या संघर्षाला सुगंध फुलांचा...!

    08-Oct-2022   
Total Views |

Bhushan Gaikwad
कर्ज फेडण्यासाठी गाडी विकली. आईचे अकाली निधन आणि कोरोनाचा काळ. अशा अनंत अडचणींवर मात करत फूल सजावट व विक्री व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करणार्‍या भूषण मधुकर गायकवाड यांच्याविषयी...

नाशिक शहरातील पंचवटीत जन्मलेल्या भूषण मधुकर गायकवाड यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच. वडील वाहनचालक, तर आई स्वयंपाकाची कामे करून घर चालवत. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण भूषण यांनी ‘नवभारत विद्यालया’तून पूर्ण केले. शाळेत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाली. शाळेत सर्व मुलांकडे कंपास असायची. परंतु, हलाखीच्या परिस्थितीमुळे ती ६० रुपयांची कंपास घेणेदेखील त्यांना शक्य नव्हते. ‘श्रीराम विद्यालया’त पुढे प्रवेश घेतला. आठवीत असताना त्यांनी ‘सिझनेबल’ दुकानामध्ये १५०० रुपये महिना पगारावर काम करण्यास सुरूवात केली.

‘सिझनेबल’ दुकानात कायमस्वरूपी काम नसायचे. जिद्दीतून कसे उभे राहायचे, स्वाभिमानी कसे जगायचे, हे भूषण आईकडून शिकले होते. त्यामुळे त्यांनी गाडेकर मावशींकडे फुलमाळा ओवण्यास सुरूवात केली. १०० माळा तयार केल्या की, एक रुपया मिळत होता. अभ्यासात भूषण यांना तितकासा रस नव्हता. त्यातच दहावीत भूषण नापास झाले. कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा परीक्षा देण्यास सांगितले खरे, पण दुसर्‍यांदाही भूषण यांना दहावीत उत्तीर्ण होता आले नाही. मग त्यांनी ‘एमएससीआयटी’चा कोर्स केला.

‘आयटीआय’मध्ये सुतारकामासाठी प्रवेश घेतला. परंतु, केवळ बस प्रवासाइतकेही पैसे नसल्याने त्यांनी ती गोष्टही सोडून दिली. गाडेकर मावशींकडे फुलमाळा ओवत असल्याने त्यांना हळूहळू फूलव्यवसायाची ओळख होऊ लागली. नंतर त्यांनी गाडेकर मावशींच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘बुके’ बनवणे, फुलांची ने-आण, हार बनवणे शिकून घेतले. पुढे या क्षेत्रात त्यांना सुनील माळी यांचेही मार्गदर्शन मिळाले. २०११ पर्यंत त्यांनी या क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

वडिलांचे मित्र स्व. पांडुरंग बोडके यांनी दुकानासाठी म्हसोबा मंदिराशेजारी जागा उपलब्ध करून दिली. सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने निराशा आली. परंतु, प्रयत्न सुरूच होते. सायकलवर जाऊन फुलांची ने-आण करणे, कुठे काही छोटीमोठी कामे मिळाली, तर ती करण्यास त्यांनी सुरुवात केली. व्यवसायात जम बसल्यानंतर दुचाकी घेतली. ओळख वाढत गेल्याने कामांचा ओघ वाढत गेला. पुढे चारचाकी घेतल्याने व्यवसायाने आणखी जोर पकडला. २०१४ साली विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. व्यवसाय आणि राजकारण यांची सांगड घातली. भूषण यांनी प्रवास सुरू ठेवला. आपल्या व्यवसायाला ओळख असावी म्हणून त्यांनी ‘विश्वकर्मा फ्लॉवर्स डेकोरेटर्स’ नावाने व्यवसाय सुरू ठेवला. चारचाकीदेखील त्यांनी विकत घेतली.

सगळं काही सुरळीत सुरू असताना भूषण यांच्या आई आशा यांना जून २०१९ साली रक्त कर्करोगामधील दुर्मीळ प्रकाराचे निदान झाले. जेमतेम परिस्थितीतही आईवर उपचार सुरू होते. ‘आपण इतका संघर्ष केला आहे जीवनात, तेव्हा मला काहीही होणार नाही,’ असे आई भूषणला सांगे. शेवटची ‘केमोथेरपी’ देणे बाकी असताना आणि कर्करोगावर मात करण्यापूर्वीच त्यांच्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भूषण यांचा आधार हरपल्याने पुढील वाट खडतर होती. परंतु, कधीही माघार घ्यायची नाही, ही आईची शिकवण समोर ठेवून ते या धक्क्यातून सावरले. परंतु, काही महिन्यांतच कोरोना आला आणि खरी परीक्षा सुरू झाली. ‘लॉकडाऊन’मुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. सहा ते सात महिन्यांचे घरभाडे तर थकलेच. परंतु, घरखर्च भागवणे मुश्किल झाले. तेव्हा त्यांनी काही छोटीमोठी कामे करण्यास सुरू केली.

डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने चारचाकी वाहनही विकावे लागले. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने भरारी घेण्याचा त्यांनी निश्चय केला. पत्नी पूजाला त्यांनी फूलव्यवसायाचे धडे देण्यास सुरूवात केली. एखादी ‘ऑर्डर’ असल्यास ते पत्नीला सोबत नेत. बायकोला चारचौघांत असे का नेतो, म्हणून त्यांना विरोधही झाला. परंतु, पत्नी शिकू शकते, हे पाहून त्यांनी टीकाकारांकडे दुर्लक्ष केले आणि पत्नीला शिकवले. कामातील प्रामाणिकतेच्या जोरावर भूषण यांनी पुन्हा भरारी घेतली. कर्जापायी जे वाहन विकले, तेच त्यांनी मेहनतीच्या जोरावर पुन्हा विकत घेतले. घर घेण्याचा सल्लाही त्यांना देण्यातआला. परंतु, त्यांनी व्यवसायाला प्राधान्य दिले.

आधुनिकतेला आपलंस करत नवनवीन गोष्टींचा व्यवसायात त्यांनी समावेश केला. स्वतःला आणि व्यवसायाला ‘अपडेट’ केले. वणी येथील सप्तश्रृंगी गड, चांदीचा गणपती, नवश्या गणपती यांसह अनेक प्रसिद्ध ठिकाणी त्यांनी फुल सजावटीची कामे केली. विजय वाघ, गणेश कदम, संगिता कदम, मंगल खैरनार, अक्षय शिरसाठ, जागृती मेहता, निलेश गाडेकर, जगदीश बोडके, अलका आणि शकुंतला गाडेकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभते.


“माणसाने प्रामाणिकपणे काम करत राहावं. आज २८ वर्षांपासून मी या व्यवसायात कार्यरत आहे. स्वतःचं हक्काचं घर असावं असं आईचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करणारच,” असा विश्वासही भूषण व्यक्त करतात. गरिबीवर मात करत आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या भूषण गायकवाड यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.