मृत्यूला मात देणारा ‘आयर्नमॅन’

    23-Dec-2022   
Total Views |
Chetan Agnihotri


एकवेळ साधे चालणेही मुश्किल होते. परंतु, त्यांनी इच्छाशक्तीच्या बळावर नुकतीच १०० किमी धावण्याची स्पर्धा पूर्ण केली आणि तीही रणरणत्या वाळवंटात. जाणून घेऊया चेतन अग्निहोत्री यांच्याविषयी...


नाशिक येथील ओझर मिग या गावी १९७८ साली चेतन विजय अग्निहोत्री यांचा जन्म झाला. आई गृहिणी, तर वडील खासगी कंपनीत नोकरीला. चेतन यांनी नवीन मराठी शाळेतून प्राथमिक शिक्षण, तर पुरूषोत्तम इंग्लिश स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय वयातच खेळांची आवड निर्माण झाली. आठव्या वर्गात असताना सायकल घेतल्यानंतर ते सायकलवरच शाळेत जात. पुढे बिटको महाविद्यालयामधून त्यांनी बारावी विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केले. सायकलवरून ते सुट्ट्यांमध्ये पांडवलेणी, गंगापूर, ओझर असा फेरफटका मारायला जात. महाविद्यालयातही एकतर पायी किंवा सायकलनेच जात. बारावीनंतर खेळात किंवा संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘भोंसला मिलिटरी स्कूल’मध्ये वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला.

 यादरम्यान, त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि ते पुण्यात एका बँकेत नोकरीला लागले. नोकरीमुळे खेळ आणि ‘सायकलिंग’ बंद झाल्याने ते पायी चालतच बँकेत जात. पुढे त्यांना संभाजीनगर येथे एका नामांकित बँकेत नोकरी लागली. पुढे नोकरीच्याच निमित्ताने ते नाशिकला परतले.दरम्यान, मिलिंद धोपावकर यांनी नाशिक ‘पॅलेटॉन’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केल्याने चेतन यांनी या स्पर्धेत बिना गिअरच्यासायकलसह सहभाग घेतला. ताकद आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. पुढे ‘सायकलिंग’साठी त्यांनी नवी सायकल विकत घेत ‘बीआरएम’ स्पर्धेत नाशिक ते सापुतारा हे २०० किमी अंतर पूर्ण केले.

 २०१४ ते २०१५ दरम्यान त्यांनी नाशिक-धुळे-नाशिक ३०० किमी, नाशिक-वाशिंद- मालेगाव-नाशिक ४०० किमी या स्पर्धाही पूर्ण केल्या. ‘सायकलिंग मधील पदवी मिळवण्यासाठी चेतन यांना ६०० किमीची नाशिक-झुलवानिया-नाशिक हे अंतर निर्धारित वेळेत कापणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी अद्ययावत अशी पावणेदोन लाखांची सायकल विकत घेतली. वळवाचा जोरात पाऊस, वादळवारा, गडद अंधार, निर्मनुष्य रस्ते अशा अनेक संकटांचा सामना करत त्यांनी हे अंतरही पूर्ण केले. अवघ्या एका वर्षात हे यश मिळवल्याने त्यांना पॅरिस येथील क्लबद्वारे विशेष मेडल मिळाले, जे सायकलिंगमध्ये पदवीसमानच मानले जाते. यानंतर ‘डेक्कन क्लिफ हँगर’ अर्थात पुणे-गोवा ही ६५० किमी अंतराची ‘सायकलिंग’ स्पर्धा पूर्ण करत ते ‘रॅम’ या अमेरिकेतील ४,८०० किमीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. परंतु, या स्पर्धेसाठी अमाप खर्च असल्याने त्यांना स्पर्धेला जाणे शक्य झाले नाही.

 
यानंतर त्यांनी मॅरेथॉनमध्येही सहभाग घेण्यास सुरूवात केली. आतापर्यंत त्यांनी १५ पूर्ण आणि ३२ अर्ध मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. यादरम्यान, चेतन यांनी ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा पूर्ण करण्याचा निश्चय केला. ‘सायकलिंग’, पोहणे आणि धावणे अशा तीन गोष्टींचा स्पर्धेत समावेश असतो. स्पर्धेसाठी चेतन यांनी सराव सुरू केला. ३३ वेळा ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावलेल्या कौस्तुभ राडकर यांचीही त्यांना मदत झाली. पुढे त्यांनी ‘ट्रेकिंग’लाही सुरूवात केली. जवळपास सहा महिन्यांच्या सरावानंतर त्यांनी मलेशियात असलेली ही मानाची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला. त्यांना व त्यांच्या आईला नंतर शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. ‘सायकलिंग’ करताना त्यांचा छोटा अपघात झाला आणि नंतर डेंग्यूची लागण झाल्याने सर्व काही थांबले.

 २०२१ मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली आणि १६ दिवसानंतर ते मृत्यूच्या दारातून परत आले. सगळ्या आशा संपल्या तेव्हा ‘तिसरा ध्रुव’ या पुस्तकाच्या वाचनप्रेरणेने त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. सप्टेंबर २०२१ मध्ये काविळीने भावाचेही निधन झाल्याने चेतन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. यातून सावरत चेतन पुन्हा उभे राहिले आणि त्यांनी ऑगस्ट २०२२ साली दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉमरेड्रस्’ ही ९० किमी धावण्याची स्पर्धाही यशस्वीरित्या पूर्ण केली. नुकतीच त्यांनी जैसलमेर ते पाकिस्तानच्या सीमेपर्यंतचे १०० किमी अंतर धावण्याची स्पर्धाही पूर्ण केली.

त्यांना आई रजनी, वडील विजय यांच्यासह पत्नी नीतू यांचेही सहकार्य लाभते. सध्या ते एका नामांकित बँकेत ‘असिस्टंट जनरल मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहेत. ‘सायकलिंग’ हे योगकर्मच आहे. ‘सायकलिंग’मुळे आत्मपरीक्षण आणि इच्छाशक्ती वाढते, असे चेतन म्हणतात. शेवटपर्यंत तंदुरूस्त राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही चेतन सांगतात. मृत्यूला हरवूनही आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लढत त्यात विजयश्री खेचून आणणार्‍या चेतन अग्निहोत्री यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.