गुप्तवार्ता कार्यवाही ः कृतीयोग्य गुप्तवार्ता हीच यशाची गुरूकिल्ली (भाग-1)

    26-Nov-2022   
Total Views |
 
Maritime security
 
 
 
 
सागरी सुरक्षेचा महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणाचा, बंदरे व त्यांच्या कर्मचार्‍यांना धोक्यांपासून सुरक्षित राखण्याचा गाभा गुप्तवार्तांकन हाच आहे. सुरक्षेस असलेल्या धोक्याचे अनुमान करण्यास उपयुक्त ठरू शकेल, असे विश्वसनीय गुप्तवार्तांकन, खर्‍याखुर्‍या धोक्यांचा सामना करू शकतील, असे उपाय महत्त्वाचे आहेत. या स्तरावर पोहोचण्याकरिता, त्यात समाविष्ट असलेल्या गुप्तवार्तांकन दलांपासून ते बंदर कार्यचालकांपर्यंत, सुरक्षारक्षक संघटनांपासून ते बंदराच्या वापरकर्त्यांपर्यंत सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
 
  
राजाने दिवस व रात्रीचे प्रत्येकी आठ भाग करावेत. पाचव्या भागात पत्रव्यवहाराद्वारे मंत्रिपरिषदेसोबत सल्लामसलत करावी आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या गुप्तवार्ता अहवालांनी स्वतःस अद्यावत ठेवावे. रात्रीच्या पहिल्या भागात त्याने गुप्तवार्तांकन अधिकार्‍यांची भेट घ्यावी. सातव्या भागात त्यांच्याशी सल्लामसलत करावी आणि त्यांना कार्यवाहीकरिता रवाना करावे.
 
 
राजाची कर्तव्ये, कौटिलीय अर्थशास्त्र
 
काल 26 नोव्हेंबरला मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षं पूर्ण झाली. यामुळे सागरी सुरक्षेचे विश्लेषण करणे जरुरी आहे की, आता आपली सागरी सुरक्षा सक्षम झाली का? आणि येणारे हल्ले थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल का?
2022 मध्ये समुद्राकडून येणार्‍या हजारो कोटी रुपयांच्या ‘नार्कोटिक्स’ म्हणजे अफू, गांजा, चरस जप्त करण्यात आले. कारण, कुठल्या बोटीमध्ये हे सामान येणार होते, याची नेमकी माहिती मिळत होती, मिळाली होती आणि त्या बोटीला थांबवून तपास करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये अफू, गांजा, चरस जप्त करण्यात आला. यावरून गुप्तहेर माहिती अचूक असली, तर किती यश मिळू शकते, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.
 
 
गुप्तवार्तांकनातील अपयश
 
पूर्वसूचित असणे म्हणजेच पूर्वशस्त्रसज्ज असणे होय. हे एक विश्वस्वीकृत सत्य आहे. वारंवार घडणार्‍या दहशतवादी कृत्यांवरून आणि मोठ्या सुरक्षा अपयशांवरून, त्या सक्रिय असण्याऐवजी त्या प्रतिक्रियावादी होत आहेत. प्रतिगुप्तवार्तांकन आणि दहशतवादविरोधी कार्यवाहींकरिता तज्ज्ञ असलेल्या, तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशांतही गुप्तवार्तांकनातील अपयशाच्या अनेक कहाण्या-किस्से आहेत. जसे की युरोपमध्ये वारंवार होणारे दहशतवादी हल्ले.
 
 
‘26/11’ असो की कारगिल किंवा श्रीलंका (कार्यवाही पवन), गुप्तवार्तांकन हाच देशाचा कच्चा दुवा ठरलेले आहे.
समुद्रमार्गे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशामध्ये येणार्‍या बांगलादेशी स्थलांतरितांचा ओघ सुरूच आहे. सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशात तस्करी हा आयुष्याचा एक भागच झालेला आहे. पश्चिम किनार्‍यावर शस्त्रास्त्रे, दारूगोळा,खोटे चलन, सोन्याची, अमली पदार्थांची आणि इतर वस्तूंची तस्करी सुरूच आहे. पण, हे सर्व थांबवण्याकरिता आवश्यक असलेले कृतीयोग्य गुप्तवार्तांकन मिळवू शकलेलो नाही.तस्करी करणारे गुन्हेगार, देशद्रोही यांना आपण पकडू शकलो नाही.
 
 
‘लिट्टे’च्या सांकेतिक संदेशांची वेळेत उकल करण्याचे सामर्थ्य आपल्या गुप्तवार्तांकन संघटनांनी प्राप्त केले असते, तर कदाचित राजीव गांधी यांचे आयुष्य वाचले असते. ‘इंटेलिजन्स ब्युरो’ आणि ‘रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ या दोघांपाशीही शक्तीशाली पहिल्या पिढीचे संगणकही नव्हते आणि शत्रूचे सांकेतिक संदेश उलगडण्यास आवश्यक त्या संगणक प्रणालीही नव्हत्या.
 
 
सर्व भाषांचे तज्ज्ञ आवश्यक
 
2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला ः ‘26 /11’च्या मुंबई हल्ल्यांपूर्वी दोन ते सहा महिने आधीच संशोधन व विश्लेषण शाखेने अनेक दूरध्वनी संवाद, संकेत गुप्तवार्तांकन हस्तक्षेपाद्वारे प्राप्त केलेले होते. ज्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मुंबईतील हॉटेलांवर होऊ घातलेल्या हल्ल्यांकडे निर्देश होते. मात्र, समन्वयात अपयश आल्याने त्यांचा पाठपुरावा होऊ शकला नव्हता. हल्ल्यापूर्वी काही तास, संशोधन व विश्लेषण शाखेच्या एका तंत्रज्ञास, उपग्रह प्रक्षेपणांची देखरेख करत असताना, हल्लेखोर जलमार्गाने मुंबईत येत असताना, हल्लेखोर आणि त्यांना हाताळणारे यांच्यातील संवाद हाती आलेला होता. तंत्रज्ञाने त्या संवादास संशयास्पद म्हणून चिन्हांकित केले होते आणि वरिष्ठांकडे पाठवलेही होते. संशोधन व विश्लेषण शाखेने तो संवाद चिंताजनक असल्याचे जाणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या कार्यालयास लगेचच सावध केले होते. मात्र, या गुप्तवार्तांकडे दुर्लक्ष करण्यात आले. नंतर दहशतवाद्यांनी मुंबईवर नुकताच हल्ला केलेला होत. तेव्हाही गुप्तहेर खात्याचा एका तंत्रज्ञ दहशतवादी सहा दूरध्वनी संचांवर चाललेले संभाषण कत होता/टॅप करत होता. त्याने हल्लेखोर आणि त्यांना हाताळणारे यांच्यातील संवाद नोंदवून घेतले होते.
 
 
दि. 15 जानेवारी, 2010 रोजी एका यशस्वी कारवाईत संशोधन व विश्लेषण शाखेने शेख अब्दुल ख्वाजा यास पकडले. तो ‘26/11’च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना हाताळणार्‍या अनेकांपैकी एक होता. भारतातील ‘हुजी’ या संघटनेच्या कारवायांचा तो प्रमुख होता आणि कोलंबो, श्रीलंका येथील, भारतास सर्वाधिक हवा असलेला दहशतवादी होता.
 
 
सागरी सुरक्षेकरिता असलेले गुप्तवार्तांकनाचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर, एक ताजा दृष्टिक्षेप वर्तमान गुप्तवार्तांकन व्यवस्थेवरही टाकणे आवश्यक आहे. त्याचे तपशीलवार विश्लेषण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे गुप्तवार्तांकन करणार्‍यांच्या नेमक्या समस्या काय आहेत? त्यांच्या सातत्याने होत असलेल्या निकृष्ट कामगिरीची कारणे काय आहेत आणि ईप्सित परिणाम प्राप्त करण्यासाठी सर्व गुप्तवार्तांकन दलांचे समन्वय करण्याची आवश्यकता आहे काय, हे पैलू स्पष्ट होतील.
सागरी सुरक्षेचा महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणाचा, बंदरे व त्यांच्या कर्मचार्‍यांना धोक्यांपासून सुरक्षित राखण्याचा गाभा गुप्तवार्तांकन हाच आहे. सुरक्षेस असलेल्या धोक्याचे अनुमान करण्यास उपयुक्त ठरू शकेल, असे विश्वसनीय गुप्तवार्तांकन, खर्‍याखुर्‍या धोक्यांचा सामना करू शकतील, असे उपाय महत्त्वाचे आहेत. या स्तरावर पोहोचण्याकरिता, त्यात समाविष्ट असलेल्या गुप्तवार्तांकन दलांपासून ते बंदर कार्यचालकांपर्यंत, सुरक्षारक्षक संघटनांपासून ते बंदराच्या वापरकर्त्यांपर्यंत सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
 
 
या प्रकरणाचा उद्देश वर्तमान गुप्तवार्तांकन व्यवस्थेचा आढावा घेण्याचा आहे, ज्यामुळे सर्व आव्हानांचा सामना करण्याचे दृष्टीने एकीकृत, सुयोग्य गुप्तवार्तांकन यंत्रणा तयार केली जाऊ शकेल.
 
 
गुप्तवार्तांकनांची आपल्या देशाला गरज
 
जगातील सर्वाधिक हिंसक भागात असलेले भारताचे भौगोलिक स्थान आणि जन्मत: भारतविरोधी असलेले पाकिस्तान व चीनसारखे त्याचे शेजारी, भारतातील गुप्तचर दलांचे काम अधिकच अवघड आणि अडचणीचे करतात. राष्ट्रापुढील असंख्य सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारताची गुप्तचर दले सक्षम आहेत की नाहीत, याचे नियमित आणि गंभीरतेने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. भारताच्या गुप्तवार्तांकन संस्थांचा इतिहास असे दर्शवतो की, दहशतवादी हल्ले थांबवता येतील अशी त्यांची आजवरची कामगिरी नाही. भावी आव्हानांच्या दृष्टिकोनातून त्यांचे नियोजन केले गेलेले नाही. प्रभावी सागरी सुरक्षा मिळण्यासाठी, कृतीपात्र गुप्तवार्तांकनांची आवश्यकता असते. गुप्तवार्तांचे संकलन, समन्वय आणि उपयुक्त माहितीबाबतचा अहवाल देणे हा जगात ऐतिहासिकदृष्ट्या दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत पुरातन व्यवसाय आहे.
 
 
भारतातील वर्तमान जागतिक, प्रादेशिक आणि अंतर्गत सुरक्षा पर्यावरणात, सर्व हितसंबंधीयांना पुढ्यातील धोक्याची पूर्वसूचना प्राप्त होण्याकरिता, एका सक्षम गुप्तवार्तांकन आवश्यक आहे. ’चतुर व हुशार गुप्तवार्तांकन’ (स्मार्ट इंटेलिजन्स) संकलन, विश्लेषण, समन्वय, नोंद, वाटप, वापर आणि त्यावर सागरी सुरक्षा हितसंबंधीयांकडून प्रभावी कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. एक ‘सामायिक इंटरऑपरेबल प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला पाहिजे, जेणेकरून सुरक्षेत गुंतलेल्या प्रत्येक दलास त्याचे आधारे सुरक्षा प्रतिसाद निर्धारित करता येईल. देशाच्या फायद्यासाठी संघटनात्मक चौकटीत राहून एकत्रितरीत्या काम केले पाहिजे. ज्यामुळे गुप्तवार्तांकन माहिती वाटप जलद शक्य होईल.
 
 
गुप्तवार्तांकन म्हणजे काय?
 
गुप्तवार्तांकन प्रक्रिया, प्रचलित गुप्तवार्तांचा अहवाल तयार करून किंवा त्यावरून अनुमाने करून ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. प्रमुख समस्या तो अहवाल अजूनही कारवाई करण्यायोग्य आहे अथवा नाही, हे सुनिश्चित करणे असते. तो अहवाल योग्य वेळेत, योग्य सुरक्षादलांच्या हाती पडावा आणि तो वापरला जाईल यावर लक्ष ठेवावे. त्यामुळे गुप्तवार्ता अधिकारी आणि सागरी सुरक्षेत गुंतलेले नौदल वा तटरक्षक दलाचा कमांडिंग अधिकारी, सागरी पोलीस आणि बंदर अधिकरणे यांच्यात निकटचे संबंध प्रस्थापित झालेले असावे.
 
 
भारतीय गुप्तवार्ता दले
 
भारतापाशी अनेक गुप्तवार्ता दले आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या दले म्हणजे, संशोधन आणि विश्लेषण शाखा, भारताची बाह्य-गुप्तवार्ता दल आणि इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे देशांतर्गत गुप्तवार्ता दल. इतर गुप्तवार्ता दले पुढीलप्रमाणे आहेत. संरक्षण गुप्तवार्ता दल (ऊशषशपलश खपींशश्रश्रळसशपलश असशपलू), लष्करी गुप्तवार्ता संचालनालय (चळश्रळींरीू खपींशश्रश्रळसशपलश), राष्ट्रीय तंत्रशास्त्रीय संशोधन संघटना (छरींळेपरश्र ढशलहपळलरश्र ठशीशरीलह जीस.)
पण, महत्त्वाचे हे आहे की, सगळ्या दलांना, नियोजनाच्या पायरीवरच, किनार्‍यास असलेल्या सर्व धोक्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. नौदल/ तटरक्षक दल/ पोलीस दल यांच्या कार्यकारी आदेशकांनी त्यांची सामर्थ्ये आणि मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत आणि मग दलांना कर्तव्ये निर्धारित करून दिली पाहिजेत.
 
 
लेखाच्या पुढीपल भागांमध्ये नेमकी आणि अचूक गुप्तहेर माहिती सुरक्षा दलांनी कशी मिळवावी, याविषयी आपण विचार करू, ज्यामुळे आपल्याला समुद्रामधून असलेल्या धोक्यांचा जास्त चांगल्या पद्धतीने सामना करता येईल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.