परिवर्तनाचा शिल्पकार - लालकृष्ण आडवाणी

    09-Nov-2022   
Total Views |

Lal krishna advani (1)



२२ जानेवारी २०२३ या दिवशी पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पारपडला. लालकृष्ण अडवाणी यांची १९९० सालची रथयात्रा झाली नसती, तर भारतात राजकीय परिवर्तन व्हायला आणखीन काही काळ गेला असता. खर्‍या अर्थाने भारतरत्न लालकृष्ण अडवाणी हे परिवर्तनाचे शिल्पकार आहेत.
 
 
फाळणीच्या जखमा झेलत, त्यांना भारतात यावे लागले. १९५३ साली जनसंघाची स्थापना झाली. तेव्हाच्या पिढीतील ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना श्रीगुरूजींनी जनसंघात काम करायला सांगितले, त्यात लालकृष्ण अडवाणी एक होते. या सर्व कार्यकर्त्यांनी हाडाची काडे करून आणि रक्ताचे पाणी करून जनसंघाचे रोपटे भारताच्या राजकीय भूमीत रूजविले आणि वाढविले.जनसंघाला तत्त्वज्ञानाची बैठक पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी दिली. अटलबिहारी वाजपेयी हे जनसंघाचा चेहरा झाले.
 
 
लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, सुंदरसिंग भंडारी यांनी संघटन मजबूत केले. याच जनसंघाचे रूपांतर पुढे भारतीय जनता पार्टीत झाले. जनसंघाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा तो पक्ष इतर राजकीय पक्षांच्या दृष्टीने अस्पृश्य होता. जनसंघाशी हातमिळवणी करण्यास अन्य विरोधी पक्ष फारसे उत्सुक नसत. आणीबाणीनंतर थोडे परिवर्तन झाले. जनसंघ, जनता पार्टीत विलीन झाला. विध्वंसक समाजवाद्यांना आणि डाव्या डोक्यांना जनसंघाचा वाढता प्रभाव सहन झाला नाही, त्यामुळे जनता पार्टी फुटली आणि भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला.
 
 
भारतीय जनता पार्टी नजीकच्या भविष्यकाळात सत्तेवर येईल, असे भारतातील कोणत्याही राजपंडिताला वाटत नव्हते. राजकारणात हयात घालविणार्‍या राजनेत्यांनादेखील असेच वाटत होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मात्र असे वाटत नव्हते. आपला पक्ष काँग्रेसला पर्याय देईल, यावर त्यांचा विश्वास होता. या विश्वासाची तीन कारणे होती. १. भक्कम वैचारिक अधिष्ठान २. समर्पित कार्यकर्ते ३. चारित्र्यसंपन्न नेते. अग्रभागी असणार्‍या चारित्र्यसंपन्न नेत्यांत लालकृष्ण अडवाणी यांचे नाव अतिशय आदराने घ्यावे लागते. राजकारणाच्या चिखलात राहूनही त्यांचा सदरा कधी मलीन झाला नाही. पैशाचा अपहार, स्त्रियांशी गैरव्यवहार, असले आरोप त्यांच्या कट्टर शत्रूंनीही त्यांच्यावर कधी केले नाही. ‘मला राजनीतीत संघविचार आणि संघआदर्श रूजवायचा आहे,’ या ध्येयाप्रत अडवाणी समर्पित आहेत.
 
 
राजकारण करणारे हजारो नेते आहेत, राजनीतीवर स्वतःचा ठसा उमटविणारे थोडे आहेत. गाजावाजा करून स्वतःच्या वाढदिवसाचे ‘फ्लेक्स’ लावणारे उदंड आहेत, परंतु त्यांचे राजकीय कर्तृत्व अत्यंत सुमार असते. भारताच्या राजनीतीवर ज्यांचा ठसा आहे, त्यात पं. नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, श्रीपाद डांगे, इंदिरा गांधी, नरसिंह राव अशा अनेक नेत्यांची नावे घ्यावी लागतात. लालकृष्ण अडवाणी त्यांच्या पंगतीत बसणारे नेते आहेत, फक्त एक फरक आहे, हा फरक विचारधारेचा आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे.आज केंद्रात नरेंद्र मोदी यांचे शासन आहे. लालकृष्ण अडवाणी यांची १९९० सालची रथयात्रा झाली नसती, तर भारतात राजकीय परिवर्तन व्हायला आणखीन काही काळ गेला असता. खर्‍या अर्थाने लालकृष्ण अडवाणी हे परिवर्तनाचे शिल्पकार आहेत.
 
 
श्रीराम जन्मस्थानाच्या प्रश्नावर जनजागरण करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० साली देशव्यापी रथयात्रा काढली. १९९०नंतर जन्मलेल्या पिढीला या रथयात्रेने केलेल्या जनजागरणाचा अंदाज येणार नाही. अडवाणींच्या रथयात्रेला आणि सभेला एकेका वेळी लाख ते पाच लाख उपस्थित असत. ज्या मार्गावरून त्यांची रथयात्रा गेली, त्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागताला उपस्थित असत. ‘न भूतो’ असे या यात्रेचे वर्णन करावे लागेल. लालकृष्ण अडवाणी यांनी केवळ रामाचा महिमा या यात्रेत गायला नाही, त्यांनी बेगडी सेक्युलॅरिझमवर तुफानी हल्ले केले. सेक्युलरवाद्यांच्या भिंतीला मोठे भगदाड पाडले. आक्रमक असणार्‍या सेक्युलरवाद्यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला लावला.
 
 
हिंदुत्वाची त्सुनामी अडवाणींनी निर्माण केली. आपण कोण आहोत, आपला सनातन विचार कोणता आहे, सर्व उपासना पंथांचा सन्मान ही गोष्ट आपल्या रक्तात कशी आहे, हे त्यांनी जनतेला सांगितले. ‘मुस्लीम तुष्टीकरण म्हणजेच सेक्युलॅरिझम’ हा जो अर्थ झाला होता, त्यावर अडवाणींनी कुर्‍हाड चालविली.या यात्रेने हिंदूंच्या मनात फार मोठा विश्वास निर्माण केला की, आपल्या देशाचे भले भाजपच करू शकेल. हिंदू राजकीयदृष्ट्या जागृत झाला. आपल्याला ठगविणारे कोण आणि आपल्याला योग्य दिशा देणारे कोण, हे त्याच्यापुरते स्पष्ट झाले. म्हणून कालपर्यंत भाजपला मतदान न करणारा मोठा वर्ग भाजपचा मतदार झाला. राजकीय परिवर्तनाचे पर्व सुरू झाले. एका पाठोपाठ एक अशा अनेक राज्यांच्या राजसत्ता भाजपच्या हाती आल्या. १९९६ साली केंद्रात भाजपचे सरकार आले. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. जनसंघ ते भाजप या प्रवासात भाजपचे सरकार कधी येईल, असे १९९६ पर्यंत कुणाला वाटले नव्हते. अशक्य ते शक्य अडवाणीजींनी आपल्या परिश्रमाने करून दाखविले.
 
 
राज्यावर बसण्याचा अधिकार कुणाचा? याची भारतीय परंपरा आहे. रामानंतर भरताला १४ वर्षं राज्य प्राप्त होणार होते. भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि रामाच्या नावाने राज्य केले. सर्व परिवर्तनाचे शिल्पकार असूनही अडवाणीजी म्हणाले की, “पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयीच असतील आणि तेच पंतप्रधान होतील. तसेच झाले. मख्यमंत्रिपद किंवा पंतप्रधानपद यासाठी प्रचंड स्पर्धा असते. महाराष्ट्र सध्या ती अनुभवतो आहे. अडवाणीजींनी एक महान आदर्श राजकारणात घालून दिला. भारताच्या राजनीतिक विचारधारेत १८० अंशात परिवर्तन त्यांनी केले आणि महान राजकीय चारित्र्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. हे त्यांचे कुणालाही न पुसता येणारे भारतीय राजकारणातील योगदान आहे. असा महान योद्धा आणि निःस्पृह राजनेता वयाच्या ९६व्या वर्षांत पदार्पणकर्ता झालेला आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि येणार्‍या पिढीला प्रेरणा देण्यासाठी त्यांचे आर्युमानदेखील वर्धिष्णू राहो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करू.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.