‘मामा’ बनवायचे आहे...

    16-Oct-2022   
Total Views |

andhare
 
 
“मी शिवसेनेला माझे बाळ दत्तक दिले. जेवढे शिवसैनिक आहेत, ते मामा म्हणून बाळाला सांभाळतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील,” इति शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अतिअति कट्टर आणि निष्ठावान नेत्या सुषमा अंधारे यांचे म्हणणे. (सुषमी म्हणू नये जाऊ दे कारण आता ती उपनेता बिता झाली आहे.) अर्थात, सुषमांच्या पाच वर्षांच्या लेकीबद्दल काही म्हणणे नाही. कारण, अश्राप लेकरू आहे. पण सुषमाला मानले पाहिजे. कानामागून आली आणि तिखट झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिच्या मुलीचा मामा का बनावे? त्यांना काही दुसरे काम नाही का? सुषमा आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे. पण तीन-तीन चार-चार पिढ्या पूर्वीच्या शिवसेनेसाठी खर्ची घातलेले लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले का?
 
 
मुंबई-पुण्यासारख्या शहरातून ते हद्दपार होत उपनगरांपलीकडे गेले. पूर्वीच्या सेनेसाठी त्यांनी अंगावर केसेस घेतल्या. त्यामुळे कामधंदे मिळाले नाहीत. ‘आवाज कुणाचा’ म्हणत म्हणत या सगळ्यांचा आर्थिक कुचंबनेमुळे आवाज बंद व्हायची पाळी आली. पण या सगळ्यांचे पालकत्व कुणीही घेतले नाही. बिचारे संघर्षग्रस्त जीणे आजही जगत आहेत. ते कधीही असे म्हणाले नाहीत की शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला सांभाळावे, आमचे काका-मामा किंवा पालक बनावे. मात्र, काल-परवा आलेल्या सुषमाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘मामा’ बनवून टाकले. सुषमा तशी चाणाक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत स्वत: मुख्यमंत्री, आदित्य यांना पर्यटनमंत्री, रश्मी यांना संपादक म्हणून संधी दिली. आपल्या मुलीचे पालकत्व उद्धव यांना दिले, तर मग आपल्या मुलीला मोठे झाल्यावर आपोआपच नेतेपद मिळेल, असे सुषमाला वाटले असेल. फायद्यासाठी पक्ष आणि जुन्या गोतावळ्याची साथ सोडणार्‍या सुषमा अंधारे यांनी तसाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येऊन फारसा उजेड पाडला नाहीच. समान विचारकार्यशील लोकांची मैत्री होते. या न्यायाने सुषमा उद्धव ठाकरेंच्या पक्षात आल्यावर कालपर्यंतच्या शिवसेनेचे शत्रू असलेले कम्युनिस्टांसारखे पक्षही उद्धव ठाकरेंसोबत आले. काहीही असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अतिअति कट्टर आणि निष्ठावान नेत्या सुषमा अंधारेला या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मामा बनवायचे आहे. हे मात्र खरे...
 
 
‘या’ दोघांना कोण सांगणार
 
 
हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये वर्षाअखेरीस निवडणुका आहेत. त्यामुळे वातावरण निवडणुकीच्या कटशाहच्या रंगाने रंगले आहे. या अशा सगळ्या निवडणुकांच्या वातावरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांना मुद्दाम त्या यात्रेत गुंतवले आहे. जेणेकरून राहुल गुजरात किंवा हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला येऊ नयेत. कारण, निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच होते आणि त्यामध्ये राहुल मार खातात आणि भाजप जिंकते. कधी कधी तर असे चित्र असते की, राहुल गांधी जिथे म्हणून सभा घेतात, तिथे अशी काही वक्तव्य करतात की, जनता समजून जाते, राहुल किती ‘प्रगल्भ’ विचारांचे आहेत. ते बालिश विधान करतात, नेमके भारतीय जनतेच्या आदर्श व्यक्तिमत्वांबद्दल काहीही बरळतात. हिंदू ब्राह्मण दाखवण्याच्या नादात नेमके हिंदुत्वाच्या विपरित काहीतरी कृती करतात. मग ऐन निवडणुकीमध्ये जनता हसून हसून बेजार होते आणि काँग्रेसलाही हरवून बेजार करते. त्यामुळे राहुल हिमाचल प्रदेश किंवा गुजरातला निवडणूक प्रचाराला येऊ नये, असेही काही लोकांना वाटते.
 
 
राहुल गांधींच्या परोक्ष आता हिमाचल प्रदेशमध्ये प्रियांका गांधी काँग्रेसच्या प्रचाराला आल्या आहेत. परिवर्तन प्रतिज्ञा यात्रा काढत त्या प्रचार करणार आहेत. पण त्या परिवर्तनची प्रतिज्ञा होण्याआधीच हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे परिवर्तन घडले. काँग्रेस, युवा काँग्रेस आणि ‘इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस’ (इंटक)च्या आठ नेत्यांनी एकसाथ पक्षाचा राजीनामा दिला. या सगळ्यांनी विधिवत राजीनाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्याच महिन्यात हिमाचल काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हर्ष महाजन हेसुद्धा काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रियांका या काय आणि किती परिवर्तन आणतील हा संशोधनाचा मुद्दा आहे. स्थानिक स्तरावर पाहायला गेले, तर काँग्रेसची कामगिरीही निराशाजनकच आहे. त्यातच देशभरात काँग्रेसचे काही चांगले चाललेले नाही. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानच अनेक लोक काँग्रेस सोडून भाजपसोबत गेली. प्रियांका केवळ इंदिरा गांधींसारख्या दिसतात किंवा त्यांची नक्कल करतात म्हणून किंवा राहुल गांधी आताशा राजीव गांधींसारखे दिसण्याचा प्रयत्न करतात म्हणून काँग्रेस जिंकेल हे खरे नाही. पण ते या दोघांना कोण सांगणार.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.