ठाणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी सलगी केलेल्या कामगार नेते आणि धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुरबाड तालुक्यातील सायले येथील डोईफोडी नदीपात्रात बेकायदेशीरपणे विहीर बांधकाम करून पाणी चोरीप्रकरणी तलाठी संतोष पवार यांच्या तक्रारीवरून टोकावडे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विहिरीतून राजन राजे यांनी त्यांच्या मालकीच्या शेती आणि फार्महाऊसकरिता पाणी वापरल्याचे प्राथामिक तपासात समोर आले आहे.दरम्यान,केवळ सुडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केल्याचे राजे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुरबाड, टोकावडे पोलीस ठाण्यात तलाठ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डोईफोडी नदीपात्रात शासनाची परवानगी न घेता ऋग्वेद राजन राजे यांनी विहिरीचे बांधकाम केल्याची तक्रार ग्रामपंचायत सायले आणि साजगाव येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली होती. तसेच कारवाई करावी यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. या तक्रारीची दखल घेऊन मुरबाडच्या तहसिलदारांनी स्थळ पाहाणी करून चौकशी केली. त्यावेळी नदीपात्रात बेकायदेशीररित्या ३० फुट खोल व २५ फूट व्यासाच्या विहीरीचे बांधकाम झाल्याचे आढळून आल्याने ऋवेद राजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या विहिरीतून शेती आणि फार्म हाऊसकरिता पाणी वापरल्या प्रकरणी राजन राजे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला.यासंदर्भात गुरुवारी जाहिर पत्रकार परिषद घेऊन राजे यांनी सर्व आरोप फेटाळले असुन सुडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.
धर्मराज्यचे राजन राजे हे कामगार नेते असून ठाणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांत त्यांची कामगार संघटना आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना जाहिर पाठिंबा दर्शवुन भेटदेखील घेतली होती. याशिवाय ठाकरे गटासोबत सलगी वाढवून काही दिवसांपूर्वी झालेल्या ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत व्यासपीठावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टिका केली होती.