हिमाचल प्रदेश - परंपरा नव्हे, सत्ता ‘कायम’ राखण्यास भाजप सज्ज

भाजपच्या समाजकेंद्रीत विकासाचा विजय निश्चित – अविनाश राय खन्ना

    19-Oct-2022   
Total Views |
hp

सत्ताबदलाची परंपरा यंदा बदलणार ?
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : दर पाच वर्षांनी सत्तापक्ष बदलण्याची पंरपरा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये यंदा मात्र सत्ता ‘कायम’ राखण्यास भाजप सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजपचे मजबूत संघटन, यामुळे राज्यात भाजपचा जनाधार कायम असल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.
 
 
भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशमधील ६८ जागांवर १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे.
 
 
१९८५ पासूनची परंपरा, सलग दुसऱ्यांदा कोणत्याही पक्षास यश नाही
 
हिमाचल प्रदेशात १९८५ पासून आठ विधानसभा निवडणुका झाल्या, पण एकही पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येऊ शकला नाही. येथील विधानसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी सरकार बदलले आहे. १९८५ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. राज्यात काँग्रेसला विधानसभेत बहुमत मिळाले होते, तर भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत भाजपला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर १९९० साली भाडपने ६८ जागापैकी ४६ जागांवर विजय प्राप्त करून सरकार स्थापन केले होते. पुढे १९९३ साली काँग्रेस, १९९८ साली भाजप, २००३ साली काँग्रेस, २००७ मध्ये भाजप, २०१२ साली काँग्रेस आणि २०१७ साली पुन्हा भाजप असा राज्याचा राजकीय कल राहिला आहे.
 
 
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना विजयाचा विश्वास
 
भाजपने यंदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याच नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. अतिशय स्वच्छ प्रतिमा हे ठाकूर यांचे बलस्थान मानले जाते. एम्स बिलासपूर, वंदे भारत एक्सप्रेस, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, हाटी समुदायाला वनवासी दर्जा, १२५ युनीट मोफत वीज, महिलांना बसचे ५० टक्के शुल्कमाफी, स्वावलंबन योजना, गृहिणी सुविधा योजनेंतर्गत तीन मोफत गॅस सिलिंडर, ग्रामीण भागात पाणीपट्टी माफ अशा धोरणांमुळे भाजप सरकारविषयी मतदार सकारात्मक असल्याचे दिसते.
 
त्याचवेळी काँग्रेस पक्षाला गटबाजीने पोखरले असून त्यांचे अनेक महत्त्वाचे नेते भाजवपासी झाले आहेत. त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांच्या निधनानंतर जनाधार असलेला नेता काँग्रेसकडे नाही. त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल हे दिल्ली आणि पंजाबप्रमाणे ३०० युनीट मोफत विजेसह अन्य मोफत आश्वासनांची खैरात करत आहेत.
 
 

ark 

समाजकेंद्रीत विकासावर जनतेचा विश्वास – अविनाश राय खन्ना, प्रभारी, हिमाचल प्रदेश भाजप
 
हिमाचल प्रदेश भाजपचे प्रभारी अविनाश राय खन्ना दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना म्हणाले, गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारने समाजकेंद्रीत विकास केला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात सुधारणा झाल्या आहेत. दुसरीकडे भाजपचे संघटन येथे मजबूत असून बुथस्तरापर्यंतची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे भाजप सरकारवरील विश्वासामुळे यंदा भाजप सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरलेल्या आम आदमी पक्षास हिमाचलची शांतीप्रिय जनता स्विकारणार नाही. त्यामुळे आप पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा हवेतच विरल्याचेही खन्ना यांनी सांगितले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.