‘नॅनो’ म्हणजे काय बरं?

    18-Dec-2022   
Total Views |
uddhav thackeray



काय तो आमचा मोर्चा होता व्हा व्हा. कमळवाले तर आमच्या मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हणाले. ‘नॅनो’ म्हणजे काय बरं? नाही विचारलेले बरे, नाही तर आमचे द्रष्टे सध्या तुरुंगातून बाहेर आलेत. ते आम्हाला ‘नॅनोडॉलॉजिस्ट’ म्हणायचे. त्यामुळे या शब्दाचा अर्थ आधीच समजून घेतलेला बरा. किंबहुना, तो शब्द कमळवाले त्यातही फडणवीस म्हणालेत म्हणजे त्याला गहन अर्थ असणार. काय करतील त्याचा नेम नाही. चांगले चालले होेते, तर काय याचा ‘ससपेन्स थ्रिलर’ अजून कळाला नाही. आता यापुढे जे कोणी उरलेत, त्यांना सोबत राखून ठेवावेच लागेल. काय करणार तेही जायचे भुर्रररर! मग आम्ही काय चिमणी उडाली, कावळा उडाला खेळत बसायचे का? हो, आमच्या पेडणेकर बाई मागे छान म्हणाल्या होत्या की, “मोठे मोठे साप आमच्याकडे अजून आहेत.” साप...अरे बापरे साप आमच्याकडे आहेत? कोण आहेत बघायला पाहिजे. तसे आदीचे लक्ष असतेच. माझ्या नंतर अंह मी असताना पण माझी गादी त्यालाच चालवायची आहे. त्यामुळे तो लक्ष ठेवून असतो.‘काय करणार आलीया भोगासी असावे....’ त्यापुढे काय असते आठवत नाही. पण, कालचा मोर्चा विशाल विराट होता. देशाने आजपर्यंत असा मोर्चा पाहिला नव्हता. इतका मोठा मोर्चा. मला तर मोर्चाची स्वप्न रात्रभर पडत होती. इतक्या लोकांना मी आवडतो बघा. काय म्हणता या मोर्चाला दुसर्‍या दोन पक्षांचाही पाठिंबा होता? अंह हे चालणार नाही. आम्ही जिथे असतो तिथे आम्हीच मुख्य असतो. काहीही झाले तरी ‘ब्येस्ट सीएम’ होतो. नुसत्या फेसबुक लाईव्हवर राज्य चालवले मी. आहे का कुणाची बिशाद. जाऊ द्या, विषयांतर नको. मोर्चाला लोकांचा पाठिंबा होता. हजारो लोक माझ्यासाठी आणि सध्याच्या राज्य सरकारच्या विरोधात आलेले समजले का? काय म्हणता मोर्चा माझ्यासाठी नव्हता, तर महापुरूषांच्या नावाने होता? काय म्हणता, आमच्या उपनेत्या अंधारे ताईने तर हिंदू धर्माच्या एकाही देवावर एकाही संतावर टीका करण्याचे सोडले नाही? अपमान करण्याचे सोडले नाही? हिंदू धर्माच्या देवदेवतांचा आणि संतांचा अपमान काय अपमान नाही म्हणता? नका मला असले प्रश्न विचारू नका. मला माझ्या ‘नॅनो मोर्चा’त खूश राहू द्या? ‘नॅनो’ म्हणजे काय बरं? ‘नॅनोडोलॉजिस्ट’ शब्द कसा छान आहे नाही ‘कोविडोलॉजिस्ट’सारखा!

हे प्रश्न पडले का?


भारतीय सैन्याच्या कार्यक्षमतेवर संशय कुणीही भारतीय घेऊच शकत नाही. उलट भारतीयांच्या मनात सैन्याविषयी जेवढे प्रेम आणि आदर आहे तेवढा इतर कुणाबाबतही नसावा. मात्र, काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या राजकुमारांना तसे वाटत नसावे असे दिसते. कारण, मागे ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला तेव्हा या कंपूने पुरावे मागितले होते. त्यावेळी देशभरातील जनतेने यावर काँग्रेस पक्षाच्या शंकेबाबत आश्चर्यही व्यक्त केले होते. आताही देशाच्या शूर सैनिकांनी चीनच्या सैन्याला पिटाळून लावले तेव्हाही देशाच्या सैनिकांचे अभिनंदन करण्याऐवजी राहुल गांधी यांना पुन्हा यात काही नकारात्मकच वाटत आहे. त्यांच्या मते, चीन भारतासोबत युद्धाची तयारी करत असताना भारत काहीच करत नाही. राहुल गांधी यांचे म्हणणे जर गांभीर्याने घेतले तर अर्थ होतो की, चिनी सैनिक भारतासोबत लढण्यास सिद्ध होत असताना भारतीय सैनिक काही करत नाहीत. भारतीय सैनिकांबाबत असे मत राहुल गांधी यांचे का आहे? ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत त्यांच्या पणजोंबाच्या राज्यात चिन्यांनी देशावर हल्ला केला होता. त्यावेळी राहुल यांचे पणजोबा आणि देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जरा जरी सजग राहिले असते, त्यांनी चिन्यांवर विश्वास ठेवला नसता तर? कदाचित भारतीय सैन्याने त्या युद्धात चिन्यांची पुरती जिरवलीही असती. अर्थात, ही जर-तरची गोष्ट आहे. असो. पुढे ही पाकिस्तानसोबत युद्ध झाले आणि त्यातून १९७१ साली बांगलादेशाची निर्मिती. या युद्धाने राहुल यांच्या आजीची प्रतिमा भलेही रणरागिणी म्हणून अस्तित्वात आली. मात्र, त्या युद्धाबद्दलही आज अनेक जण म्हणतात, पाकिस्तानचे तुकडे झाले छान झाले. मात्र, अजून एक मुस्लीम धर्मीय शत्रूराष्ट्र निर्माण झाले. तिथे ही हिंदू बंगाली समाजाच्या वस्त्या होत्या. निदान हिंदू बंगाली परिसराला तरी भारत देशात सामावून घ्यायचे होते. पण, तसे न होता उलट स्वतंत्र बांगलादेश निर्माण झाल्यावर तिथले उरले सुरले हिंदू बंगाली आपली जमीन घर सगळे सोडून विस्थापित होऊन भारतात आले. त्यावेळी राहुलच्या आजीने मुत्सदेगिरी दाखवली असती तर? पण तसे झाले नाही. असो. आपण काही आंतरराष्ट्रीय युद्धाचे अभ्यासक नाही. मात्र, वरील प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत. राहुल गांधी यांना हे प्रश्न पडलेत का? काँग्रेस पक्षाला हे प्रश्न पडले का?







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.