मुंबई: शिवसेना कोणाची? यावर निवडणूक आयोगाचा निर्णय प्रलंबित असताना, शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांकडून 'धनुष्यबाण आम्हालाच मिळणार.' असा विश्वास व्यक्त केला जातोय. आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे धनुष्यबाण आमचा, असं शिंदेगटाचं म्हणणं आहे. तर आम्ही मूळ शिवसेना आहोत. पक्षाच्या घटनेनुसार धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा शिवसेनेचा आहे.
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी धनुष्यबाण शिंदेगटाकडेच राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणतात, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू कोर्टात मांडली आहे. माझ्यासकट भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असा विश्वास वाटतो. एकनाथ शिंदे मी त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार ते बाळासाहेबांच्या विचारासोबत आहेत. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन विषयावरील हे पुढे घेऊन जात आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेलाच मिळणार." अशी भूमिका रवींद्र चव्हाण यांनी मांडली.
ठाकरे गटाची भूमिका!
शिवसेना नेते अनिल देसाई यांनी आजच्या सुनावणीबाबत माहिती दिली. धनुष्यबाण आमचाच असल्याचं देसाई म्हणालेत. याआधी शिवसेनेच्या अध्यपदाची निवडणूक झाली. त्यानुसार 2024 पर्यंत उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून राहतील, अशी तरतूद आहे. एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यांच्या संख्यकडे पहावं. आमच्याकडे अधिकृत सर्व कागदपत्रं आहेत.या गोष्टीचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतली अशी अपेक्षा आहे. चिन्ह गोठवण्यासंदर्भात कुठेलीही संकेत सध्यातरी नाहीत, असं अनिल देसाई म्हणालेत.