पाकिस्तानमधील वाल्मिकी...

    12-Oct-2022   
Total Views |
 
Valmiki in Pakistan
 
 
 
पाकिस्तानमधील सिंध प्रांतात लरकानाच्या घासपिढी वस्तीमध्ये वाल्मिकी समाजाची मोठी वस्ती. मोठी म्हणजे 100च्या आसपास कुटुंबांची वस्ती. इथे महर्षी वाल्मिकींचे 70 ते 80 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचेकाम सुरू होते. मात्र, अचानक येथील प्रशासनाने या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम थांबवले. ते मंदिर अर्धवट तुटलेल्या अवस्थेतसोडून दिले गेले. महर्षी वाल्मिकींची जयंती पूर्वीच मंदिराचे काम का थांबवले? महर्षी वाल्मिकींच्या पुढच्या जयंतीपूर्वी तरी मंदिर बांधून पूर्ण व्हावे, अशी मागणी इथल्या वाल्मिकी समुदायाने केली. त्यासाठी त्यांनी आंदोलन केले. पाकिस्तानमध्ये 200 गुरूद्वारा आणि 150 मंदिरांचे व्यवस्थापन करण्यासाठी पाकिस्तानमध्ये ‘संघीय निकाय इवैक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ आहे. पण, ते नावालाच म्हणायला हवे.
 
 
 रावळपिंडी शहरातील पुरातन मंदिरांच्या पुनर्बांधणी, डागडुजीसाठी इथल्या प्रशासनाने पाच कोटी रुपये मंजूर केले. मात्र, जीर्णोद्धारासाठी लागणारे बांधकाम सामानच चोरी झाले. त्यानंतर सगळे काम थंड झाले. लाहोरमध्ये 1200 वर्षांपूर्वीचे वाल्मिकी मंदिर आहे. या मंदिरावर 20 वर्षांपासून एका ख्रिस्ती जोडप्याने कब्जा केला. आपण हिंदू झालो असून या मंदिरात वाल्मिकी समाजाच्या लोकांसाठी पुजेचे काम करतो, असे या कुटुंबाने जाहीर केले. मात्र, येथील वाल्मिकी समाजाने या मंदिरासाठी पाठपुरावा केला. पाकिस्तानी प्रशासनाने या मंदिरातून ख्रिस्ती दाम्पत्याला बाजूला काढून मंदिर ताब्यात घेतले. 1992 साली भारतात बाबरी प्रकरण सुरू होते. त्यावेळी पाकिस्तानमध्येया मंदिरात शस्त्र घेऊन स्थानिक मुसलमान नागरिक घुसले होते. मंदिरातील मूर्ती तोडल्या होत्या. पण, त्याबाबत पुढे काही झाले नाही.
 
 
 
तसे पाहायला गेले तर, पाकिस्तानमध्ये हिंदू मागासवर्गीयांसाठी 1957 साली ‘शेड्युल्ड कास्ट ऑर्डिनेन्स’ पारित करण्यात आले होते. त्यानुसार 42 जातींना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला. बाजीगर, भंगी, कुच्रिया, मेघ, हलालखोर, नत, ओढ़, पासी, जातिया, पेरना, रामदासी, कलाल, सपेला, सीकरी, सिरकिबंद, खाटिक, सोची, बरार, चूरा, धनक, दागी, कोल्ही, हलाल, सांसी, बागरी, वाल्मिकी, दुमना, मेघवार, भील, अद, धर्मी, चमार, चुरा/वाल्मिकी, गागरा, ढेड, बवारियां, बंजारा, गंधीला आदी जातींचा समावेश यात आहे. मात्र, त्यामुळे समाजाच्या जगण्यात काही परक पडला नाही. पाकिस्तानमधल्या मागासवर्गीय समाजाचे जगणे कसे आहे हे सांगताना ’सिंध बाथ मजदूर फेडरेशन’चे अध्यक्ष पुन्हो भील ते म्हणतात की, “हैदराबादमधील हॉटेल्समध्ये आजसुद्धा हिंदू समाजातील मागासवर्गीयांना प्रवेश नाही. इथे कुणी हिंदू गेला, तर त्यांना जात विचारून प्रवेश दिला जातो.
 
 
 
सिंधमध्ये अर्धवट पांढर्‍या आणि भुरकट कप, ग्लास, प्लेटमध्ये हिंदू मागासवर्गीयांना अन्न दिले जाते. त्यावरून इतरांनी ओळखायचे की, ही व्यक्ती हिंदू मागास समाजाची आहे.” म्हणजेच काय तर पाकिस्तानी मुसलमान अस्पृश्यता-विषमता आजही पाळतो. पाकिस्तानातच का? उत्तरप्रदेश मुरादाबादमध्ये गेल्यावर्षी एक घटना घडली. इथे केस कापण्याचे सलून केवळ मुस्लिमांचेच होते. पण, त्यांनी वाल्मिकी समाजाचे केस आणि दाढी कापण्यास नकार दिला. त्यामुळे वाल्मिकी समाजाला केस कापण्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागत असे. पुढे याबाबत वाल्मिकी समाजाने आंदोलन केले, तर असे हे वातावरण. वाल्मिकी समाज स्वत:ला वाल्मिकींचे वशंज मानतो. प्रभू श्रीरामचंद्रांना मानतो. धर्मासाठी सदैव तत्पर असतो. त्यामुळे पाकिस्तानमध्ये जगण्यासाठी वाल्मिकी समाजाला मोठा संघर्ष करावा लागत आहे.
 
 
 
पाकिस्तान सध्या आर्थिक तंगी, राजकीय अस्थिरता आणि धार्मिक उन्मादाच्या दहशतवादाने डबघाईला आला आहे. या सगळ्यांमध्ये तिथे हिंदू मागासवर्गीय समाज आणखीन पिचत चालला आहे. चीनमधील उघूर किंवा बांगलादेश, म्यानमारच्या रोहिंग्यांसाठी आणि अमेरिकेच्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’साठी भारतात विद्वेष माजवणारे हिंसा करणारे लोक आपण पाहिले. ते स्वतःला ‘मानवतावादी’ वगैरे सांगतात. मग हे लोक पाकिस्तानातील हिंदू मागासवर्गीयांच्या वेदनादायी जगण्याबाबत गप्प का आहेत? या पार्श्वभूमीवर भारतीय हिंदूंनी तरी पाकिस्तानमधील आपल्या समाजबांधवांसाठी एकजूटीने उभे राहायला हवे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.