ठाणे : “मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवेळी ‘ओबीसी’ समाजाने लढायला हवे होते. पण, त्यावेळेस दलित वर्ग मैदानात उतरला. ‘ओबीसी’ मात्र, मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. त्यामुळे मला ‘ओबीसीं’वर फारसा विश्वास नाही,” अशी जाहीर कबुली राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवार, दि. ३ जानेवारी रोजी दिली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात ‘ओबीसी एकीकरण समिती’कडून कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आव्हाड बोलत होते. याप्रसंगी आ. निरंजन डावखरे, आ. रविंद्र फाटक, स्थायी सभापती संजय भोईर, सभागृह नेते तथा ओबीसी नेतृत्व अशोक वैती, नगरसेविका मृणाल पेंडसे आदी उपस्थित होते.‘ओबीसी एकीकरण समिती’च्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संबोधित करताना, आव्हाड यांनी “मला ‘ओबीसीं’वर फारसा विश्वास नाही,” असे वक्तव्य केले. “आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचे होते, तेव्हा ‘ओबीसी’ मैदानात लढले नाहीत. लढायला महार आणि दलित होते. कारण, ‘ओबीसीं’ना लढायचेच नव्हते.
‘ओबीसीं’वर ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा आहे की, आपण श्रेष्ठ आहोत, असा त्यांचा समज झाला आहे. पण, त्यांना माहित नाही की, हे आपल्या पूर्वजांना देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही आणि हे सगळे विसरले आहेत आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. घरात बसून आरक्षण मिळणार नाही, तर सरकारशी दोन हात करावे लागतील,” असे वादग्रस्त विधान केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘ओबीसी’ समाजातून नाराजीचा सूर पाहायला मिळाला. यावेळी आ. निरंजन डावखरे यांनी, “ ‘ओबीसी’ एकवटू लागले आहेत, हे अत्यंत चांगले आहे. पण, राज्याने ‘एम्पिरिकल डेटा’ सादर करून ‘ओबीसीं’चे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा,” असे आवाहन त्यांनी केले.