खर्गेंचा उत्सवी शोक

    14-Oct-2022   
Total Views |
 
Mallikarjun Kharge
 
 
 
काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी दुसर्‍या कुणाची मुळी गरजच नाही, हे त्रिवार सत्य! कारण, काँग्रेस पक्ष आणि स्वतः काँग्रेसजनच काँग्रेसला संपवण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पूर्ण करत असतात. आताही ‘भारत जोडो यात्रे’चा खटाटोप काँग्रेसकडून सुरू असून कंटेनरमयी जीवन जगत जगत काँग्रेसजन मजल-दरमजल करत दिल्लीकडे कूच करत आहेत. परंतु, काँग्रेसचे आघाडीचे नेतेच काँग्रेसला अडचणीतच आणण्यात नेहमीच वरचढ राहिले आहेत. त्याचाही नुकताच प्रत्यय आला.
 
 
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नेहमीप्रमाणेच काँग्रेसनेही निवडणुकीच्या नावाखाली आपल्या मर्जीतील माणसालाच उमेदवारी दाखल करण्यास सांगितली आहे. परंतु, याच मल्लिकार्जुन खर्गेंनी भोपाळमधील पत्रकार परिषदेत आपल्या ज्ञानाची मुक्ताफळे उधळली. 2024च्यालोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, बकरी ईदमध्ये बचत केली तर मोहरममध्ये नाचू, असे म्हटले. ही म्हण म्हणण्यामागचा अर्थ असा होता की, आधी संघटनेची निवडणूक झाली पाहिजे, मग पंतप्रधानपदाबाबत बघू. परंतु, या म्हणीचा दाखला देताना ते गांभीर्य विसरले. ‘मोहरमला नाचू’ म्हणणार्‍या खर्गे यांना त्याविषयी माहिती नाही का, असाच प्रश्न उपस्थित होतो.
 
 
’मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव असून या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे मृत्यमुखी पडले.त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लीम बांधव या दिवशी शोक व्यक्त करत असतात. परंतु, खर्गे यांनी मोहरमला नाचू असे म्हटले आणि नव्या वादाला तोंड फोडले. मुस्लिमांसाठी दुःखाचा दिवस असताना त्याच दिवशी नाचण्याच्या गोष्टी करणं संतापजनकच! भाजपने खर्गे यांचे बकरी ईद-मोहरमचे वक्तव्य मुस्लिमांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही मोहरम हा ‘उत्सव’ नसून ‘शोक’ असल्याची आठवण खर्गेंना करून दिली. आधीच पक्ष रसातळाला गेल्याने ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यात खर्गेंच्या बोलघेवडेपणामुळे पक्षाचं काय होणार याविषयी आणखी काही भाष्य न केलेलं बरं...
 
 
चोर सोडून संन्याशाला फाशी
 
 
पंजाब सरकारने नुकतीच दिवाळीसह इतर काही सणांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. पुढील तीन महिन्यांत दिवाळी आणि इतर सणांना फटाके फोडण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नागरिकांना दिवाळीत रात्री 8 ते रात्री 10 या दोन तासांसाठीच फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये दिवाळीत शेत जळण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आला. परंतु, असे निर्णय याधीही घेऊन अशा घटना थांबविता आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे, पंजाबचे पर्यावरणमंत्री गुरमित सिंग मीत हैर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात (दिवाळीत) रात्री 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत दोन तास फटाके वाजवण्याची परवानगी असेल.
 
  
तसेच, संपूर्ण पंजाबमध्ये फटाक्यांची निर्मिती, साठा, वितरण, विक्री आणि वापरावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. राज्यात फक्त पर्यावरणपूरक फटाक्यांनाच विक्री आणि वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. पंजाब सरकारने नागरिकांना परवानाधारक व्यापार्‍यांमार्फतच फटाके खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. व्यापार्‍यांनाही केवळ परवानगी असलेले फटाके विकण्यास बजावण्यात आले आहे. दिवाळीबरोबरच प्रकाशपर्व, नाताळ आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येलाही फटाके फोडण्यासाठी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. श्री गुरुनानक देवजींच्या प्रकाशपर्वाच्या दिवशी अर्थात 8 नोव्हेंबरला सकाळी 4 ते 5 या वेळेत एक तास आणि रात्री 9 ते 10 या वेळेत एक तास फटाके वाजवण्यास परवानगी असेल.
 
 
नाताळसाठी 25-26 डिसेंबरच्या मध्यरात्री 11.55 ते दुपारी 12.30 पर्यंत 35 मिनिटे आणि 31 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री 11.55 ते 12.30 पर्यंत 35 मिनिटांची परवानगी आहे. हा म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखा प्रकार झाला. जी लोकं प्रदूषण करतात त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी थेट दिवाळीत फडाके फोडण्यावर प्रतिबंध घातले. हा सरळसरळ हिंदू सणांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्नही उभा ठाकतो. वर्षातून एकदा येणार्‍या दिवाळीत हिंदूंनी आनंद साजरा करायचा नाही, तर मग कधी साजरा करायचा. विशिष्ट धर्माच्या सणांवरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करून आपचा हिंदूविरोधी चेहरा यानिमित्ताने पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.