‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा : काळाची गरज!

    10-Dec-2022   
Total Views |
Love Jihad


महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा पारित होऊ शकतो, याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले, तर महिला व बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे की, “ ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, अशा विवाहाने फसलेल्या मुलींना त्रास आहे, अशी तक्रार असल्यास या मुलींना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापन करणार आहे.” आ. नितेश राणे यांनीही ‘लव्ह जिहाद’च्या घटनांविरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. या अनुषंगाने उत्तर प्रदेशमधील ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा नेमका काय आहे? तसेच महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधात निर्माण होणार्‍या विशेष समितीचे महत्त्व काय, याचा मागोवा घेणारा हा लेख...


महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा पारित होऊ शकतो, याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर महिला व बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की,“आंतरधर्मीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापन करणार आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे, याची ही समिती माहिती घेईल. पुढील दहा दिवसांत अशा दहा सदस्यांची समिती स्थापन होणार आहे. या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही समिती प्रयत्न करेल.” मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या म्हणण्यानुसार जर अशी विशेष समिती निर्माण झाली, तर खरेच महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या घटना कमी होतील, हे नक्की.


या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांनी ज्या उत्तर प्रदेशच्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचा संदर्भ दिला, तो काय आहे तेही पाहू.त्या कायद्याचे नाव आहे - ‘उत्तर प्रदेश विधी विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश-२०२०.’ ‘उत्तर प्रदेश विधी विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश, २०२०’ हा नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या मंत्रिमंडळाने पारित केला. त्याला दि. २८ नोव्हेंबर, २०२० रोजी उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी मंजुरीही दिली आणि ‘उत्तर प्रदेश विधी विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश, २०२०’ हा कायदा म्हणून पारित झाला.


आता हा कायदा काय सांगतो, ते पाहू.

* केवळ धर्मपरिवर्तन करण्यासाठी मुलीशी विवाह केला असेल, तर कायद्यानुसार ते लग्न बेकायदेशीर आहे. असा गुन्हा करणार्‍यांना कमीत कमी एक ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा मिळू शकते. तसेच कमीत कमी १५ हजार रुपये दंडही भरावा लागू शकतो.

*तसेच अनूसूचित जाती जनजातीच्या महिला किंवा कोणत्याही अल्पवयीन मुलीचे धर्मपरिवर्तन करणे हा गुन्हाच मानण्यात येईल. अनुसूचित जाती किंवा जनजातीच्या महिला किंवा अल्पवयीन मुलीशी असा गुन्हा घडला, तर आरोपीला तीन वर्षे ते दहा वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. त्याचबरोबर २५ हजार रुपये दंडही होऊ शकतो.

* या कायद्यानुसार स्वेच्छेने धर्मपरिवर्तन करणार्‍या व्यक्तीला धर्मांतर करण्यापूर्वी दोन महिन्यांआधी त्यांच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटकडे सूचना द्यावी लागणार आहे. तसेच धर्मांतर करु इच्छिणार्‍या व्यक्तीला जाहीर करावे लागेल की, त्याने किंवा तिने कोणत्याही दबावाला, भीतीला प्रलोभनाला बळी न पडता, धर्मपरिवर्तन केले आहे. जर सदर व्यक्तीने जाहीर केलेली माहिती खोटी आढळली, तर संबंधित व्यक्तीला सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास तसेच कमीत कमी दहा हजार रुपये दंड भरावा लागेल.


या कायद्यानुसार प्रलोभन म्हणजे काय?


उपहार स्वरूपात प्रलोभन देणे, पैसे देणे, रोजगार देण्याचे आश्वासन देणे किंवा त्या संबंधित धर्माच्या संस्थेद्वारे संचलित कोणत्याही प्रतिष्ठित शाळेत किंवा शिक्षण संस्थेमध्ये मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन किंवा चांगले जीवन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वगैरे देणे हे सगळे या कायद्यानुसार ‘प्रलोभन’ या शब्दात अभिप्रेत आहे. अर्थात, यात चांगले जीवन उपलब्ध करून देणे, हे जे वाक्य आहे, त्यात व्यक्तीच्या जीवनासंदर्भातली कोणतीही गोष्ट वर्गीकृत होऊ शकते

या कायद्यानुसार ‘जबरदस्ती’ म्हणजे काय?

कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छेविरूद्ध कार्य करण्यास बळजबरी करणे, मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या व्यक्तीला इजा पोहोचवणे किंवा धमकी देणे, म्हणजे या कायद्यानुसार ‘जबरदस्ती’ मानली जाईल.

 धर्मांतरण म्हणजे काय?

दुसरा धर्म स्वीकारण्यासाठी व्यक्तीला स्वधर्माचा त्याग करायला सांगणे म्हणजे धर्मांतरण.


या कायद्याचा धर्मांतरण संदर्भातला सारांश


धोका देऊन, आमिष दाखवून जबदरदस्ती किंवा कोणत्याही दडपणाद्वारे विवाह किंवा धर्मपरिवर्तन करणे, अल्पवयीन अनुसूचित जाती किंवा जनजाती महिलेचे धर्मपरिवर्तन केले, अशाच प्रकारे सामूहिक धर्मपरिवर्तन केले, तर हा गुन्हा आहे. तसेच, धर्मपरिवर्तनासाठी विवाह केला किंवा व्यक्तीचे नाव जरी धर्मपरिवर्तनासाठी बदलले, तरीसुद्धा तो गुन्हा आहे आणि या संबंधित विवाह रद्द ठरवला जाईल.

या कायद्यानुसार सगळ्यात पहिली शिक्षा झाली ती अमरोहाच्या अफजल मोहम्मदला. अफजलचा गुन्हा, गुन्हा करण्याची मानसिकता आणि त्यामध्ये फसणारी मुलगी, तिचे कुटुंब आणि या सगळ्यातून मुलीची सोडवणूक करून अफजलला त्याच्या कुकर्माची शिक्षा या देण्यासाठी सिद्ध असलेला उत्तर प्रदेश विधी विरूद्ध ‘धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश-२०२०’. या गुन्ह्याचा घटनाक्रम वाचला की लक्षात येते की, खरेच ‘लव्ह जिहाद’कशाला म्हणतात आणि हा कायदा किती सक्षम आहे.

अमरोहा येथे एक प्रतिष्ठित हिंदू व्यापारी होते. त्यांची अमरोहा येथे एक नर्सरी होती. एके दिवशी त्यांच्या नर्सरीत एक तरुण आला. तेव्हा या व्यापार्‍याची १६ वर्षांची मुलगी तिथे होती. तरुणाने या मुलीशी संभाषण केले. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीला अरमान कोहली या नावाने ‘स्नॅपचॅट’वर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. तिने ती स्वीकारली. अरमानचा आणि त्या मुलीचा संवाद सुरू झाला. काही महिन्यांनी ती मुलगी बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तपासयंत्रणा गतिमान केली आणि मुलगी सापडली. ती अरमानसोबत होती. अरमान तिच्याशी विवाह करण्याच्या तयारीत होता. २६ वर्षांचा अरमान आणि १६ वर्षांची ती पळवून आणलेली मुलगी. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे, प्रसाार माध्यमांमध्ये अरमान कोहली म्हणून ओळख ठेवणारा आणि या अल्पवयीन मुलीलाही आपण अरमान कोहली म्हणजे हिंदू आहोत, असे सांगणारी ही २६ वर्षांची व्यक्ती प्रत्यक्ष अफजल मोहम्मद होती.



तसेच त्याला या प्रतिष्ठित हिंदू व्यापार्‍याच्या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र, तो स्वतः अकुशल कामगार होता. सुतारकाम करणार्‍यांच्या हाताखाली तो काम करत असे. पोलिसांनी अफजलला अटक केली. मुलीने धर्मपरिवर्तन करावे म्हणून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी तिला मारहाणही केली होती, असे वैद्यकीय अहवालातून सिद्धही झाले. मुस्लीम धर्म स्वीकार, म्हणून अफजलने त्या मुलीला धमकावलेही होते, असेही त्या मुलीने कबूल केले. न्यायालयात खटला उभा राहिला. १७ महिने लागले आणि दि. १९ सप्टेंबर रोजी अफजलला शिक्षा सुनावली गेली. पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ४० हजार रुपये दंड! ‘उत्तर प्रदेश विधी विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश, २०२०’ कायद्यानुसार शिक्षा झालेला पहिला गुन्हेगार म्हणजे हा अफजल मोहम्मद. अल्पवयीन मुलीची फसवणूक, अपहरण, धर्मांतरण आणि जबरदस्तीने विवाह करण्याचा प्रयत्न याविरोधात अफजलला अखेरीस शिक्षा ही झालीच.



 एकट्या उत्तर प्रदेशमध्ये या कायद्यानुसार, ज्याला ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदाही म्हंटले जाते, त्या कायद्याविरोधात शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. अर्थात अफजलला शिक्षा झाली, त्यावेळी नेहमीप्रमाणे काही पुरोगाम्यांनी तसेच त्याच्या कौममधील काही धर्मांधांनी, त्याच्या नातेवाईकांनी वगैरे गळे काढले. पण, त्यांनी काहीही म्हंटले तरीसुद्धा अफजलच्या कुकृत्याला मिळणार्‍या शिक्षेला ते आव्हान देऊ शकत नव्हते. कारण, उत्तर प्रदेश सरकारने पारित केलेला ‘उत्तर प्रदेश विधी विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश-२०२०’ कायद्यानुसार अफजलला शिक्षा सुनावण्यात आली होती. कारण, या कायद्यानुसार असत्य, मिथ्य, प्रभाव दाखवून, धमकी देऊन विवाहाच्या नावावर किंवा धोका देऊन केलेले धर्मपरिवर्तन हा दंडनीय अपराध आहे. जर अशी घटना घडली, तर संबंधित व्यक्तीचे धर्मपरिवर्तन झालेच नाही, असे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या घटनेतील आरोपीवर आहे. अमरोहाच्या घटनेमध्ये २६ वर्षीय अफजलला शिक्षा होण्याचे मुख्य कारण ठरले ते त्याने दुसर्‍या धर्मातील अल्पवयीन मुलीसमोर स्वत:ची खरी धार्मिक ओळख लपवली, त्या मुलीला फूस लावली, तिचे अपहरण केले आणि तिला त्याचा मुस्लीम धर्म स्वीकारायला आणि त्याच्यासोबत विवाह करण्यासंदर्भात बळजबरी केली.

आता उत्तर प्रदेश, गुजरात किंवा मध्य प्रदेशासारखा महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा होणार, अशी सुचिन्हे दिसत आहेत. त्याआधी महिला व बाल विकासमंंत्री मंगलप्रभात लोढा यंनी सांगितल्यानुसार आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींचा छळ होत असेल, त्यांना त्रास दिला जात असेल, तर त्यासाठी त्यांना सहकार्य करणारी एक विशेष समिती गठित केली जाणार आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे.कारण, ऑक्टोबर महिन्यात चेंबूरच्या नागवाडीमध्ये रूपाली चंदनशिवेचा गळा तिच्या पतीने इकबाल शेखने चिरला होता. भरवस्तीत घडलेल्या या ‘लव्ह जिहाद’च्या भयानक कृत्याने सगळा देश हादरला. रूपाली २३ वर्षांची, तर इकबाल ३८ वर्षांचा. आधीच दोन पत्नी असलेला आणि मुल असलेला इकबाल. १६ वर्षांच्या रूपालीवर इकबालची नजर पडली. एक दिवस असा आला की, रूपाली त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली.



रूपाली पुढे गरोदर राहिली. तेव्हा तिला वाटले की इकबालशी विवाह करण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय नव्हता. तिच्या घरातल्यांनी तिला परोपरीने समजावले. मात्र, ती इकबालसोबत निघून गेली. तिचे वय वर्षे अवघे १६. त्यावेळी इकबालचे म्हणणे होते की, रुपाली स्वतःच्यामर्जीने त्याच्यासोबत आली. रूपालीच्या आईवडिलांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली. पण, गरीब आईवडिलांची तक्रार गांभीर्याने घेतली गेली नाही. रूपालीचे आईबाबा घरी परतले. त्या दिवसापासून त्यांनी रूपालीशी संबंध तोडून टाकले. रूपालीचे माहेर तुटले. तिच्या हक्कासाठी, तिच्या भल्यासाठी काही तरी करू इच्छिणारे तिचे नातेवाईक तिच्यापासून दुरावले. आईबाबा आपले तोंडही पाहू इच्छित नाहीत, हे रूपालीला माहिती होते. पुढे काही दिवसांतच बुरखा घालत नाही किंवा मुस्लीम रितीरिवाज पाळत नाही, म्हणून इकबालने रूपालीला मारहाण सुरू केली.




शारीरिक, मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली. रात्रीबेरात्री तो तिला मारायचा आणि घराबाहेर काढायचा. हे रूपालीच्या माहेरच्यांनाही कळायचेच. मारहाण असह्य होऊन कधी कधी रूपाली तिच्या आईबाबांच्या शेजारीपाजारीही आसरा शोधायलाही आली होती. पण, तिने आईवडिलांकडे मदत मागितली नाही. कारण, इकबालसाठी घरातून पळून जाताना तिने आईवडिलांचे काहीएक ऐकले नव्हते, उलट त्यांच्याशी भांडण केले होते. ती गेल्यानंतर आईबाप पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर ती इकबालसोबत ठाम उभी होती. आता कुठच्या तोंडाने पुन्हा आईबाबांकडे जायचे, असा प्रश्न तिला पडला असणारच! यानंतर रूपालीचा क्रूरपणे खून झाला. जर अशावेळी रूपालीवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवणारे कोणी असते तर? रूपालीचे दुःख, समस्या जाणून घेऊन त्यावर संघटितरीत्या मार्ग काढणारे कुणी असते तर?



दुसरीकडे ३५ तुकड्यात कापल्या गेलेल्या श्रद्धा वालकरचे तरी काय? ती आफताबसोबत निघून गेली. अगदी पित्याला सांगून गेली की, “मी २६ वर्षांची आहे आणि मला काय करायचे आहे ते मी करू शकते.” त्यानंतर आफताबचे खरे रूप कळल्यावर तिने पोलिसांमध्ये तक्रारही केली होती. पण, पुढे काय? जर अशावेळी श्रद्धाचे दुःख समजून घेऊन, त्यावर योग्यरित्या काम करणारी संघटनात्मक शक्ती तिच्यासोबत असती तर? तर कदाचित श्रद्धा पुन्हा फिरून आफताबकडे गेली नसती. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार जी समिती गठित करणार आहे, तिचे महत्त्व मोठे आहे.



या दोन विदारक घटना तर केवळ हिमनगाचे टोक आहेत. मन आणि डोळे उघडे ठेवले, तर जाणवते की आज ‘लव्ह जिहाद’चा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. दोघांच्याही संमतीने आणि पूर्ण ओळखीने कोणत्याही दबाव, आमिष आणि धोक्याशिवाय झालेल्या सज्ञान व्यक्तीच्या प्रेमविवाहाला विरोध नाही, हे लक्षात घ्या. मात्र, आजकाल समाजात वावरताना, काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, गैरमुस्लीम किशोरवयीन मुलं प्रेमाच्या जाळ्यात ओढली जात आहेत. त्यांना फसवून किंवा लालूच देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले जातात. जोपर्यंत मुलगी सज्ञान म्हणजे १८ वर्षांची होत नाही, तोपर्यंत हे सुखैनैव चालते आणि तेही कुणालाही कानोकान खबर लागणार नाही, अशा नियोजितरित्या चालते.



ज्या दिवशी ती मुलगी १८ वर्षांची होते, त्या दिवशीच तिला निकाह करण्यासाठी ‘राजी’ करण्यात येतेे. (इथे ‘राजी’ हा शब्द ‘जबदरस्ती’ किंवा ‘फसवणूक’ असा समजला जावा). तिला हे करण्याशिवाय पर्याय नसतो. कारण, वयात येण्याआधीपासून किंवा वयात आल्या आल्याच तिला लैंगिक संबंधांची सवय किंवा व्यसनांची सवय त्या नराधमाने लावलेली असते. बहुतेक वेळा लैंगिक संबंध करतानाचे व्हिडिओ-फोटो गपचूप काढलेले असतात. जर निकाहास मान्यता दिली नाही, तर आपण ते ‘व्हायरल’ करू, अशी धमकी मग या मुलींना दिली जाते. मग या मुलींपुढे पर्याय काय असतो? घरात आईबाबांना कळले, तर ते काय म्हणतील? आपले आयुष्यच संपले, या भीतीने त्या हतबल होतात आणि धर्मांतर करून निकाह करण्यासाठी तयार होतात. या घटनांमध्ये ज्यावेळी आईबाबांना हे कळते, तेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात. पण, मुलगी सज्ञान असते आणि ती तिथे आईबाबांच्या विरोधातच बोलते. आईबाबांना, नातेवाईकांना मान खाली घालून घरी परतावे लागते.




मुलीमुळे कुटुंबात, परिसरात, समाजात इज्जत गेली आणि वर मुलीने आपल्या प्रेमाची मायेची कदर केली नाही म्हणून पालकही मनाशी ठरवतात की, आता मुलगी मेली असेच समजायचे. इथे मुलीला तिचा पती जे म्हणेल ते ऐकावेच लागते. आता तर तिच्या मदतीला तिच्यासोबत तिचे हक्काचे आईबापही नसतात. मग काय, या पतीला आणि तिच्या सासरच्यांना तिच्यावर अत्याचार करण्यासाठी रान मोकळे होते. कल्पना करा, अशा वेळी मुलीने कुणाकडे मदत मागायची? या अशा घटनांमध्ये तिच्या सुखदुःखांची चौकशी करणारे, तिला मदतीचा हात देणारे कायदेशीररित्या संघटितरित्या कुणी असले तर? या सगळ्या शोषित-पीडित मुलींच्या व्यथेने व्यथित झालेली संवेदनशील व्यक्ती म्हणून मी मंगलप्रभात लोढा यांनी प्रस्तावित केलेल्या समितीकडे पाहते.


तसेच, खरोखरच अशा प्रकरणांमध्ये ज्या फसवलेल्या मुली आहेत, त्यांचे पुढे काय होते? खूप सार्‍या घटनांमध्ये असे दिसले आहे की, त्यांचे धर्मांतरण केले जाते. त्यांना अक्षरश: गुलामासारखे वागवले जाते, कित्येकांना तर देहविक्रीच्या धंद्यातही जबदरस्तीने ढकलले जाते. काही घटनांमध्ये तर या मुलींचा वापर दहशतवादी कृत्यांमध्ये मदतनीस म्हणूनही केला जातो. चांगल्या हसत्या-खेळत्या सुसंस्कृत कुटुंबांतल्या लेकींवर हा अत्याचार का? केवळ त्यांनी कुणावर तरी विश्वास ठेवला, कुणावर तरी प्रेम केले म्हणून? तिचा गुन्हा काय तर ती हिंदू होती? (हिंदू म्हणजे यात शीख, जैन आणि बौद्धही ओघाने आलेच!)

काही लोक म्हणतात की, ‘लव्ह जिहाद’ हा शब्दच खोटा आहे. तो मनुवादी हिंदुत्ववाद्यांची पैदास आहे. पण, ‘लव्ह जिहाद’ शब्दच पहिल्यांदा उद्गारला तो कम्युनिस्टशासित केरळ राज्यातील डाव्या विचारसरणीच्या राज्यकर्त्यांनी आणि तिथल्या चर्च संस्थेने. आज भारतातील तर सोडाच, नेपाळ, श्रीलंका या देशातील बहुसंख्य समाजाने प्रेमाच्या नावाने खेळला जाणारा क्रूर खेळ म्हणजे ‘लव्ह जिहाद’च असतो, हे मान्य केले आहे. शेवटी इतकेच वाटते की, कोणाच्याही लेकीबाळींचा रूपाली किंवा श्रद्धासारखा दारुण अंत होऊ नये. कुणाचीही मुलगी ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसू नये. सध्या महाराष्ट्र राज्यातले भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सरकार ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांबाबत अतिशय गंभीर आणि तितकेच संवेदनशीलही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ थांबेल, असा सुदिन नक्की येईल, असे वाटते.

महिला बालकल्याण विभागाकडून विशेष समितीची स्थापना

काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेच्यामार्फत देशभरात ‘लव्ह जिहाद’च्या घडलेल्या ४२० घटनांची माहिती प्रकाशझोतात आणण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलेल्या या माहितीत महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या बाबतीत घडलेल्या एकूण नऊ घटनांचादेखील उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच, उत्तर भारत आणि देशातीलइतर राज्यांमध्ये घडलेल्या घटनांचादेखील त्यात उल्लेख करण्यात आला होता. मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीदेखील महाराष्ट्रात ‘लव्ह जिहादच्याविहिंपने उघडकीस आणलेल्या नऊ प्रकरणांचा सखोल आणि निष्पक्ष चौकशीचे स्पष्ट संकेत दिले होते. लोढा म्हणाले होते की, “कुणीही यापुढे हिंदू मुलींना फसवून, त्यांच्याशी लग्न करून त्यांना नुकसान पोहोचवूनये, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या अनुषंगाने अन्याय झालेल्या मुलींना न्याय देण्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून मी स्वतः मंत्री म्हणून जातीने या प्रकरणांची योग्य चौकशी व्हावी यासाठी लक्ष घालेन आणि त्यांना न्याय मिळवून देईन.”




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.