पन्नू हा पाश्चिमात्य देशात राहणार्‍या शिखांना भडकवतो की, भारतात शिखांवर अत्याचार होत आहे. असे सांगून तो या विदेशात राहणार्‍या शिखांकडून पैसे उकळतो. गुरूद्वाराकडूनही त्याला पैसे लाटायचे आहेत. पण भारतात शिखांवर अत्याचार होत नाहीत. हे सगळे खोटे आहे.” लॉर्ड रामी रेंजर यांच्या या विधानानंतर पन्नूला विदेशातील शीख समुदायाचा लोकाश्रय मिळणे कमी झाले. इतकेच काय पंजाबमधील त्याच्या खानकोट गावात वडिलोपार्जित जमीन आहे. त्याची आई लोकांना सांगायची, “मेरा(माझा) काका पन्नू कॅनडात वकील आहे.” तिला पन्नूचे देशद्रोही कृत्य माहिती नव्हते. पण जेव्हा ‘सीख्स फॉर जस्टीस’च्या नावाने पन्नूने केलेल्या देशद्रोही कारवाया समोर आल्या तेव्हा खानकोट ग्रामस्थांनी पन्नूला कडाडून विरोध केला. पन्नूच्या देशद्रोही जाळ्यात गावातला एकही तरूण फसणार नाही, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. थोडक्यात, देशद्रोही अतिरेकी पन्नू ‘ना घर का ना घाट का’ राहिला.
 
 
 
मोदीद्वेषाची परिसीमा
मोदी कुछ भी कानून लाता हैं। कर्नाटकात मुलींना ‘हिजाब’ घालू नये, असा कायदा मोदींनी केला. मोदी को अंगार लगाके सिल्गा डालो,” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे येथे ‘हिजाब’ समर्थनार्थ आंदोलनात एक खालाजान म्हणते. कर्नाटकात हिजाब प्रकरण याची पार्श्वभूमी आणि पंतप्रधान मोदी यांचा अर्थोअर्थी काहीएक संबंध नाही. पण या महिलेलाच का? उलट विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, समाजवादी, तृणमूल, बसपा वगैरेंसारख्या प्रादेशिक पक्षालाही सारखे वाटत राहते की, कुठे खुट जरी झाले तरी त्याला कारणीभूत मोदीच आहेत. हे विरोधी पक्ष सातत्याने मोदींना शिव्याशाप, दूषणे देत असतात. विरोध करत असतात. यावरून ‘याची देही याची डोळा’ पाहिलेली एक घटना आठवली. गोवंडी ‘डम्पिग ग्राऊंड’वर मुस्लीम वस्ती आहे. दारिद्य्र आणि मूलभूत सुविधा नाहीतच. हो! मात्र, निवडणूक ओळखपत्र सगळ्यांकडे. इथे लोक म्हणाले, “हमारे अबुभाई(म्हणजे समाजवादी पार्टीचे स्थानिक आमदार अबू आझमी) हमारा पुरा खयाल रखते हैं।” त्यांना विचारले मग तुमच्याकडे पाण्याची लाईन का आली नाही? तर त्यांच्या म्होरक्याने सांगितले. ”अबुभाई जभी भी पानी की लाईन हमारे मोहल्ले में लाते हैं, तो वो वो बैठा हैं ना काफीर, वो आधे रात को लाईन काट देता हैं... २४ घंटे हमारे मोहल्ले को ताकता रेहता हैं। जैसे अबुभाईने पानी की लाईन डाली वैसे ये तोड देता है. वो काफीर हैं ना इसलिये !” मी विचारले, “तो कोण?” तर म्होरक्या म्हणाला, “वोईच मोदी.” थोडक्यात, या अनधिकृत वस्तीमध्ये पाण्याची लाईन येऊ नये, यासाठी रात्री-बेरात्री जागून पाण्याची लाईन कापायचेही काम मोदीच करतात. आणि मोदी नुसतेच मोदी नसून ते काफीर आहेत. त्यामुळे ते असे करतात. असे येथील शेकडो लोकांचे म्हणणे होते. असे मोदींबद्दलचे यांचे अगाध अज्ञान. पण अज्ञान वगैरे वगैरे म्हणत यांच्या हिंसा, द्वेष वगैरेकडे दुर्लक्ष किती काळ करणार? अज्ञानाची परिणती पराकोटीच्या द्वेषात अगदी जाळून, सिलगून टाका म्हणण्यापर्यंतच्या मानसिकतेत गेली तरी जाऊ द्या, अज्ञानापोटी असे म्हणतात हेच म्हणायचे का? ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात ‘ती’ महिला मोदींना जाळा असे म्हणाली, त्या पक्षाचे ‘जाणते राजे’ आणि समस्त पुरोगामी निधर्मी लोक याबाबत काही उत्तर देतील का?
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.