माने, हा शुद्ध हलकटपणा!

    28-Dec-2022   
Total Views |
 
Prakash Ambedkar
 
 
 
 
”लोक आज आत्महत्या करायला जातात, काहीजण करतात. लोक मला विचारतात, तेव्हा मी सांगतो मरायचे का... दोन बंदूक आणून देतो. तुला ज्या कारणासाठी मरायचे, त्यालाही गोळ्या घाल,” असे विधान भर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी केले. कुणाला वाटले म्हणून कुणीही कुणाचा खून करेल आणि त्यासाठी कुणीही कुणाला शस्त्र पुरवेल ही वेळ किंवा हा कायदा अजून तरी भारतात नाही. प्रकाश आंबेडकरांना भारत म्हणजे चीन किंवा पाकिस्तान वाटला का? याला मारा, त्याला गोळी घाला, असे विधान भरसभेत करणार्‍या प्रकाश आंबेडकरांची हिंस्र आणि कायदेविरोधी मानसिकता यातून स्पष्ट होते. हेच विधान जर दुसरे कुणी केले असते तर?
अरेरे तेव्हा तर मग ‘डफली गँग’ (ही गँग पडद्याआडून कोण चालवते हे सर्वश्रूत आहे) तर या गँगने लगेच ‘लोकशाही खतरे में हैं’ वगेरे म्हणत थयथयाट सुरू केला असता. रा. स्व. संघ दसर्‍याला शस्त्रपूजन करते, याचे भारी वैषम्य प्रकाश आंबेडकरांना वाटते. शस्त्र कुठून आली, त्यांचे पूजन का, असा न चुकता सवाल ते करत असतात. अर्थात, कुणाला उत्तर द्यायचे आणि कुणाला नाही, याचे ताळतंत्र रा. स्व. संघाकडे असल्याने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रकाश यांच्यापुढे लागत असल्याने संघाचे कुणीही त्यांना सहसा प्रत्युत्तर द्यायला जात नाही. पण, लोकशाही मानणार्‍या आणि त्या लोकशाहीचा कायदे माननार्‍या लोकांना प्रश्न पडला आहे की, प्रकाश आंबेडकर दोन बंदुका आणून देतो म्हणाले, तर त्या बंदुका ते कुठून आणून देणार आहेत? त्यांच्याकडे खरच अशाप्रकारे एकापेक्षा जास्त शस्त्र आहेत का? असतील तर ती कुठून आली? सामान्य नागरिक जो जीवनाला वैतागलेला आहे, त्याला दुसर्‍याला मार म्हणून भरीस घालण्याचे अजब सल्ला ते कसे देऊ शकतात? अयशस्वी का होईना, पण ते राजकीय नेता आहेत. समाजातील काही गट आजही त्यांना नेता मानतो. लोक त्यांच्याकडे आशेने-अपेक्षेने येतात. प्रकाश आंबेडकरांनीच म्हटल्याप्रमाणे वैतागून आत्महत्या करू पाहणारे लोकही त्यांच्याकडे येतात, तर अशा दुःखी लोकांना मदत करून त्यांचे जगणे सुसह्य करण्याऐवजी ‘तू पण मर आणि दुसर्‍याला पण मार’ असा सल्ला ते देतात. तेव्हा, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा तो प्रसिद्ध डायलॉग आठवतो - “माने, हा शुद्ध हलकटपणा आहे!”
 
 
 
सुरक्षेचे एक नवे पिल्लू...
 
 
 
नाताळ आणि इंग्रजी नववर्ष यादरम्यान सात दिवसांची विश्रांती घेऊन राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीर आणि पंजाब या अतिसंवेदनशील राज्यात जाणार आहे. या राज्यांनी दहशतवादाचे किती भीषण परिणाम भोगले, हे सगळे जग जाणते. या राज्यामध्ये यात्रेचे आयोजन करताना काँग्रेस पक्षाने काहीतरी नियोजन केलेच असेल. मात्र, या राज्यात यात्रा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसच्या महासचिवाने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले. ”काँग्रेसने या आधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी असे दोन नेते गमावले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये दिल्लीला राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेमध्ये चूक झाली आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेशी केंद्र सरकारने खेळू नये.”
यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, इतकी भीती वाटते, तर काँग्रेसने ही यात्रा काढलीच का?
तर काही लोक म्हणतात, सप्टेंबर महिन्यापासून दक्षिण भारतातून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीला पोहोचली. या यात्रेने राहुल गांधींची आणि त्याद्वारे काँग्रेसची लोकप्रियता वाढेल. राहुल जिथे जातील तिथले लोक सगळे सोडून राहुल गांधी यांचे नेतृत्व मानतील.सगळे वातावरण काँग्रेसमय होईल. भाजप नावालाही शिल्लक राहणारनाही, असे काहीसे गणित काँग्रेसचे होते. पण, या यात्रेत तसे काही झाले नाही. यात्रेची चर्चा सामान्य जनतेत झालीच नाही. यात्रा गाजली ती राहुल गांधी आणि ठरवून आणलेल्या लोकांनी घेतलेल्या त्यांच्या गळाभेटीमुळे, यात्रा गाजली ती त्यांनी ख्रिस्ती पाद्रीची भेट घेऊन केलेल्या चर्चेमुळे, यात्रा गाजली ती या यात्रेत किती किलो भाज्या शिजल्या आणि रोट्या बनल्या यामुळे, यात्रा गाजली ती स्वरा भास्कर टाईप लोकांनी या यात्रेत सहभाग घेतला म्हणून!
काल-परवा तर यात्रा गाजली ती राहुल यांच्या टी-शर्टमुळेही. थोडक्यात, राहुल गांधी एक बुद्धिमान, हुशार, धडाडीचा कार्यक्षम नेता म्हणून कुठेही यात्रा गाजली नाही. इतका खर्च करून राहुल यांना प्रभू श्रीराम वगैरे ठरवूनही यात्रा गाजलीच नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचलीचनाही, हे सत्य ‘काँग्रेसी इव्हेंट मॅनेजमेंट’ला कळलेच. त्यामुळे आता यात्रेबद्दल लोकांमध्ये चर्चा व्हावी, याअनुषंगाने काँग्रेसने राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न विचारत नवीनच पिल्लू सोडले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.