दुलार इंडिया : अस्सल मराठमोळ्या संकल्पनेला व्यावसायिक साज

    02-Dec-2022   
Total Views |

MahaMTB
दुलार इंडिया                                                         धनश्री लेले



आपल्या सर्वांच्याच लहानपणी आपल्या सर्वांनीच आजीच्या साडीच्या दुपट्याची ऊब अनुभवलेली आहे. मऊ, छान, उबदार दुपटी, पांघरुणाची आणि त्यावेळच्या कपड्यांची आठवण कोणीच विसरू शकत नाही. आजच्या आधुनिक जगात सर्वच गोष्टी मशीन आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच तयार केल्या जात असल्याने ही आजीच्या हातांची ऊब हरवत चालली आहे. याचबरोबर या सर्व गोष्टी माहिती असलेला आणि हे कपडे शिवण्याची कला अवगत असलेला वर्गही संपत चाललेला आहे. यावेळी ही कला, ही परंपरा अस्ताला जाण्याची भीती वाटत असताना याच परंपरागत कलेला व्यावसायिकतेची जोड देऊन फक्त ही कला संवर्धन करण्यासाठीच नव्हे, तर या संवर्धनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा विचार केला आहे, तो धनश्री लेले यांनी त्यांच्या ‘दुलार इंडिया’ या ब्रॅण्डच्या माध्यमातून. त्याविषयी...


मुळातच विणकाम आणि तत्सम क्षेत्राशी सुतराम संबंध नसलेल्या धनश्री यांचा या व्यवसायाकडे प्रवास अचानक आणि तसा अपघातानेच घडून आला. मुळात धनश्री या शिक्षण आणि नोकरी या दोन्ही गोष्टींच्या दृष्टीने सॉफ्टवेअर इंजिनिअर. याच क्षेत्रात त्या नोकरीही करत होत्या. काही वर्षे असेच चालू असताना त्यांना मुलगा झाला आणि आता सामान्य गृहिणीप्रमाणे त्यांचेही आयुष्य त्यांच्या मुलाभोवतीच गुंफले गेले. पण, एवढे उच्च शिक्षण, नोकरी या सर्व गोष्टींमध्ये इतकी वर्षे घालवल्यानंतर साहजिकच धनश्री यांना स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. धनश्री यांच्या सासूबाई हा व्यवसाय करत असत. या घरगुती दुपटी, बाळाच्या कपड्यांचा व्यवसाय 25 वर्षांपासून करत आहेत.


आपल्या नातवासाठीही त्यांनीच घरी कपडे शिवले होते. मुलाच्या जन्मानंतर धनश्री यांनी नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. आता करायचे काय, हा प्रश्न समोर असताना त्यांच्या नवर्‍यानेच त्यांना सल्ला दिला की, ‘हाच व्यवसाय पुढे का घेऊन जात नाहीस? तुझ्या ज्ञानाचा उपयोग हाच व्यवसाय वाढवण्यासाठी कर,’ असा सल्ला त्यांच्या नवर्‍याने धनश्री यांना दिला. धनश्री यांनीही या सल्ल्याचा विचार करून या व्यवसायाची सूत्रे हातात घेतली आणि 2019 मध्ये धनश्री यांनी सुरुवातीला ‘धागा कॉर्पोरेशन’ या नावाने आपल्या व्यवसायास प्रारंभ केला.


सुरुवातीच्या काळात संपूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांशी संपर्क होता. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्यवसाय धनश्री यांनी सुरू केला. मुळात या व्यवसायात मोठी अडचण लोकांच्या मनात या कपड्यांबाबत जागृती निर्माण करण्याची होती. बाजारात सध्या जे काही ‘मटेरिअल’ उपलब्ध आहे, त्यापेक्षा धनश्री यांचे हे उत्पादन कितीही चांगले आणि उच्च दर्जाचे असले, तरी ग्राहकांना ती खात्री पटवून द्यावी लागायची. त्यामुळे सुरुवातीला ग्राहक मिळवताना बराच संघर्ष करावा लागला. तरीही धनश्री यांनी आपले उत्पादन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.


नंतर हळूहळू ग्राहकांना या उत्पादनाची खात्री पटायला लागली आणि त्यांच्या पसंतीस ते उतरायला लागले. मुळात या कपड्यांबद्दल बाजारात सध्या जे काही उपलब्ध आहे, त्यामुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम असतो. बाजारात मुख्यत्वे होजियरीचे कपडे मिळतात. सुती म्हणून जे काही मिळते तेही 100 टक्के सुती फारच कमी असते किंवा नसतेच. मुळात अस्सल सुती कापड हे मऊ, मुलायम आणि सर्व ऋतूंमध्ये वापरता येण्यासारखे असते. उन्हाळ्यात हलके, पावसाळ्यात सहज सुकतील, असे आणि मुख्यतः हिवाळ्यात अतिशय उबदार असे हे कपडे असतात. त्यामुळे अस्सल सुती कपडे हे कायम चांगलेच असतात. त्याने बाळाच्या त्वचेला अपाय होण्याची शक्यता नसते.


या उलट आता सध्या बाजारात जे कपडे मिळतात ते सैल पडण्याची किंवा थंड पडण्याची भीती असल्याने त्याचा त्रास बाळांना होण्याची शक्यता असते. परंतु, असे असले तरी आपल्याकडे त्याबद्दल काहीच जागरूकता नसल्याने हेच ‘मटेरियल’ वापरले जाते. त्यामुळे धनश्री यांनी सुरुवातीपासूनच आपला भर हा दर्जा आणि जास्तीत जास्त चांगले उत्पादन विकण्याचा प्रयत्न केला आहे. याच बरोबरीने ग्राहकांना हाताळायला सोपे असेच असले पाहिजे, असा कटाक्ष ठेवूनच धनश्री काम करत असतात. यासाठी धनश्री या त्यांच्याकडच्या एका स्वेटरचे उदाहरण देतात.


हा स्वेटर अशा पद्धतीने विणला आहे की, डोक्यातून अत्यंत सहज पद्धतीने तो अंगात घालता येतो. त्यामुळे अगदी ग्राहकांना वापरायला अत्यंत सहज असे हे उत्पादन आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने धनश्री यांचे उत्पादन तयार होते. या सगळ्याबरोबरीने कपडे शिवण्यासाठी लागणारा कापूस चांगला शोधूनच विकत घेतला जातो. त्यानंतर शिवण्याची पद्धत तसेच त्यावरील डिझाईन्स या सर्व बाबतीत धनश्री यांनी कटाक्षाने काळजी घेतली आहे. त्यामुळे धनश्री यांनी दर्जा आणि ग्राहकांची पसंतीची पावती कायमच मिळत राहिली आहे.


मुळात ही घरी दुपटी, कपडे शिवण्याची कला जवळपास नामशेषच होत आली आहे. कारण, ही कला माहीत असलेल्या महिला आता एकतर वृद्धत्वाकडे झुकल्या आहेत आणि पुढच्या पिढीला तर यातील काहीच माहिती नाही . म्हणजे खरेतर धनश्री यांनाही या अशा पद्धतीच्या पद्धतीच्या व्यवसायाची माहिती नव्हती. त्यामुळे ही ओळख, ही परंपरा जपली पाहिजे, याच हेतूने धनश्री यांनी आपला व्यवसाय सुरु केला. पुढे अशा पद्धतीने ही कला जतन करण्यासाठी याचे शिक्षण दिले गेले पाहिजे. त्याचे फक्त ‘मार्केटिंग’ किंवा व्यवसायातून याचे जतन होणार नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन धनश्री यांनी या विणकामाचे शिक्षणही देण्यास सुरुवात केली आहे.


घरी त्यांच्या सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली त्या स्त्रियांना शिकवतात, त्यामध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतात. ग्राहकांना जास्तीत जास्त हाताळायला सोपे कसे होईल, हाच त्यामागचा विचार असतो आणि हाच विचार ठेवून धनश्री हे काम करतात. आता हळूहळू तरुणांनासुद्धा या विषयात रुची वाटायला लागली आहे. त्यामुळे आस्थेने अशा कपड्यांकडे वगैरे कल वाढतो आहे. सध्या या अशा प्रकारचे विणकाम करू शकणार्‍या स्त्रिया वाढत आहेत आणि हळूहळू का होईना, या परंपरेची जपणूक होत आहे. यासाठी धनश्री यांच्यासारख्या या क्षेत्रातील उद्योजकांचा मोठा वाटा आहे. धनश्री यांना या कामात त्यांच्या सासूबाईंचा खूप पाठिंबा लाभला असून हे शिकवण्याची जबाबदारी त्याच सांभाळतात.


आता जरी धनश्री यांचा व्यवसाय हा त्यांच्या शहरापुरताच मर्यादित जरी असला, तरी त्यांना फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर आपला व्यवसाय पसरवायचा आहे. याचबरोबरीने सध्या ज्या पद्धतीचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत, त्यात अजून चांगले काय करता येईल? त्यातही लहान मुलांना अतिशय सुयोग्य आणि वापरायला अत्यंत सोपे कपडे कसे बनवता येतील, याकडेही धनश्री यांना लक्ष द्यायचे आहे आणि काम करायचे आहे. इतके दिवस घरातूनच चालणारा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी त्यांनी पुण्यात स्वतःचा स्टुडिओ उभारला आहे.


या स्टुडिओच्या माध्यमातूनही काम वाढवण्याचे प्रयत्न त्या करणार आहेत. याचसाठी त्यांनी आता आपल्या ब्रॅण्डचे नाव ’दुलार इंडिया’ असे ठेवले आहे. धनश्री यांच्या उदाहरणातून त्या हाच संदेश देऊ इच्छितात की, लहानतल्या लहान गोष्टींमधून व्यवसाय होऊ शकतो. आपली परंपरा जपून तिला व्यवसायाची जोड देऊन ती जपून ठेवता येते, हेच त्या यातून दाखवून देऊ इच्छितात, असे म्हणायला हवे. परंपरेला आधुनिकतेचा साज देऊन, त्यातून त्याच्या संवर्धनाबरोबरच रोजगार निर्मितीचे काम करणार्‍या धनश्री लेले यांच्या कार्याला खूप शुभेच्छा...!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.